श्रीरामपूरमध्ये दोन तडीपार सराईत आरोपींना ठोकल्या बेड्या शहर पोलिसांची कारवाई; 65 हजारांच्या मुद्देमालासह दोन दुचाकी जप्त

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील औद्योगिक वसाहत पसिरातून दोन तडीपार सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गाडीच्या डिक्कीतून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा 65 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच तिसरा आरोपी वडाळा महादेव बस स्थानकाजवळ बेकायदेशिररित्या स्वतःच्या कब्जात एक लोखंडी तलवार बाळगताना मिळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सराईत आरोपी आनंदा यशवंत काळे हा दुचाकीवर त्याच्या दोन साथीदारांसह कट्टा बाळगून औद्योगिक वसाहत परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने आनंदा यशवंत काळे (वय 39, रा.सूतगिरणी परिसर, श्रीरामपूर) व त्याचा साथीदार सनी विजय भोसले (वय 23, रा.दत्तनगर, श्रीरामपूर) यांना दुचाकीवर औद्योगिक वसाहत ते रेणुकानगरकडे जाणार्‍या रस्त्यावर जाताना पकडले व त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून गेला. पळून गेलेल्या साथीदाराचे नाव अमित प्रभाकर कुमावत (वय 30, रा.गौरव रेसिडेन्सी प्लॅट नंबर 1, बोरावकेनगर, प्रभाग क्र.7, श्रीरामपूर) असे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या आरोपींकडून होंडा कंपनीची डिओ दुचाकी (क्र.एमएच.16, सीएल.0205)चे डिक्कीमध्ये असलेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तडीपार आरोपी योगेश राजेंद्र काळे (वय 27, रा.वडाळा महादेव) हा 9 मे, 2021 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वडाळा महादेव बस स्थानकाजवळ बेकायदेशिररित्या स्वतःच्या कब्जात एक लोखंडी तलवार बाळगताना मिळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील दिघे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आनंदा यशवंत काळे, सनी विजय भोसले, अमित प्रभाकर कुमावत या तिघांविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3,5,7/25, भा.दं.वि. कलम 34, म.पो.का.क.142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुसर्‍या फिर्यादीवरुन योगेश राजेंद्र काळे याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान सूरवडे, मुख्य हवालदार जोसेफ साळवी, आर.ए.खेडकर, पोलीस नाईक बिरप्पा करमल, अमोल जाधव, संजय दुधाडे, पोलीस शिपाई सुनील दिघे, किशोर जाधव, राहुल नरवडे, पंकज गोसावी, किरण पवार आदिंच्या पथकाने बजावली आहे.

Visits: 139 Today: 1 Total: 1801337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *