वाढदिवसाचा ‘केक’ भरवून साधला वासनेचा ‘डाव’! संगमनेर तालुक्यात विद्यार्थिनीवर अत्याचार; मेंढवणच्या नराधमाला उद्यापर्यंत कोठडी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील ग्रामीण भागातील एका महाविद्यालयीन तरुणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, तिला वाढदिवसाच्या बहाण्याने तिच्याच घराच्या पाठीमागील निर्जनस्थळी बोलावून पाशवी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्वी अनाहुतपणे काढलेली छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी देत एका वाहनचालकाने या किशोरवयीन जिवाचा ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर लचका तोडला. मात्र, पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे हा प्रकार उजेडात आला असून, संगमनेर तालुका पोलिसांनी मेंढवण येथील नराधम सोमनाथ बढे याला बेड्या ठोकल्या आहेत.


याबाबत संगमनेर तालुका मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 18 वर्षीय तरुणी नियमितपणे लोणी येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी जात असे. या प्रवासादरम्यान प्रवासी वाहतूक करणारा सोमनाथ काशिनाथ बढे (रा.मेंढवण) याच्याशी तिची ओळख झाली. शेतात घाम गाळून आपल्या तीन लेकींचे भविष्य घडवू पाहणार्‍या एका कष्टकरी बापाच्या लेकीला या नराधमाने आपल्या जाळ्यात ओढले. प्रवासाच्या निमित्ताने जवळीक साधून त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला आणि याच काळात तिची काही छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवली.


गेल्या सहा महिन्यांपासून पीडितेचे शिक्षण खंडित झाल्याने तिचा प्रवास थांबला होता, मात्र आरोपी सोमनाथ याने तिच्याशी मोबाईलवरुन संपर्क कायम ठेवला होता. मंगळवारी (दि.28) पीडितेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने आपला विकृत मनसुबा पूर्ण करण्याचे ठरवले. रात्री 11 च्या सुमारास त्याने दोनशे रुपयांचा केक घेऊन पीडितेच्या घरामागे येत तिला फोन केला. घरचे सर्व जागे असल्याचे सांगूनही त्याने तिला भावनिक साद घालत शेतात बोलावून घेतले. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा ही भोळीभाबडी तरुणी तिथे पोहोचली, तेव्हा वाढदिवसाचा केक कापण्याचे नाटक करुन या नराधमाने तिला आपल्या वासनेच्या विळख्यात ओढले.


पीडितेने त्याच्या या कृत्याला कडाडून विरोध केला, मात्र प्रवासादरम्यान काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिचे तोंड दाबले. तिच्या असहायतेचा फायदा घेत सोमनाथने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची भीतीही त्याने घातली. घडला प्रकार अस्वस्थ करणारा असल्याने पीडितेने रात्रभर कूस बदलत विचार करुन अखेर दिवस होताच आपल्या आईला या भयावह कृत्याची माहिती दिली. आपल्या काळजाच्या तुकड्यावर झालेल्या या आघाताने तिचे माता-पिता हादरुन गेले, मात्र तरीही त्यांनी समाजाचे, खोट्या प्रतिष्ठेचे भय झुगारुन पोलिसांत धाव घेतली.


संगमनेर तालुका पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलमान्वये सोमनाथ काशिनाथ बढे याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (दि.4) पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुलांशी असलेला संवादाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा अतिवापर यामुळे अशा विकृतींना वाव मिळत असल्याचे वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.


पालकत्वाचा कस आणि सामाजिक सजगता!
शिक्षणासाठी घराबाहेर पडणार्‍या आपल्या पाल्यांवर पालकांचा अढळ विश्वास असतो. याच विश्वासाला तडे देणार्‍या घटना सध्या वारंवार घडत आहेत. बदलत्या युगात मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवणे, त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींची माहिती असणे आणि मुलांच्या वागण्यातील बदलांवर लक्ष ठेवणे अनिवार्य झाले आहे. मोबाईलचा अतिवापर आणि त्यातून निर्माण होणारे आभासी संबंध हे अनेकदा धोक्याचे ठरत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरही सजग राहून आपल्या पाल्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आता पालकांवर आली आहे. या घटनेकडे प्रत्येक पालकाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1652819

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *