जनता पाठिशी असणार्‍यांना घाबरण्याचे काम नाही : आमदार थोरात ‘लोणी’चा उल्लेख करीत घणाघात; ‘हॅप्पी हायवे’ कार्यक्रमात संगमनेरकरांची मोठी उपस्थिती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या मंत्रीपदाच्या काळात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी सातत्याने बैठका झाल्या. त्यातून त्यांना आवश्यक असलेली कामे मार्गी लावण्यासह संगमनेर शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या सुशोभिकरणासाठी २५ कोटी निधी मिळवला. त्याबद्दल आजवर पंचवीस भाषणांमधून नितीन गडकरी यांचे आभारही मानले. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होवून संगमनेरकरांचे स्वप्न सत्यात उतरल्यानंतर सर्वांच्या साक्षीने जल्लोष करण्यासाठी ‘हॅप्पी हायवे’चा कार्यक्रम ठेवला. राजकारण सोडून सगळ्यांनीच यात सहभागी व्हावे यासाठी जाहीर निमंत्रणही दिले. पण, दुर्दैवाने लोणीवाल्यांनी आजचा कार्यक्रमच होवू नये यासाठी अतोनात प्रयत्न केले, मात्र जेव्हा जनता पाठिशी असते, तेव्हा घाबरण्याचे काम नसते अशी घणाघाती टीका करीत माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी बसस्थानक ते बायपास महामार्गाचे लोकार्पण केले. यावेळी आयोजित विविध उपक्रमात संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

केंद्रीय रस्ते वाहूक मंत्रालय व राज्य शासनाच्या निधीतून साकारलेल्या बसस्थानक ते अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंतच्या महामार्गाचे सुशोभिकरणासह विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी (ता.२६) माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्याचा लोकर्पण सोहळा झाला, यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. संजय, मनीष व गिरीश मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदी यावेळी उपस्थित होते.


याप्रसंगी पुढे बोलताना आमदार थोरात यांनी ‘हॅप्पी हायवे’चा कार्यक्रम होवू नये यासाठी पोलीस, महसूल व वीज कंपनीच्या अधिकार्‍यांवर प्रचंड दबाव आणला गेल्याचा आरोप केला. आजच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण व्हावा यासाठी बायपासची वाहतूक शहरातून वळविली गेली. आपण शिर्डी, राहाता येथे काहीतरी चांगले करायच्या हेतूने जातो, मात्र ‘ते’ इकडे येतात त्रास द्यायला आणि मोडायला असे सांगत त्यांनी नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कोरडे ओढले. हा रस्ता आता अतिशय सुंदर झाला असून दुभाजक, विविध प्रकारची फुलझाडे आणि भित्तीचित्रे यामुळे संगमनेरच्या सौंदर्यात भर पडल्याचेही ते म्हणाले.

नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत. आपल्या महसूल मंत्रीपदाच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांसाठी त्यांच्यासोबत आपल्या नेहमीच बैठका होत. शासनात असताना पक्षीय मर्यादा मागे सोडाव्या लागतात, त्याप्रमाणे त्यांना आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम आपण केले. त्या दरम्यानच एका बैठकीत त्यांच्याकडून या रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केली आणि त्यांनीही तत्काळ २५ कोटी रुपये दिल्याचे थोरात यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करताना त्यांनी गडकरी यांचा गेल्या २५ भाषणांमध्ये सातत्याने उल्लेख केल्याची पुष्टीही जोडली. परंतु या रस्त्याचे काम केवळ २५ कोटी रुपयांचे नव्हेतर ६५ कोटी रुपयांचे असून केंद्राकडून मिळालेल्या निधीतून पहिल्या टप्प्यातील भागाचे फक्त डांबरीकरण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

हायवे झाला, पण आम्हाला अंधारातून मोटारसायकल चालवावी लागते अशी संगमनेरकरांची तक्रार होती. त्यामुळे पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामही लवकर पूर्ण व्हावे असा आपला आग्रह होता. आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे, त्यात कोणतेही राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येवून जल्लोष करावा अशी प्रामाणिक भूमिका समोर ठेवून आपण सगळ्यांना जाहीर निमंत्रणही दिल्याचे सांगत दुर्दैवाने काही मंडळींनी त्यातही राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. या रस्त्याचे काम कशा पद्धतीने पूर्ण होणार नाही, आजचा ‘हॅप्पी हायवे’चा कार्यक्रम कसा उधळला जाईल यासाठी मंत्री विखे यांच्या नावाचा उल्लेख टाळून त्यांनी ‘लोणी’वाल्यांनी भरपूर प्रयत्न केल्याची घणाघाती टीकाही केली.

अडथळे आणण्याचे सगळे प्रयत्न होवूनही काम थांबत नसल्याचे पाहून विरोधकांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्युत पुरवठाच कसा होणार नाही यासाठीही खूप प्रयत्न केले. त्यासाठी स्थानिक अधिकार्‍यांना दमातही घेतले गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राजकारण विरहित कार्यक्रमातही राजकारण करण्याचा हा प्रयत्न संगमनेरकरांना चांगलाच माहिती असल्याचे सांगत जेव्हा जनता पाठिशी असते, तेव्हा घाबरण्याचे काम नसते असेही त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. भरपावसात सुरु असलेल्या या कार्यक्रमाला चिंब भिजूनही नागरिकांची मोठी उपस्थिती असल्याचे यावेळी दिसले.

‘हॅप्पी हायवे’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मालपाणी उद्योग समूहाच्या लोणावळा येथील ‘इमेजिका’ येथील लाईव्ह ऑर्केस्ट्रा, सुरक्षा रक्षकांची परेड यासह महामार्गावर जागोजागी क्रिकेट, बॅडमिंटन, कब्बडी, खो-खो, बास्केटबॉल, हॉलीबॉल, झुंबा नृत्य अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला, मुले व वृद्धांनीही मोठी गर्दी केली होती. भरपावसात थोरात यांचे भाषण सुरु असताना त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती.

Visits: 37 Today: 1 Total: 113376

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *