संगमनेरात वृक्षसंवर्धनासाठी ‘गोवर्यांच्या सरणा’चा जागर! एका अंत्यविधीसाठी एका झाडाचा बळी; निसर्ग वाचवण्यासाठी ‘जीवदया’चा पुढाकार..

श्याम तिवारी, संगमनेर
हिंदू संस्कृतीमध्ये मानवी जीवनातील ‘सोळा संस्कारां’त ‘अंत्येष्टी’ म्हणजेच अंतिम संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘भस्मान्तं शरीरम्’ असे म्हणत ईश्वराने दिलेला हा देह पुन्हा पंचमहाभूतात विलीन करताना तो सृष्टीला पूरक असावा, हाच उदात्त विचार आपल्या पूर्वजांनी मांडला आहे. मात्र, सध्याच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळे जंगले नष्ट होत असताना, अंत्यविधीसाठी होणारी वृक्षतोड चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील ‘जीवदया गोरक्षण मंडळाने’ लाकडांऐवजी गोवंशाच्या गोवर्यांपासून अंत्यविधी करण्याची पर्यावरणपूरक सुविधा सुरु करुन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

आजच्या घडीला संगमनेर नगरपालिकेकडून हिंदू नागरिकांच्या अंत्यविधीसाठी मोफत लाकडे पुरवली जातात. एका अंत्यविधीसाठी साधारणतः सात मण (सुमारे 280 किलो) लाकडे लागतात. म्हणजेच प्रत्येक मृतदेहाच्या दहनासाठी एक पूर्ण वाढलेले झाड तोडले जाते. वर्षाकाठी होणार्या अंत्यसंस्कारांची संख्या लक्षात घेतली, तर हजारो झाडांची होणारी ही कत्तल ऋतुचक्रावर विपरित परिणाम करत आहे. याच भीषण वास्तवाचा विचार करुन, वृक्षांना जीवदान देण्यासाठी ‘गोवर्यांचे सरण’ हा सर्वोत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे.

आपल्या संस्कृतीत निसर्गाला देव मानले गेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’. जर झाडे आपले सोयरे असतील, तर आपल्या मृत्यूनंतर त्यांना जाळणे हे कितपत सुसंगत आहे?. पुराणांमध्येही गोमयाला (शेणाला) अत्यंत पवित्र मानले गेले आहे. गोवर्यांच्या दहनातून निघणारा धूर वातावरणातील शुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरतो, असे मानले जाते. ‘पंचमहाभूतात विलीन होताना आपण निसर्गाचे देणे लागतो’ या भावनेतून गोवर्यांचा वापर करणे हा खर्या अर्थाने मृतात्म्याला निसर्गाशी जोडणारा विधी ठरु शकतो.

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अप्पासाहेब केसेकर यांच्या अंत्यविधीसाठी ज्याप्रमाणे गोवर्यांचा वापर झाला, त्याच धर्तीवर संगमनेरमध्ये ‘जीवदया’ ही सेवा देणार आहे. शास्त्रोक्त पद्धत, लोखंडी सांगाड्यात गोवर्यांची रचना, शुद्ध तूप आणि कापूर वापरुन हा विधी पूर्ण केला जाईल. लाकडांच्या तुलनेत गोवर्यांच्या सरणामुळे अंत्यविधी केवळ 3 ते 4 तासांत पूर्ण होईल. त्यामुळे मृतात्म्याच्या नातेवाईकांना सावडण्यासाठी दुसर्या दिवसाची वाट पहावी लागणार नाही. विधीपूर्वी स्वयंसेवकांमार्फत परिसरात रांगोळी घालून या विधीचे पावित्र्यही राखले जाते. लाकडांसाठी पालिकेला येणार्या खर्चाच्या मर्यादेतच ही सेवा उपलब्ध होणार आहे.

संगमनेर नगरपालिकेकडून वखार चालकांना लाकडांसाठी जो मोबदला दिला जातो, तोच गोवर्यांच्या पर्यायासाठी वळवला, तर शहरातील पर्यावरण रक्षणाला मोठी गती मिळेल. ‘जीवदया गोरक्षण मंडळाचे’ संचालक राजू दोशी यांच्या मते, तालुक्याच्या ग्रामीण भागात ही सेवा आधीपासूनच सुरु आहे, आता संगमनेर शहरासाठी विशेष वाहन आणि स्वयंसेवकांची टीम तैनात करण्यात आली आहे.

मृत्यूनंतरही सृष्टीला काहीतरी देऊन जाण्याची ही भावना आता संगमनेरकरांमध्ये रुजत आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे केवळ झाडेच वाचणार नाहीत, तर गोवंशाचे रक्षण होऊन मृतात्म्यालाही खर्या अर्थाने ‘शांती’ लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अलिकडच्या काळात वृक्षसंवर्धनाचा विषय अतिशय गरजेचा झाला असून त्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपायही योेजले जात आहेत. अशात अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी गोवंशाच्या गोवर्यांचा वापर सुरु झाल्यास अनेक झाडांची कत्तल वाचण्यासह पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. गोवर्यांमधून शुद्ध धूर निघत असल्याने त्याचा पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नाही, उलट त्यामुळे परिसरातील वातावरणाचे पावित्र्य वाढते. त्यामुळे पालिकेनेच या विषयात पुढाकार घेतल्यास संगमनेरात पर्यावरण चळवळीचा नवा अध्याय लिहीला जावू शकतो. याचा विचार करुन लाकडांशिवाय अंत्यसंस्काराचा आग्रह होण्याची गरज आहे.

