घारगाव अत्याचार प्रकरणातील दुसर्या आरोपीची शरणांगती! पाच महिन्यांपासून होता पसार; हिंदुत्ववाद्यांकडून ‘लव्ह जिहाद’चाही आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभागातील एका 28 वर्षीय विवाहितेला घरकामाचे आमिष दाखवून तिच्यावर दोघांनी सामुहीक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पाच महिन्यांपूर्वी घारगावातून समोर आला होता. अत्याचारानंतर दोघाही आरोपींनी वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडित महिलेने सदरचा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र या प्रकरणाची कुणकुण लागताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पीडितेच्या घरी जावून तिला धीर दिल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी परप्रांतातून येवून घारगावमध्ये स्थिरावलेल्या पाणीपुरीवाल्यासह त्याच्या बाजूलाच बेकरी थाटून दिवसभर सावज हेरणार्या एकावर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसीटी) गुन्हा दाखल झाला, मात्र तत्पूर्वीच दोन्ही आरोपी टाळे ठोकून पसार झाले होते. पोलिसांनी महत्प्रयासाने थेट राजस्थानात छापा घालून मुख्य आरोपी गणेश प्रजापतच्या मुसक्या आवळल्या. मात्र गेल्यावर्षी 15 सप्टेंबररोजी घडलेल्या या प्रकरणातील दुसरा अत्याचारी सैफुल्ला शेख मात्र पसारच होता. या दरम्यान त्याने अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केले, मात्र जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळल्याने अखेर पाच महिन्यानंतर त्याने कायद्यासमोर शरणांगती पत्करली. सध्या त्याला तीन दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले असून पाच महिने त्याला कोणी आश्रय दिला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दोन वर्षात तालुक्याच्या पठारभागात घडलेल्या काही घटनांनी संपूर्ण तालुक्याचे वातावरण ढवळून निघालेले असतानाच गेल्यावर्षी 15 सप्टेंबररोजी सायंकाळी सातच्या सुमारास घारगावमध्ये सदरचा धक्कादायक प्रकार घडला होता. पठारभागातील एका गावात राहणारी 28 वर्षीय विवाहिता पाणीपुरी खाण्याच्या उद्देशाने घारगाव-अकलापूर रस्त्यावरील ‘भोलेशंकर पाणीपुरी’ नावाच्या हातगाडीवर आली. त्यावेळी आरोपी गणपत उर्फ गणेश जैसाराम प्रजापत (वय 28, रा.मंडवारीया, ता.सिरोही, राजस्थान) याने पीडितेशी बोलताना तिच्या भावाला हातगाडीवर कामाला पाठवणार का? अशी विचारणा केली.

त्याला नकार दिल्यानंतर त्याने माझ्या घरातील साफसफाईचे काम करणार का? असा दुसरा प्रश्न केला, त्याला पीडितेने होकार देताच आरोपीच्या मनातील सैतान जागला आणि त्याने तिला काम दाखवण्याचा बहाणा करीत बाजूच्याच मुंढे कॉम्प्लेक्समधील आपल्या सदनिकेत नेले. यावेळी त्याने खोलीचा दरवाजा बंद करुन पीडितेला धमकी देत तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने मोबाईलवरुन फोन करीत त्याच्या पाणीपुरी ठेल्याच्या बाजूलाच टपरीवजा दुकान टाकून बेकरी व्यवसाय थाटणार्या सैफुल्ला अबुतय्यब शेख (ह.मु.नारायणगाव, ता.जुन्नर) याला बोलावून घेतले. एखाद्या ठरलेल्या नियोजनानुसार काही क्षणातच हजर झालेल्या दुसर्या आरोपीनेही पीडितेला धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दोघांनीही घडला प्रकार कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घडला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र घारगावमधील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या प्रकरणाची कुणकुण लागली. त्यांनी याबाबतची माहिती संकलीत करुन संगमनेरातील कार्यकर्त्यांना सदरचा प्रकार सांगितल्यानंतर जवळपास घटना घडून 15 दिवसांचा काळ उलटल्यानंतर 1 ऑक्टोबर 2025 रोजी घारगावच्या मुढे कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या सामुहीक बलात्काराचा धक्कादायक प्रकार उघड होवून घारगाव पोलीस ठाण्यात वरील दोघांविरोधात अत्याचार व धमकी दिल्याच्या कारणावरुन भारतीय न्यायसंहितेच्या विविध तरतुदींसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. मात्र तत्पूर्वीच दोन्ही आरोपी आपल्या दुकानांना टाळे ठोकून घारगावमधून पसार झाले.

या घटनेतील दुसरा आरोपी मुस्लिम समाजाचा असल्याने प्रकरणाला वेगळे वळणही मिळाले. त्यामुळे तालुक्यातील वातावरण दुषित होवू लागल्याने दबाव वाढलेल्या घारगाव पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश प्रजापत याच्या मूळगावी राजस्थानात छापेमारी करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. तर, दुसरा आरोपी मात्र आपल्या बायका-मुलांसह नारायणगावमधील घराला टाळे ठोकून पसार झाला. तेव्हापासून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी जंग जंग पछाडले, मात्र त्याचा तपास लागत नव्हता. या दरम्यान त्याने वकिलामार्फत संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचाही पूरेपूर प्रयत्न केला. मात्र खंडपीठाने त्याचा जामीन फेटाळताना त्याला शरणांगती पत्करण्याचे आदेश दिल्यानंतर तो कायद्यासमोर हजर झाला.

त्याला न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिसांकडून गेल्या पाच महिन्यांपासून तो कोठे होता?, या दरम्यान त्याला कोणी मदत केली?, गुन्ह्यात त्याच्या सहभागाचा हेतू व अन्य कोणाचा सहभाग अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. विशेष म्हणजे एकीकडे पाच महिन्यांपासून पसार असलेला सैफुल्ला शेख हा आरोपी न्यायालयाच्या आदेशाने शरण आला असताना दुसरीकडे गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या आरोपी गणेश प्रजापतला मात्र जामीन मंजूर झाला असून त्याची कारागृहातून सुटकाही करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी घारगावमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मास्टर माईंड वगळता उर्वरीत निम्म्याहून अधिक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत असतानाच गेल्यावर्षी घडलेल्या या सामुहीक बलात्काराच्या प्रकरणाने घारगाव पोलिसांविरोधात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील पहिल्या आरोपीला तात्काळ अटक करुन पोलिसांनी सदरचे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे नसल्याचे दाखवण्यात यश मिळवले होते. मात्र दुसरा आरोपी हाती लागत नसल्याने अनेक प्रश्न उभे राहीले होते. आता आरोपी सैफुल्ला शेख स्वतःच हजर झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून तापलेला हा मुद्दा शांत होण्याची शक्यता आहे.

