राज्यातील पतसंस्था एप्रिल महिन्यात बेमुदत आंदोलन करणार! सहकार संवाद कार्यशाळेत पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटेंचा इशारा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाच्या धर्तीवर राज्यातील सर्व पतसंस्था एप्रिल महिन्यात मुंबईत बेमुदत आंदोलन करणार आहे. राज्यातील हजारो पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी मंत्र्यालायावर धडक देणार आहे. त्यांची संख्या लाखांत असणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय तेथून माघार घेतली जाणार नाही, असा इशारा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिला आहे.
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्यावतीने नाशिक विभागातील पतसंस्थांच्या सहकार संवाद कार्यशाळा संगमनेरमध्ये झाली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. राज्यातील पतसंस्थांच्या अनेक मागण्यांकडे वर्षानुवर्ष प्रत्येक सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शांत न बसता सरकारला जाग आणण्यासाठी पतसंस्था चळवळीने बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सहकारी पतसंस्थांमधून आता लवकरच स्वतःचे सहकार क्रेडीट कार्ड, मोबाईल क्यूआर कोड मार्फत व्यवहार अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा ग्राहकांसाठी सुरु करण्याचे नियोजन आहे.
मात्र, राज्य सरकारकडून आम्हाला सहकार्य मिळत नाही. बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, मग पतसंस्थांच्या ठेवींना का नाही? पतसंस्थांवर नियामक मंडळ लादून अंशदान वसूल करण्याचा जाचक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यास आमचा तीव्र विरोध आहे, त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कोयटे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित असलेले आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी नियामक मंडळ आणणे हा निर्णय सरकारने चुकीचा घेतला असल्याची कबुलीही दिली. कर्ज वसुलीच्या बाबतीतही कायद्यात सुधारणे होणे आवश्यक असल्याचे त्यांनी मान्य केले. पतसंस्था फेडरेशनने मांडलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करणे योग्य आहे. मात्र, राज्यातील पतसंस्थांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर या समस्या मांडणार आहे, असे तांबे म्हणाले. या कार्यशाळेत राज्यभरातील पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन झाले. यावेळी नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, पतसंस्था फेडरेशचे महासचिव शांतीलाल सिंगी, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर यांच्यासह अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पतसंस्थांचे सुमारे 700 प्रतिनिधी उपस्थित होते.