जोर्वेनाक्यावरील पोलीस चौकी उभारणीत काहींचा खोडा! वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आवश्यक; विरोध डावलून बंदोबस्तात काम सुरु..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासकीय जागांवर राजरोस अतिक्रमणं थाटून रस्ताच गिळून घेणार्या आणि त्यातून झालेल्या वाहतूक कोंडीला वैतागून केवळ वाहनाचा हॉर्न वाजवला म्हणून झुंडीने गोळा होवून वाहनचालकाला मारहाण करण्याची घटना सहा महिन्यांपूर्वी जोर्वेनाका येथे घडली होती. या घटनेने गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदणार्या दोन समाजांमध्ये वितुष्ट निर्माण होवून जातीय तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जोर्वेनाक्यावरील सर्व अतिक्रमणं भूईसपाट करतानाच तेथे कायमस्वरुपी पोलीस चौकी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यातून या परिसरातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश असताना या परिसरातील काहींनी चौकीच्या कामातच खोडा घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने स्थानिक पातळीवरुन होणारा काहींचा विरोध डावलून सध्या जोर्वेनाका पोलीस चौकीचे काम युद्धपातळीवर सुरु असून त्यासाठी पोलीस बंदोबस्तही देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात पुणे रस्त्यावरुन जोर्वेगावाकडे जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आणि अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम या वस्त्यांमध्ये राहणार्या लोकांनी संगमनेर-जोर्वे रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणं करुन दुकाने थाटल्याने या रस्त्याचे रुपांतर अक्षरशः बोळात झाले होते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होवून त्यातून अनेकदा हमरीतुमरी झाल्याच्या असंख्य घटनाही घडल्या. मात्र जोपर्यंत शहराचे सामाजिक स्वास्थ खराब होत नाही, तोपर्यंत प्रशासन कोणतीच हालचाल करीत नसल्याचा आजवरचा अनुभव असल्याने जोर्वेनाका आणि तेथील वाढत्या अतिक्रमणांसह त्याच्या आश्रयाने फोफावत चाललेल्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने डोळेझाक केली होती. या सर्वांचा परिपाक गेल्या मे महिन्यात दोन समाजात वितुष्ट निर्माण होण्यात झाले.
जोर्वे गावात जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने दिवसभर या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र अतिक्रमणांनी या रस्त्याचा जीवच दाबून धरल्याने नेहमीप्रमाणे २८ मे २०२३ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दीर्घकाळ त्यात अडकूनही वाहतूक सुरळीत होत नसल्याचे पाहून जोर्वेकडे पिकअप जीप घेवून निघालेल्या शेतकर्यांच्या मुलांनी आपल्या वाहनाचा हॉर्न वाजवला. तोपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांचा खोळंबा होवूनही आपल्याच बापाची इनाम जमीन समजून त्यावर दुकाने थाटणार्यांनी ढुंकूनही बघितले नाही, मात्र हॉर्न वाजताच रस्त्यावरच हातगाड्या आणि आडोसे तयार करुन गर्दी जमवणारे वडेवाले, भजेवाले, चहावाले अशा दुकानदारांच्या वेशातील गुंडांनी हॉर्न वाजवणार्या ‘त्या’ मुलांना झुंडीने जावून बेदम मारहाण केली होती.
सदरचा प्रकार जोर्वेगावात समजल्यानंतर गावातील अन्य सहाजणांनी संगमनेरात येवून आपल्या जखमी मित्रांची भेट घेतली व तेथून ते सगळेजण तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथून माघारी जोर्वे गावाकडे जात असताना रात्री साडेनऊच्या सुमारास सुमारे दीडशे ते दोनशे जणांच्या सशस्त्र जमावाने त्यांना नाक्यावर गाठून एकप्रकारे त्यांचा जीव घेण्याचाच प्रयत्न केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून ते सहाजण तेथून जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी ठरले. या घटनेने गेल्या काही दशकांपासून जातीय हिंसाचाराचा कलंक पुसणार्या संगमनेरातील तणावात मात्र भर पडली आणि गावोगावी या घटनेचा रोष खदखदू लागला.
त्यामुळे जाग आलेल्या प्रशासनाने घटनेच्या तिसर्या दिवशी (३० मे) मोठ्या पोलीस बंदोबस्तात जोर्वेनाक्यावरील सर्व अतिक्रमणे भूईसपाट केली. या दरम्यान जोर्वेसह रहिमपूर, कनोली, कोल्हेवाडीसह कितीतरी गावांनी लेखी निवेदनातून जोर्वेनाक्यावरील एका समुदायाची दादागिरी चव्हाट्यावर आणल्याने गुन्हेगारांचे केंद्र होवू पाहणार्या जोर्वेनाक्यावर कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी समोर आली. पोलिसांनीही तत्काळ ती मान्य करुन पालिकेला जागा उपलब्ध करुन चौकी बांधून देण्याची विनंती केली. त्यानुसार पालिकेने आपल्या मालकीच्या भूखंडावर पोलीस चौकी बांधून देण्यासाठी निविदा सूचना काढून प्रत्यक्षात कामही सुरु केले. मात्र काही स्थानिकांनी निवेदन देत सदरची चौकी बेकायदा आहे, मुलांच्या खेळण्याचे मैदान आहे, भविष्यात रस्ता रुंदीकरणाला अडथळा होईल अशी नसलेली कारणं सांगत त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.
मात्र पालिका प्रशासनाने त्यांच्या विरोधाला कचरापेटी दाखवत काम सुरुच ठेवल्याने आता काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सूप्त शक्तींनी सुरु असलेले बांधकाम पाडण्याचे, त्यात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केले. सदरची गोष्ट समोर येताच पालिकेने त्याबाबत पोलिसांना कळवून बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी चौकीचे काम प्राथमिक पातळीवर असतानाही तेथे चोवीस तास कर्मचार्याची नियुक्ती केली असून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास तो मोडून काढण्याचा मनोदय दर्शविला आहे. त्यामुळे अडथळे आणूनही जोर्वेनाका पोलीस चौकी आकाराला येत असून येत्या १५ दिवसांत त्याचे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
खरेतर पोलीस चौकी आपल्या परिसरात असावी, त्यामुळे सुरक्षेची हमी मिळते असेच कायदा मानणार्या नागरिकांचे मत असते. मात्र संगमनेरच्या जोर्वेनाक्यावर या उलट आणि अत्यंत धक्कादायक स्थिती दिसत असून तेथे पोलीस चौकी होवू नये यासाठी अनेकजण जीवाचे रान करीत असल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ या परिसरात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत असल्याचे दिसून येत असून ते चव्हाट्यावर येवू नये यासाठीच हा विरोध सुरु असल्याचे आता ठळकपणे दिसत आहे. पोलीस चौकीनंतर संपूर्ण जोर्वेनाका परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मनोदयही एका वरीष्ठ अधिकार्याने दैनिक नायकशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यातून जोर्वेनाक्यावरील फोफावलेल्या गुन्हेगारीला वेसन घातली जाणार आहे.