अतिदुर्गम घाटघरचे कोरोना योद्ध्यांमुळे शंभर टक्के लसीकरण! एकजुटीचे घडविले दर्शन; शासनाने गौरव करण्याची ग्रामस्थांची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या अतिदुर्गम डोंगराळ भागातील घाटघर (ता.अकोले) गावाचे कोरोना लसीकरण पूर्णतः झाले असून आदिवासी भागातील लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे पहिले गाव ठरले आहे. घाटघर या गावात अशिक्षित माणसांचा भरणा मोठ्या प्रमाणावर असल्याने देवदेवतांचा व अंधश्रद्धेवर काहीशा प्रमाणात विश्वास असल्याने घाटघरच्या आरोग्य पथक, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे भरीव योगदान आणि तितकीच अंगणवाडी सेविका व आशासेविकांची साथ लाभल्याने सर्वांनी एकजुटीने आणि जिद्दीने काम करत घाटघरचे 100 टक्के लसीकरण घडवून आणले.

अकोले तालुक्यातील घाटघर हे भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील सर्वात जास्त पर्जन्यमान असणारे खेडे समजले जाते. त्यातच ग्रामीण भाग असल्याने येथे कोरोना लसीकरणाला साथ मिळते की नाही याची साशंकता घाटघरच्या आरोग्य पथकाचे अधिकारी डॉ. कल्याण गोयल व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गभाले यांना होती. पंरतु काहीही झाले तरी घाटघर येथील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण 100 टक्के झालेच पाहिजे असा चंग गोयल डॉक्टर व गभाले भाऊसाहेब यांनी बांधला. त्यांच्यासोबत सरपंच लक्ष्मण पोकळे यांनीही पुढाकार घेतला. त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे या गावच्या लोकांना लसीकरण का महत्वाचे आहे हे गळी उतरविणे गरजेचे होते. म्हणून डॉ. गोयल व ग्रामसेवक गभाले यांनी घरोघरी जाऊन प्रबोधन केले. आणि गावातील प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे का गरजेचे आहे हे समजावून सांगितले. हिरु पाटलाची वाडी, पोकळे वाडी, खडकेवाडी दूरवरच्या जंगलातील वाड्यापर्यंत डॉक्टरांचे पथक पोहोचले आणि लसीकरण केले गेले. आज मितीला घाटघर या आदिवासी गावातील लसीकरण 100 टक्के झाले असून आदिवासी भागातील लसीकरण पूर्ण केलेले पहिले गाव ठरले आहे.

याच गावात कोरोनाच्या कालावधीत सर्दी-खोकल्याची साथ असताना गावच्या ग्रामविकास अधिकार्‍यांनी तत्काळ पेसा निधीतून औषधे खरेदी करत डॉक्टरांना पुरविल्याने घाटघर येथील साथ आटोक्यात आणली. शाळेतील मुले तापाने फणफणलेली असताना त्यांना धीर देत कोरोना सेंटरमध्ये न हलविता धीर देत गावातच डॉक्टरांनी व गभाले भाऊसाहेबांनी स्वतःच्या जबाबदारीवर मुलांचा ताप पळविल. आज घाटघर या आदिवासी खेड्यातील एकही रुग्ण बाहेरगावी उपचारांसाठी जात नाही. त्यांना सर्व सुविधा येथील आरोग्य उपकेंद्रातूनच मिळतात. आज डॉ. कल्याण गोयल व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गभाले, सरपंच लक्ष्मण पोकळे, आरोग्य केंद्राचे सुनंदा अडकित्ते, रेखा तोरणे, कदम व खेताडे मामा, अंगणवाडी सेविका विजया अनारसे, शांता उघडे, यमुना दरवडे, कविता खडके व आशासेविका पुनाबाई खडके, झुंबराबाई खडके यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळेच गावातील लसीकरण 100 टक्के झाले आहे. त्यासाठी गावामध्ये असणारे सुशिक्षित नागरिक यांनीही लसीकरणासाठी विशेष मदत केली.

घाटघर गावची आरोग्य सेवा काही वर्षांपूर्वी कोलमडली होती. तेथे डॉ. कल्याण गोयल अहमदनगर येथून घाटघरला हजर झाले व घाटघरच्या आरोग्याच्या समस्याच दूर झाल्या. घाटघरसाठी डॉ. गोयल एकप्रकारे देवदूतच ठरल्याने व कायम घाटघरला तत्पतरतेने सेवा देणारे राष्ट्रपती पदक विजेते ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गभाले यांना शासनाने कोविड योद्धे म्हणून गौरविण्यात यावे अशी मागणी येथील जनतेने केली आहे.

घाटघरचे लसीकरण हे 100 टक्के करण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका व आशासेविका यांनी कंबर कसली असून कोविड कालावधीत यांच्या एकजुटीमुळेच आम्ही सुरक्षित राहिलो. इतके चांगले काम करुनही त्यांची शासनाने कुठेच दखल घेतली नाही.
– रमेश खडके, ग्रामस्थ

Visits: 14 Today: 2 Total: 116529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *