प्रवरा नदीपात्रात हजारो मासे मृतावस्थेत आढळले श्रीरामपूर-राहुरी तालुक्यातील नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला संताप

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखानदारी राज्याला परिचित आहे. मात्र, या कारखान्यांतून प्रवरा नदीपात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याने श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात हजारो मासे मृतावस्थेत आढळले आहे. यामुळे साखर कारखान्यातून येणार्या दूषित पाण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

अहमदनगर जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा यांसह छोटी-मोठी धरणे आहेत. तर मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी, गोदावरी, सीना आदी नद्या वाहत असल्याने जिल्हा समृद्ध झाला आहे. उत्तर नगर जिल्ह्यात तर सगळीकडेच ऊस पाहायला मिळतो. यामुळे येथील कारखानदारी देखील अग्रेसर आहे. मात्र, शेतकर्यांचे हित जोपासताना कारखान्यांकडून सोयीस्कररित्या पर्यावरणाला बाधा पोहोचत आहे. कारखान्यातून निघणारे दूषित पाणी थेट प्रवरा नदीत जात असल्याने पाण्यावर लाल रंगाचा तरंग आला आहे. यातून हजारो मासे मृत्यूमुखी पडले असून, हजारो मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जाते. शिवाय, विषारी पदार्थ नदीत सोडल्याने हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. नदीकाठी मृत हजारो मासे आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची संभावना असल्याने संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील कारखान्यांनी प्रवरा नदीत दूषित पाणी सोडल्याने हजारो माशांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नसून, नागरिकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर पाण्यावर लाल तरंग आला असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. संबंधित विभागाने याची लवकरात लवकर दखल घेऊन ही समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
