पुरोहित प्रतिष्ठानची फलकाच्या माध्यमातून जनजागृती
पुरोहित प्रतिष्ठानची फलकाच्या माध्यमातून जनजागृती
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दशक्रिया विधीप्रसंगी सर्व नियमांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व सुरक्षेची शंभर टक्के खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याने पुरोहित प्रतिष्ठानने (संगमनेर पुरोहित संघ) महत्वपूर्ण सात मुद्यांचा समावेश असलेला फलक जनजागृतीच्या उद्देशाने प्रवरा नदीच्या तीरावर केशवतीर्थ येथे उभारला आहे. रविवारी त्याचे अनावरण संघाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून संघाने केलेल्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याबाबत माहिती देताना संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी म्हणाले की, कोणाच्याही परिवारातील व्यक्तीचे निधन ही अतिशय दुःखद घटना असते. पण सध्याच्या परिस्थितीत आपण सर्वांनी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून काही गोष्टींचे काटेकोर पालन केले तर आपल्यासह सर्वांच्याच जीविताच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरेल असे वाटते. त्यामुळे आम्ही हा फलक उभारण्याचा निर्णय घेतला. दशक्रिया विधीसाठी परिवारातील सदस्य व अत्यंत जवळचे मोजकेच नातेवाईक यांची उपस्थिती असावी. प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधावा आणि एकमेकांपासून दूर बसावे. सॅनिटायझरची व्यवस्था आवर्जून करावी. लहान मुले आणि वृध्द यांना विधीसाठी कृपया आणू नये. गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना विधीसाठी बोलावू नये. सदर परिसरात कोठेही कोणीही थुंकू नये. काहीवेळा एकाचवेळी अनेक विधी असतात त्यावेळी आपसात समजूतदारपणा दाखवावा. गर्दी वाढणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करुन जाखडी म्हणाले, सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही दिवंगत व्यक्तीला भावपूर्ण कृतीशील श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी संदीप वैद्य, महेश मुळे, योगेश म्हाळस, सागर काळे आदी उपस्थित होते.

