बिरोलेंच्या कारखान्याला अडीच कोटींचा चुना! ऊसतोडणी ठेकेदारांकडून फसवणूक; सातजणांवर घारगावात गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पाच वर्षातील साखर कारखान्याच्या गाळप हंगामासाठी ऊसतोडणीचे करार करुन त्यापोटी सात ठेकेदारांनी एकूण दोन कोटी 43 लाख 50 हजार 356 रुपयांची रक्कम उचल म्हणून घेतली. मात्र करारपत्रानुसार प्रत्यक्षात कोणतीही यंत्रसामग्री व मनुष्यबळ न पुरवता घेतलेल्या रकमेचा अपहार केला. कारखान्याच्या शेतकी अधिकार्यांनी संबंधितांशी वारंवार संपर्क साधून वायदा पूर्ण करण्याची अथवा घेतलेली रक्कम परत करण्याची विनंतीही केली गेली, मात्र उलट ठेकेदारांनी दादागिरीची भाषा करीत प्रत्येकवेळी कारखान्याच्या अधिकार्यांचा अवमान करीत त्यांना पिटाळून लावले. ठेकेदारांच्या वागणुकीतील हा प्रकार पाहता त्यांच्याकडून कारखान्याची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर कौठे मलकापूरच्या खडकाळ माळरानात ऊसाचा गोडवा साखरेत परावर्तीत करणार्या श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या उद्योजक रविंद्र बिरोले यांच्या साखर कारखान्याचे व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरुन घारगाव पोलिसांनी सात ठेकेदारांसह त्यांच्या 14 जामीनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कौठे मलकापूरच्या खडकाळ माळरानावर गेल्या दशकांत सुरु झालेल्या उद्योजक रविंद्र बिरोले यांच्या श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या साखर कारखान्यात हा प्रकार घडला. कारखान्याच्यावतीने सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड करण्यासाठी विविध ठिकाणच्या ठेकेदारांसोबत करार करण्यात आले होते. करारातील अटी व शर्थीनुसार संबंधित ठेकेदारांना नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करीत आगाऊ स्वरुपात (उचल) देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हंगामाच्यावेळी संबंधित ठेकेदारांनी अपूर्ण व्यवस्था व यंत्रणा पुरवल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका कारखान्याला बसला.

याबाबत कारखान्याच्या शेतकी विभागाच्या अधिकार्यांनी रक्कम घेवूनही सेवा देण्यात कुचराई करणार्या सातही ठेकेदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून व नंतर भ्रमणध्वनीद्वारा विनवण्या करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ऐन गळीत हंगामात कारखान्याला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. ठेकेदारांनी आगाऊ घेतलेल्या रकमा मागितल्या असता उलट त्यांनी अधिकार्यांशी हुज्जत घालून उर्मटभाषेत त्यांचा अवमान केला. त्यातून संबंधिताची मनशाही स्पष्टपणे समोर आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे कारखानदाराच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर त्यांनी कायद्याची मदत घेत घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 316 (2), 318 (4), 3 (5) प्रमाणे,

आरोपी ठेकेदार बाबासाहेब बापूराव गुरसाळे (रा.बरगवाडी, ता.शिरुरकासार, जि.बीड) याने एक कोटी 60 लाख रुपये, धुळा उर्फ धुळादेव दादा थोरात (रा.भानगाव, ता.श्रीगोंदा) याने आठ लाख रुपये, लक्ष्मण नामदेव हुलगे (रा.कोरटी, जि.सोलापूर) याने 18 लाख 33 हजार 127 रुपये, शेषराव भागवत पाटील (रा.अलवाडी, ता.चाळीसगाव, जि.जळगाव) याने 26 लाख 74 हजार 298 रुपये, सचिन विलास बागल (रा.नांदगाव, रेहकूरी, ता.कर्जत) याने चार लाख 49 हजार 168 रुपये, बिरु जयसिंग कारंडे (रा.शिरसगाव, ता.शिरुर, जि.पुणे) याने चार लाख रुपये तर, विलास देवीदास तोंडे (रा.सोनीमोहा, तो.गेवराई, जि.बीड) याने 21 लाख 93 हजार 763 रुपये अशा एकूण सातजणांसह त्यांना जामीनदार राहिलेल्या प्रत्येकी दोन अशा 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास घारगावचे सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात करीत आहेत. फसवणुकीच्या या प्रकाराने ऊसतोडणी कामगारांचे टोळीप्रमुख आणि साखर कारखानदार यांच्यातील विश्वासाच्या संबंधांना तडा गेला असून साखरसम्राटांच्या म्हणून ओळखल्या जाणार्या अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण दूध आणि साखरेच्या भोवती फिरणारे आहे. त्यामुळेच राज्यात अहिल्यानगरची साखरसम्राटांचा जिल्हा अशीच ओळख आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सरासरी एकतरी कारखाना असल्याने दरवर्षी गळीत हंगामात गावोगावी ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्यांचा प्रवास नजरेस पडत असतो. मराठवाडा, खांदेश या भागातील ऊसतोड कामगारांना एकत्र करुन ठेकेदारांमार्फत ठिकठिकाणी मनुष्यबळ पुरवण्यात येते. मात्र या प्रकरणात जिल्ह्यात पहिल्यांदाच या प्रक्रियेला गालबोट लागण्यासह बहुधा पहिल्यांदाच सेवा पुरवणार्या ठेकेदारांकडून एकाचवेळी एखाद्या कारखान्याची आर्थिक फासवणूक झाल्याने एकंदरीत प्रकरणात संशय निर्माण झाला असून जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.

