पदच्युत शहरप्रमुख दिनेश फटांगरे पोलिसांना शरण! पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत अटक; सोशल माध्यमातून दिली होती धमकी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोशल माध्यमात अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक मजकूर प्रसारित करुन टीकेचा धनी बनलेला आणि त्यावरुन दाखल गुन्ह्याची बातमी प्रसिद्ध केल्याने संतापून जात थेट एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकांवर सोशल माध्यमातून अश्लिल टीका करुन त्यांना धमकी देणार्या दिनेश फटांगरे विरोधात शहर पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी ‘नॉट रिचेबल’ असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अशातच या घटनेच्या सहा दिवसानंतर आज (ता.3) सकाळी अकराच्या सुमारास आरोपी फटांगरे स्वतःहून पोलिसांना शरण आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात शिवसेनेने यापूर्वीच त्याला पदच्युत केले आहे.

मागील आठवड्यात बुधवारी (ता.28) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीला येत असताना झालेल्या विमान अपघातात त्यांच्यासह पाचजणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालेले असतानाच शिवसेनेचा तत्कालीन शहरप्रमुख असलेल्या दिनेश फटांगरे याने सोशल माध्यमातून अतिशय संतापजनक असा मजकूर प्रसारित केला. त्यावरुन शहरात संतापाचे वातावरण निर्माण होवून संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सदरचा मजकूर डिलीट करण्यात आला, मात्र त्याउपरांतही जनमानसातील राग शमला नाही. त्यामुळे आमदार अमोल खताळ यांच्या आदेशावरुन त्याची पदावरुन हकालपट्टीही करण्यात आली.

शहरात घडलेल्या या दोन्ही घटना महत्वाच्या असल्याने सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी त्यांची दखल घेतली. त्यातील दैनिक युवावार्ता या स्थानिक दैनिकानेही या घटनेची दखत घेत शिवसेनेच्या पदच्युत शहरप्रमुखाविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. मात्र त्याचा व्यक्तिगत राग मनात धरुन फटांगरे याने ‘त्या’ बातमीच्या संदर्भाने सोशल माध्यमातून पुन्हा गरळ ओकताना वृत्तपत्राचे संपादक किसन हासे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जावून टीका करण्यासह त्यांच्या पत्नीचीही बदनामी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या संगमनेरातील पत्रकारांनी एकत्रितपणे या घटनेचा निषेध नोंदवून आरोपी विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी केली होती.

त्याला प्रतिसाद देत पोलीस उपाधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी आरोपी दिनेश फटांगरे याच्या विरोधात ज्येष्ठ पत्रकार किसन हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय न्यायसंहितेसह पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे फटांगरेवर अटकेची तलवार लटकत असतानाच तो स्वीचऑफ झाल्याने त्याचा माग काढण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. अशातच आज (ता.3) सकाळी अकराच्या सुमारास आरोपी दिनेश भीमाशंकर फटांगरे हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले असून वृत्तलिहण्याच्या वेळेपर्यंत त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर त्याला उर्वरीत दोन प्रकरणांचाही सामना करावा लागणार आहे.

