संगमनेरात पुन्हा कोयता गँगची दहशत! आता जाणताराजा मैदानावर धिंगाणा; शहर पोलिसांकडून तिघांवर कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मध्यंतरी पुण्यासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणार्या शहरात अचानक दहशत माजवणार्या कोयता गँगची चर्चा सोशल माध्यमातून गाजत असताना संगमनेरातही त्याचे लोण येवून धडकले होते. त्यावेळी शहरातील कुख्यात पावडे टोळीतील आठजणांनी श्रीरामनगर परिसरातील एका दुकानदाराला मारहाण करण्यासह कोयता हवेत फिरवून सिनेस्टाईल धमकी देत दहशत निर्माण केली होती. अर्थात त्यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपींच्या मुसक्याही आवळल्या होत्या. चार महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये घडलेल्या ‘त्या’ घटनेची गुरुवारी संगमनेरात पुनरावृत्ती झाली. यावेळी एकाने हातात कोयता मिरवत आपल्या दोघा साथीदारांसह चक्क उच्चभ्रु लोकवसाहतीचा परिसर असलेल्या जाणताराजा मैदानाजवळच दहशत निर्माण केली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अतिशय वर्दळीच्या वेळी हा प्रकार घडला. आसपास खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांची रेलचेल असल्याने यावेळी अबालवृद्धांसह महिलांचीही परिसरात मोठी गर्दी असते. अशावेळी तिघांनी कोयता घेत लोकांना धमक्या भरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी काही मिनिटांतच घटनास्थळावर धाव घेत तिघाही आरोपींना जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातील कोयता काढून घेतला. या प्रकरणी भारतीय शस्त्र कायद्यान्वये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निनावी फोनद्वारे जाणताराजा मैदानाजवळ तिघेजण हातात कोयता घेवून शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळाली. शहरातील हा परिसर अतिशय उच्चभ्रु लोकवस्तीचा समजला जातो. माजीमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, मनीष मालपाणी यांची निवासस्थानेही याच परिसरात आहेत. त्यातच जाणताराजा मैदानापासून महामार्गाकडे जाणार्या वळणावर मोकळ्या मैदानात खाद्य संस्कृती पोसली गेल्याने फास्टफूड व अन्य खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांनी हा भाग गजबजलेला असतो. सायंकाळची वेळ म्हणजे या परिसरात मोठी गर्दी दाटलेली असते. अशावेळी कोयता घेवून तिघांकडून सुरु असलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षकांनी तात्काळ आपल्या गस्तीपथकाशी संपर्क केला.

सुदैवाने यावेळी पोलिसांचे गस्तीपथक मालदाडरोड परिसरात असल्याने जाणताराजा मैदानावरील प्रकार समजताच अवघ्या काही मिनिटांतच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी तिघांकडून रस्त्यावर आरडाओरड व शिवीगाळ सुरु असल्याचे व त्यातील एकाच्या हाता लोखंडी पात्याचा कोयता असल्याचेही पोलिसांनी पाहिले. प्रसंगावधान राखून पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांनी कोयता हाती असलेल्या आरोपीला जेरबंद केले, तर उर्वरीत पथकाने त्याच्या दोघा साथीदारांना पकडून तिघानांही पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी पो.कॉ.मुकरे यांच्या तक्रारीवरुन आरोपी समीर ज्ञानेश्वर सोनवणे (वय 24, व्यवसाय शेती), यश दत्तू सोनवणे (वय 18, व्यवसाय हॉटेल, दोघेही रा.पिंपळमळा, वेल्हाळे) व सुदर्शन संजय नवले (वय 24, व्यवसाय शेती, रा.मालदाड) अशा तिघांवर भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत मुकरे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल सातपुते, हासे, कॉन्स्टेबल पांडे, राठोड, क्षीरसागर, नागरे, खुळे आदी पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता.

मध्यंतरी सांस्कृतिक शहर म्हटल्या जाणार्या पुण्यात अचानक कोयता गँग नावाची जमात जन्माला आली होती. हातात कोयता घेवून मनाला वाटेल त्याला धमकावण्याचे, तोडफोड करुन मारहाण करण्याचे प्रकार वाढीस लागले होते. सोशल माध्यमातील व्हायरल व्हिडिओंमधून हा प्रकार राज्यभर पसरल्याने मोठी दहशत निर्माण झाली होती. पुणे पोलिसांकडून अशा टोळ्यांच्या पायात बेड्या ठोकण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे लोण 140 किलोमीटर अंतरावरील संगमनेर शहरातही येवून पोहोचले. गेल्यावर्षी 9 सप्टेंबररोजी कुख्यात धिरज पावडे टोळीच्या सूत्रधाराने हातात कोयता घेवून श्रीराम नगरमधील शिरीष शहाणे या दुकानदारावर दहशत निर्माण केली होती.

सायंकाळच्या सुमारास सदरील दुकानदार व त्यांचा कर्मचारी बाळासाहेब भुजबळ यांना धमकावत पावडेने गल्ल्यातील दहा हजारांच्या रोकडसह मालकाच्या गळ्यातील सुवर्णहारही ओरबाडून घेतला होता. अशाच प्रकारे सायंकाळी वर्दळीच्या वेळी घडलेल्या ‘त्या’ प्रसंगात दुकानदाराने बाहेर जमलेल्या गर्दीला मदतीचे आवाहनही केले होते, मात्र पावडेच्या हातात लखलखता कोयता असल्याने कोणीही त्याच्या मदतीला जाण्याची हिम्मत केली नाही. उलट त्यावेळी उन्मत्त झालेल्या धिरज पावडेने हातातील कोयता हवेत उंचावून आसपास जमलेल्या लोकांना ‘खबरदार, जर कोणी पुढे याल तर, त्यालाही तोडून टाकील..’ अशी सिनस्टाईल धमकी भरताना दहशत निर्माण केली आणि तेथून जाताजाताही त्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून घेतले होते. त्या प्रकरणात धिरज पावडेसह त्याच्या टोळीतील दीपक वैराळ, संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या, पिल्या घोडेकर, वरद लोहोकरे, निखिल उर्फ अजय विजय वाल्हेकर अशा आठजणांवर कारवाई केली होती. चार महिन्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने या दहशतीवर पडदा पडला.

