संगमनेरात भक्तीभावाने साजरा झाला खंडोबाचा विवाह सोहळा! कोविड नियमांचे पालन करीत भाविकांची उपस्थिती; प्रसादाचे वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायांच्या चंपाषष्ठी उत्सवाची आज संगमनेरातील साळीवाडा येथील खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सांगता झाली. गेल्या सहा दिवसांपासून बसलेले खंडोबाचे घटही आज उठले. या निमित्ताने येथील मंदिराच्या परिसरात आकर्षक मांडव घालून सजावट करण्यात आली होती. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास देवाचा विवाह सोहळाही मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट उपस्थितीत साजरा झाला. कोविड नियमांच्या अनुषंगाने गर्दी होवू नये यासाठी विश्वस्त मंडळाने महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करुन त्याऐवजी वांग्याचे भरीत, भाकरी आणि बुंदीच्या लाडूचे वितरण केले. या सोहळ्याला संगमनेर परिसरातील खंडोबा भक्तांची मोठी उपस्थिती लाभली.

बुधवारी सायंकाळी विश्वस्त मंडळ आणि भाविकांच्या उपस्थितीत प्रथेनुसार गावातून तेल हंड्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी त्यात तेल ओतून परंपरा संवर्धनास हातभार लावला. वाजतगाजत हा हंडा मंदिरात आणल्यानंतर देवाला तेलाचे तेलवण करुन हळद लावण्यात आली. आज सकाळी मल्हारी मार्तंडांची वर मिरवणूकही निघाली होती. माळीवाड्यातील मारुती मंदिराला नारळ वाढवून ही मिरवणूक पुन्हा साळीवाड्यातील देवस्थानी पोहोचली.

यावेळी परिसरातील नागरिकांसह खंडोबा भक्तांची मोठी उपस्थिती होती. ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टकांना सुरुवात झाली आणि देवाचा लग्न सोहळा आनंदाने आणि भक्तीभावाने पूर्ण झाला. यावेळी भाविकांनी टाळ्यांचा गजर करुन आसमंत दुमदुमून टाकले होते. या विवाह सोहळ्यानंतर मंदिरात दर्शनासाठी भाविांची गर्दी झाली होती. संयोजकांनी मास्कशिवाय मंदिरात प्रवेश नाकारल्याच व सामाजिक अंतराचेही कटाक्षाने पालन केल्याचे यावेळी दिसून येत होते. दरवर्षी विवाह सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यावेळी मात्र पंगती उठवण्यास मनाई असल्याने विश्वस्त मंडळाने वांग्याचे भरीत, भाकरी आणि बुंदीच्या लाडूचा प्रसाद वितरीत केला. त्यासोबतच गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या चंपाषष्ठी उत्सवाचीही सांगता झाला.

बुधवारी तामिळनाडू येथील हवाई अपघातात मृत्यू पावलेले देशाच्या तिन्ही दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व अन्य अकरा अधिकारी व जवानांना यावेळी उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळाने या घटनेबाबत भाविकांना माहिती दिली तेव्हा विवाह मांडवातले वातावरणही गंभीर झाले होते. जनरल रावत यांच्या अपघाती निधनाने देशाचे मोठे नुकसान झाल्याची भावनाही यावेळी उपस्थितांमधून व्यक्त झाली.

