सहा दशकानंतर मालपाणी परिवार पालिकेच्या राजकारणात! रचना मालपाणी स्वीकृत सदस्यपदी; सोमेश्‍वर दिवटेंसह जावेद पठाण यांचीही वर्णी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करीत जवळजवळ एकहाती सत्ता राखणार्‍या संगमनेर सेवा समितीने संगमनेरकरांना सलग दुसरा धक्का दिला आहे. यावेळच्या निवडणुकीत रणनीतीचा भाग म्हणून आमदार सत्यजीत तांबे यांनी मतांची गोळाबेरीज करताना काही प्रभागांमधील इच्छुकांचे ताबूत शांत केले होते, त्यासाठी काहींना ‘स्वीकृत’चा शब्दही देण्यात आला होता. त्यातच निवडणुकीशिवाय नगरसेवक होवू इच्छिणार्‍या निष्ठावानांची संख्याही मोठी असल्याने प्रत्यक्ष स्वीकृतांची निवड करताना आमदार तांबे यांचा कस लागणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी येथेही बाजी मारताना विकासाचे व्हिजन आणि शासकीय निकष यांचा उत्तम समन्वय साधून तब्बल सहा दशकानंतर संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात प्रचंड योगदान असलेल्या मालपाणी परिवारातील सदस्यासह माजी नगरसेवक सोमेश्‍वर दिवटे व जावेद पठाण यांच्या नावाची घोषणा करीत संगमनेरकरांना आश्‍चर्याचा सलग दुसरा धक्का दिला आहे. त्यांच्या या निर्णयातून निवडणुकीदरम्यान त्यांनी मांडलेल्या ‘संगमनेर 2.0’ या संकल्पनेबाबत ते किती गंभीर आहेत याचाही आता अंदाज येवू लागला आहे.


नुकत्याच पार पडलेल्या पालिकांच्या निवडणुकीत नकारात्मक वातावरणाला कलाटणी देत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या गटाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. डिसेंबर 2025 मध्ये झालेली निवडणूक वास्तविक डिसेंबर 2021 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र राज्यात झालेली उलथापालथ आणि त्यानंतर विविध कारणांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका यामुळे प्रदीर्घकाळ पालिकांवर प्रशासकांचे राज्य राहिले. त्यातच तब्बल दहा वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांच्या संख्येतही प्रचंड भर पडली होती. मतांचे विभाजन टाळण्यासाठी अशा इच्छुकांच्या महत्त्वकांक्षाना मूरड घालण्याचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी मोठ्या कौशल्याने संगमनेर शहरातील सर्व 15 प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यासह तेथील संभाव्य मतविभाजनाचे मार्गही बंद केले. या दरम्यान काहींना थोपवण्यासाठी त्यांना स्वीकृतसाठी विचार करण्याचा शब्दही दिला गेला.


यासर्वांचा परिपाक नकारात्मक वातावरण, इच्छुकांची प्रचंड गर्दी, विधानसभेतील मतपरिवर्तानामुळे मनोधैर्य उंचावलेले विरोधक आणि सत्तेचे पाठबळ नसतानाही आमदार तांबे यांनी आपले नेतृत्व सर्वमान्य करताना पालिकेच्या इतिहासातील सर्वाधीक सुवर्ण विजय प्राप्त केला. साहजिकच या विजयामुळे स्वीकृत सदस्य होवू इच्छिणार्‍यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. निवडणुकीदरम्यान समजूत घालण्यासाठी शब्द दिलेले इच्छुक आणि गेल्या अनेक दशकांपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहुनही थोरात-तांबे यांच्याशी अतिशय निष्ठेने राहिलेले कार्यकर्ते यांचीही त्यात भर पडल्याने अवघ्या तीन स्वीकृत सदस्यांची निवड करण्याचे दिव्य त्यांच्यासमोर उभे होते. त्यातूनच दरवर्षी तीन याप्रमाणे पाच वर्षात 15 स्वीकृत सदस्यांना संधी देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.


महाराष्ट्र नगरपंचायती अधिनियमानुसार स्वीकृत सदस्याची निवड करताना काही निकष असल्याने त्याचे पालन करणेही पालिकांसाठी बंधनकारक असते. अशावेळी सरसकट कोणत्याही कार्यकर्त्यांची केवळ निष्ठावान म्हणून निवड करणं अवघड असल्याने त्यातून आमदार तांबे कसा मार्ग काढतात याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. त्यातून सुवर्णमध्ये काढताना निवडणूक निकालांसह स्वीकृत निवडीतही त्यांनी बाजी मारली असून दिवंगत उद्योगपती व पालिकेचे माजी नगराध्यक्ष ओंकारनाथ मालपाणी यांच्या स्नूषा रचना मनीष मालपाणी यांच्या रुपाने त्यांनी तब्बल सहा दशकानंतर मालपाणी परिवाराला पालिकेच्या राजकारणाशी जोडले आहे.


दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी यांनी 20 नोव्हेंबर 1962 ते 22 डिसेंबर 1965 या तीन वर्षांच्या काळासाठी संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या कार्यकाळात कर्मचार्‍यांना लागलेली कामाची शिस्त आणि सार्वजनिक कामांबाबत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी याबाबतचे मापदंड निर्माण झाले. पालिकेच्या इतिहासात त्यांचा कार्यकाळ आजही आदर्शवत मानला जातो. मात्र 1965 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी अथवा त्यांच्या परिवारातील अन्य कोणीही आजवर पालिकेच्या राजकारणाकडे पाहिले नाही.


यावेळी निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वी नगराध्यक्षपदासाठी रचना मालपाणी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र नंतर ती अफवा ठरली. मालपाणी परिवाराचे संगमनेरच्या जडणघडणीतील योगदान व या परिवाराच्या सामाजिक कार्याचा प्रचंड आवाका यांचा विचार करुन मनीष मालपाणी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशा चर्चा यापूर्वीही अनेकदा झाल्या. मात्र प्रत्येकवेळी त्या चर्चाच राहिल्या. यावेळी मात्र आमदार सत्यजीत तांबे यांनी मालपाणी परिवाराचे सामाजिक योगदान विचारात घेता महिला व पर्यावरण क्षेत्रात मोठे काम उभे करणार्‍या रचना मालपाणी यांना पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी काम करण्याची विनंती केली आणि त्यांनीही नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्साहित असल्याची प्रतिक्रीया दिल्याने त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड केली गेली आहे.


त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक व आमदार तांबे यांचे निष्ठावान मानल्या जाणार्‍या सोमेश्‍वर दिवटे व जावेद पठाण यांचीही स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमदार तांबे यांनी जाहीर केल्याप्रमाणे दरवर्षी तीन याप्रमाणे पाच वर्षात 15 जणांना स्वीकृतपदी काम करण्याची संधी दिली जाणार आहे.


संगमनेरच्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात मालपाणी परिवाराचे योगदान खूप मोठे आहे. यापूर्वी दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ मालपाणी पालिकेच्या राजकारणात सक्रिय असताना 1962 ते 1965 या तीन वर्षांसाठी त्यांनी पालिकेचे नगराध्यक्षपदही भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात कर्मचार्‍यांना लागलेली शिस्त आणि शहरातील विकास कामांबाबत त्यांनी निर्माण केलेला आदर्श आजही चर्चीला जातो. 1965 सालच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी अथवा त्यांच्या परिवारातील कोणीही आजवर पालिकेच्या राजकारणात लक्ष घातले नाही. यावेळी मात्र आमदार सत्यजीत तांबे यांनी सामाजिक कार्यकर्त्या रचना मालपाणी यांच्या माध्यमातून या परिवाराला पुन्हा एकदा पालिकेच्या राजकारणात सक्रिय करण्यात यश मिळवले आहे.

Visits: 123 Today: 3 Total: 1442317

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *