संगमनेर नगरपालिकेत राबवला जाणार ‘तांबे पॅटर्न’! रोटेशन पद्धतीने ‘स्वीकृत’ची निवड; पाच वर्षात पंधराजणांना संधी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समितीने’ मिळवलेला विजय केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो राजकीय कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना ठरला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला असलेल्या प्रतिकूल वातावरणाचे रुपांतर ऐतिहासिक विजयात केल्यानंतर, आता आमदार तांबे यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत घेतलेला ‘रोटेशन’चा निर्णय जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यकर्त्यांची निष्ठा आणि शासनाचे निकष यांची सांगड घालत, एका वर्षासाठी एक स्वीकृत सदस्य याप्रमाणे पाच वर्षांत 15 जणांना संधी देण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पहिले लाभार्थी कोण ठरतात याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकांमधील निकालाच्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांनी सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, आमदार सत्यजित तांबे यांनी अत्यंत संयम आणि राजकीय चातुर्याने आपली रणनीती आखली. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवत त्यांनी प्रत्येक प्रभागात वैयक्तिक लक्ष दिले. सुरुवातीला काहीसे नकारात्मक वाटणारे चित्र त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर फिरवले आणि विरोधकांना चारी मुंड्या चीत करत पालिकेवर सेवा समितीचा झेंडा फडकवला.

निवडणुकीपूर्वी सेवा समितीकडून तिकिटासाठी इच्छुकांची संख्याही खूप मोठी होती. मात्र त्यावेळी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी केवळ आमदार तांबे यांच्या शब्दाखातर आपल्या उमेदवारीवर पाणी सोडले होते. ‘शहराच्या विकासासाठी आज माघार घ्या, तुमचा विचार स्वीकृत सदस्य म्हणून केला जाईल’ असा शब्द त्यावेळी काहींना देण्यात आला होता. आता विजय मिळाल्यानंतर या शब्दाची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर उभे राहीले आहे. त्यातच नियमानुसार नामनिर्देशीत (स्वीकृत) सदस्य निवडताना नगररचना, शिक्षण, आरोग्य किंवा सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांचीच निवड करावी असे कडक शासकीय निकष आहेत, त्याचे पालन करण्याचेही बंधन पालिकांवर आहे.

त्यामुळे शब्द दिलेल्या अथवा न दिलेल्या अशा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या त्यांनाही अवघड आहे. मात्र असे असले तरीही, त्यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्यासाठी एक अभिनव सूत्र शोधून काढले आहे. त्यानुसार आता संगमनेर नगरपालिकेत पाच वर्षांसाठी नव्हेतर दरवर्षी रोटेशन पद्धतीने तीन नामनिर्देशीत (स्वीकृत) सदस्य निवडले जाणार आहेत. त्यातून पाच वर्षात पंधरा कार्यकर्त्यांना ‘नगरसेवक’ म्हणून काम करण्याची संधी मिळेल. संगमनेरप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांमध्येही अशीच स्थिती आहे. सर्वच ठिकाणी स्वीकृतसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तेथील नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झालेला आणि त्यातूनच दरवर्षीच्या सूत्राची सूप्त चर्चा सुरु असतानाच आमदार तांबे यांनी अशा प्रकारे रोटेशन पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर करुन राज्याच्या राजकारणाला नवा ‘तांबे पॅटर्न’ दिला आहे.

या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे ‘थोरात-तांबे’ यांच्यासोबत निष्ठेने काम करणार्या, मात्र निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहिलेल्या त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यातून सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन जास्तीत जास्त लोकांना प्रशासकीय कामाचा अनुभवही घेता येणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांचा हा निर्णय केवळ राजकीय तडजोड नसून, ती कार्यकर्त्यांप्रती असलेली त्यांची कृतज्ञता आहे. सत्तेत सर्वांचा सहभाग असावा आणि दिलेला शब्द पाळला जावा, ही संस्कृती या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शासनाच्या निकषांची पूर्तता करतानाच, ‘पात्र’ असणार्या कार्यकर्त्यांना संधी देऊन शहराच्या विकासात त्यांच्या अनुभवाचा वापर करुन घेण्याचा संगमनेर सेवा समितीचा हा निर्णय राज्यात चर्चेत ठरणार आहे.

संगमनेरच्या या ‘रोटेशन मॉडेल’ची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. अनेक मोठ्या नगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरुन वाद होत असताना, संगमनेरने मात्र सामंजस्याने आणि नियोजनाने हा प्रश्न सोडवला आहे. या निर्णयातून आमदार सत्यजित तांबे यांच्या राजकीय कौशल्याची झलकही अनुभवायला मिळाली आहे. चालू आठवड्यात अध्यक्षांच्या सूचनेवरुन बोलावण्यात येणार्या सभेत या निवडी होणार आहेत. राज्याच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच स्वीकृत सदस्य निवडीसाठी ‘रोटेशन’ पद्धतीचा वापर होत असल्याने संगमनेरचा हा ‘तांबे पॅटर्न’ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिशादर्शक ठरु शकतो. या ऐतिहासिक निर्णयाचे पहिले तीन लाभार्थी कोण ठरणार? यावरुन आता संगमनेरात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

राज्यातील नगरपालिकांमधील नामनिर्देशीत सदस्याची निवड करताना शासनाच्या कठोर नियमांचे पालन करणे बंधनकारक असते, अन्यथा अशा सदस्याची निवड रद्द होवू शकते. संगमनेर नगरपालिकेत एकूण तीन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. शासकीय निकषांप्रमाणे नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी (डॉक्टर), शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ति, सनदी लेखापाल, वकील, अभियंता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त असलेली व्यक्ति अथवा पालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेत ‘पदाधिकारी’ म्हणून किमान पाच वर्ष काम केल्याचा अधिकृत पुरावा असलेली व्यक्तिच स्वीकृतसाठी पात्र ठरु शकते. या निकषांशिवाय निवड होणार्या सदस्यांच्या पात्रतेबाबत तक्रार दाखल झाल्यास त्याची निवड रद्दही होवू शकते. त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर आमदार सत्यजित तांबे यांना आता स्वीकृतचे शिवधनुष्य पेलण्याचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

संगमनेर सेवा समितीवर संगमनेरकरांनी दाखवलेला प्रचंड विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. त्या अनुषंगाने शहराच्या विकासासाठी आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्ष
कालबद्ध पद्धतीने काम करणार आहोत. निवडणुकीदरम्यान इच्छुकांची मोठी संख्या असल्याने अनेकांच्या इच्छांना मुरड घालून त्यांना थांबण्याची विनंती केली होती. अनेकांनी आमच्या शब्दाला मानही दिला, त्यांच्याप्रती आम्ही नेहमीच कृतज्ञ आहोत. काहींना स्वीकृतसाठी शब्दही दिला होता. त्याची पूर्तता करताना शासनाचे निकषही विचारात घ्यावे लागणार आहेत. समाजातील चांगल्या मंडळींचा शहराच्या विकासाला हातभार लागावा, त्यांच्या कल्पनेतून आपले शहर अधिक समृद्ध व्हावे या विचारातून स्वीकृत सदस्यांच्या निवडी व्हाव्यात अशी माझी मनशा आहे.
आमदार सत्यजित तांबे
सदस्य : विधान परिषद

