साईंच्या पादुका चोरणार्‍या टोळीचा मोबाईलमुळे ‘गेम’! तालुका पोलिसांनी श्रीरामपुरातून आवळल्या मुसक्या; पादुका वितळवण्यापूर्वीच संगमनेरच्या सोनारावर छापा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक महामार्गावरील श्रद्धेचे केंद्र असलेल्या चंदनापुरी येथील श्रीसाई मंदिरात विसावलेल्या पालखीतून चांदीच्या पादुका चोरणार्‍या टोळीचा संगमनेर तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पर्दाफाश केला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे श्रीरामपूरमध्ये शोधमोहीम राबवून पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, या चोरीचा माल विकत घेणार्‍या संगमनेरातील सोनारालाही पोलिसांनी सहआरोपी केले असून, पादुका वितळवून पुरावा नष्ट करण्यापूर्वीच त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. चंदनापुरीच्या या मंदिरात आजवर झालेल्या सलग पाच चोरीच्या घटनाचा तपास अद्यापही शून्य असताना अवघ्या 72 तासांपूर्वी घडलेल्या घटनेचा मुद्देमालासह छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याने तालुका पोलिसांवरील निष्क्रियतेचा डाग पुसण्यास मदत होणार आहे.


गेल्या शुक्रवारी (30 जानेवारी) घारगाव येथील भाविकांची पालखी विसाव्यासाठी चंदनापुरीच्या साई मंदिरात थांबली होती. पहाटेच्या सुमारास जेव्हा भाविक निद्राधीन होते, तेव्हा प्रशांत दीपक मावस (रा. खांडगाव), रोहीत विठ्ठल साळवे (रा. सिन्नर) आणि अतुल संजय बटवाल (रा. ढोलेवाडी) या तिघांनी मंदिराच्या गाभार्‍यात पालखीत पूजलेल्या 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुकांवर डल्ला मारला. केवळ देवाचा मालच नव्हे, तर त्यांनी तेथील सुरक्षारक्षक संजय गाडेकर यांचा मोबाईलही लांबवला. चोरी करुन पळ काढताना या टोळीने पळून जाताना चंदनापुरी घाटात सिन्नरचे वाहनचालक हरीश सोनार यांनाही लुटले, ज्यामुळे पोलिसांच्या तपासाची व्याप्ती वाढली.


गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तातडीने तपास पथके तयार करुन ती रवाना केली. सराईत गुन्हेगार सहसा मोबाईल वापरण्याचे टाळतात, मात्र या प्रकरणात चोरट्यांनी लुटलेले मोबाईल सुरु ठेवण्याची मोठी चूक केली. सहाय्यक फौजदार बन्सी टोपले, हवालदार आशिष आरवडे आणि त्यांच्या पथकाने मोबाईल सिग्नलच्या आधारे त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यातून तपासाचे धागेदोरे थेट श्रीरामपूरमधील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये जाऊन पोहोचले. त्यानंतर तालुका पोलिसांनी अत्यंत चपळाईने गुप्तता राखताना थेट श्रीरामपूरात जावून संशयीत ठिकाणी वेढा घातला आणि तिघांनाही अतिशय शिताफीने ताब्यात घेतले.


अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले. चोरी केलेल्या पादुका त्यांनी संगमनेरातील सराफ बाजारातील सिद्धेश संदीप महाले या सोनाराला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ संबंधित सोनारावर छापा टाकला. सुदैवाने, या पवित्र पादुका चोरीच्या भट्टीत वितळवण्यापूर्वीच पोलिसांनी त्या आपल्या ताब्यात घेतल्या. या प्रकरणात चोरीचा माल घेतल्याबद्दल संबंधित सोनारालाही गुन्ह्यात ओढण्यात आले असून, त्याला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.


या घटनेची चर्चा परिसरात वार्‍यासारखी पसरली आहे. बाबांच्या दरबारातून कोणीही काही चोरुन नेऊ शकत नाही, हा भाविकांचा विश्वास या घटनेने अधोरेखित झाला आहे. साई चरित्रातील अनेक प्रसंगांमध्ये ‘अन्यायाचा पैसा किंवा चोरीचा माल पचत नाही’ असे दाखले दिलेले आहेत. चोरट्यांनी स्वतःहून मोबाईल चोरणे आणि तो सुरु ठेवून स्वतःचे ठिकाण पोलिसांना देणे, हा एकप्रकारे ‘दैवी संकेत’ असल्याचे भाविकांमधून बोलले जात आहे. मात्र, त्याच वेळी पोलिसांनी रात्रंदिवस राबून, तांत्रिक पुराव्यांची जुळवाजुळव करुन केलेला तपास पाहता हा त्यांच्या व्यावसायिकतेचा विजय असल्याचे दिसून येते.


चंदनापुरीचे साई मंदिर अवघ्या पाच-सात वर्षांपूर्वी उभारले गेले आहे, परंतु या अल्प कालावधीत इथे पाच वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी दानपेटी किंवा इतर ऐवज चोरीला गेला, मात्र पोलिसांना त्याच्या तपासात यश येत नव्हते. यामुळे तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून टीका होत होती. यावेळेस मात्र संपूर्ण मुद्देमालासह चोरटे जेरबंद झाल्याने पोलिसांचे मनोबल उंचावले असून, महामार्गावरील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


चंदनापुरीच्या साईमंदिरात एकामागून एक घडलेल्या घटनांमधील गेल्या शुक्रवारच्या घटनेत मात्र पोलिसांची चपळाई लक्षवेधी ठरली. पहाटेच्या सुमारास मंदिरासह चंदनापुरी घाटात घडलेल्या लुटीच्या या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीपासूनच गांभीर्य बाळगून मंदिरापासून घाटापर्यंतचे सीसीटीव्ही हुडकले व अतिशय कौशल्याने चोरट्यांची ओळख पटवली. सुर्दैवाने त्यातील एकाने चोरलेल्या मोबाईलचा वापर केल्याने पोलिसांना त्यांच्या ठिकाणाचा पत्ता लागला आणि तेथून पसार होण्याच्या तयारीत असतानाच तिघांनाही एकाचवेळी जेरबंद करण्यात यश मिळाले. जागेवरच केलेल्या त्यांच्या चौकशीत चोरलेला मुद्देमाल संगमनेरातच असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या दुसर्‍या पथकाने तत्काळ सिद्धेश संदीप महाले या सोनारावर छापा घालीत त्याच्याकडून 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या साई पादुका हस्तगत केल्या. या यशाने तालुका पोलिसांवरील निष्क्रियतेचा डाग पुसण्यासाठी मोठी मदत होण्यासह पोलिसांचे मनोबलही वाढणार आहे.

Visits: 14 Today: 5 Total: 1443257

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *