कोविड नियमांकडे केलेले दुर्लक्ष ‘अखेर’ भोवलेच! संगमनेरातील नामचीन सुवर्णपेढीसह दोन दुकानांना लागले महिनाभरासाठी ‘सील’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन अवाजवी गर्दी करणार्या दुकानांवर कारवाई करण्याची मोकळीक मिळून 24 तास उलटायच्या आंतच स्थानिक प्रशासनाने संगमनेरातील तीन दुकाने ‘सील’ केली आहेत. प्रशासकीय पथकाने आज संगमनेरातील बहुतेक भागात अचानक छापासत्र राबवून दुकानांची तपासणी केली. यात नवीन नगर रस्त्यावरील प्रवरा मेडिकल, बसस्थानकावरील चंदुकाका सराफ सुवर्णपेढी आणि मालपाणी रस्त्यावरील राजबक्षी वडा सेंटर ही तीन दुकाने महिनाभरासाठी ‘सील’ करण्यात आली आहेत. या कारवाईने संपूर्ण संगमनेरात एकच खळबळ उडाली असून शहरातील अन्य व्यापारी सावध झाले आहेत.
जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले शुक्रवारी (ता.19) दुपारी संगमनेरात आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेवून कोविडची सद्यस्थिती आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना यावर मंथन केले. दुकानांमध्ये अवाजवी गर्दी होते व दुकानदारासह ग्राहकही कोविड नियमांकडे दुर्लक्ष करतात व विनामास्क वावरतात असा सूर या बैठकीतून समोर आला. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना मास्कशिवाय फिरणार्यांवर सक्तिने कारवाईचे आदेश दिले.
त्यासोबतच ज्या दुकानांमध्ये सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष करुन मास्क शिवाय दुकानदार अथवा ग्राहक आढळेल ते दुकान त्याच क्षणी महिनाभर ‘सील’ करण्याचे आदेश दिले. सोबतच हा नियम तालुक्यातील मंगल कार्यालये, लॉन्स व अन्य आस्थापनांनाही लागू करावा व कोणचाही मुलाहिजा न सांभाळता धडक कारवाई करावी असे सक्तिचे आदेशही स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, इंन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहाय्यक फौजदार रावसाहेब कदम आदींनी शहरातील विविध भागात फिरुन कोविड नियमांचे उल्लंघन करणार्यांचा शोध सुरु केला.
यावेळी मेनरोडवरील एका प्रसिद्ध कापड दुकानातही तपासणी करण्यात आली. मात्र सदर आस्थापनेकडून कोविडबाबत अतिशय कटाक्षाने नियमांचे पालन केले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी नवीन नगर रस्त्याच्या वळणावरच असलेल्या प्रवरा मेडिकलसह श्री.ओंकारनाथ मालपाणी मार्गावरील राजबक्षी वडा सेंटर आणि बसस्थानकावरील चंदुकाका सराफ या ख्यातनाम सुवर्ण पेढीत कोविडकडे सपशेल दुर्लक्ष करुन दुकानातील कर्मचार्यांसह मोठ्या संख्येने असलेले ग्राहकही विनामास्क आणि सामाजिक अंतराशिवाय वावरतांना आढळून आल्याने पथकाने धडक कारवाई करीत वरील तिनही आस्थापने ‘सील’ केली आहेत.
संगमनेर तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. नागरिकांकउून कोविडच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष त्यामागचे मुख्य कारण आहे. नियमांची सक्तिने अंमलबजावणी हाच कोविडला पराभव करण्याचा एकमेव मंत्र असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणताही दबाव झुगारुन पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धडक कारवाई करावी अशी थेट मोकळीकच त्यांनी दिली होती, त्याचा परिणाम अवध्या चोवीस तासांतच समोर आला असून यापुढे कोविडकडे दुर्लक्ष करुन ‘बिनधास्त’ वावरणार्यांची गय नाही हे या कारवायातून अधोरेखीत झाले आहे.