निकालाच्या प्रतिक्षेत तीन प्रभागातील निवडणूक दुर्लक्षीत! आज होता माघारीचा अखेरचा दिवस; उद्यापासून उडणार प्रचाराचा धुरळा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रत्यक्ष मतदान होवूनही अवघ्या तीन जागांवरील निवडणूक लांबल्याने पालिका निवडणुकांच्या निकालाची उत्कंठा दिवसोंदिवस शिगेला पोहोचत आहे. त्यातच सध्या वातावरणातील गारठ्यातही प्रचंड वाढ झाल्याने सूर्यास्तानंतर पेटणार्या शेकोट्यांभोवती रोजच नवनवीन आकडेमोड घेवून निकालाचा अंदाज सांगणार्यांचे फड रंगात येत आहेत. त्यातून खोळंबलेल्या तीन प्रभागातील निवडणुकांकडे मात्र दुर्लक्ष झाले असून आज प्रत्यक्ष माघारीचा अंतिम दिवस मावळल्यानंतरही या प्रभागातील निवडणुकांबाबत फारशी चर्चा सुरु झालेली नाही. विशेष म्हणजे यातील एका प्रभागात पालिका कारभाराचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या माजी नगराध्यक्षांचा सामना नवख्या तरुणाशी होत असून ही लढत सर्वाधीक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे, मात्र त्या उपरांतही अद्याप प्रलंबित निवडणुकीचे वातावरण तापलेले नाही. उद्या उमेदवारांच्या अंतिम यादीसह चिन्ह वाटप झाल्यानंतर या तीन जागांसाठी प्रचाराचा धुरळा उडणार असून त्यानंतरच प्रलंबित निवडणूक चर्चेत येण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षातील विविध नाट्यमय घडामोडी, सत्तांतर नाट्य, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अशा वेगवेगळ्या कारणांनी खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांनी
सुरुवात झाली. मात्र त्यातही सुमारे 57 नगरपालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने तेथील निवडणूका होवूनही निकालांबाबत साशंकता असतानाच छाननीमध्ये घेण्यात आलेल्या आक्षेपांविरोधात जिल्हा न्यायालयाचा निकाल मिळण्यास विलंब झाल्याच्या कारणावरुन राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगरपालिकांच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसह काही ठिकाणच्या आक्षेप असलेल्या प्रभागांची निवडणूक स्थगित करुन अशा जागांसाठी स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम राबवण्याचा निर्णय जाहीर केला.

त्याचा फटका तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक प्रक्रिया अनुभवत असलेल्या संगमनेर नगरपालिकेलाही बसला. उमेदवार छाननीत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी प्रभाग एक (ब) मधील ऋषिकेश आरोटे यांच्या नामनिर्देशन पत्रातील सूचकाचे नाव पूर्वीच्या नामनिर्देशन पत्रातही असल्या कारणाने त्यांचा अर्ज बाद ठरवला होता. त्यावरील अपिलात जिल्हा न्यायालयाने 25
नोव्हेंबररोजीच्या सुनावणीत निवडणूक अधिकार्यांचा निर्णय कायम ठेवला. प्रभाग दोन (ब) मधील सुवर्णा दत्तात्रय म्हस्के यांच्या नामनिर्देशन पत्रातील जोडपत्र दोनमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाने 24 नोव्हेंबररोजी त्यावर सुनावणी घेत तो वैध ठरवला.

तर, प्रभाग 15 (ब) मधील सईदा शेख यांच्या नामनिर्देशन पत्रातील सूचकाने यापूर्वी सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रामध्येही सूचक म्हणून स्वाक्षरी केल्याचे सांगत त्यांची उमेदवारी अवैध ठरवण्यात आली होती. त्यावरील 25 नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने शेख यांचा अर्ज कायम ठेवला. या संपूर्ण प्रक्रियेत निकाल प्राप्त करण्यास 25 नोव्हेंबर उजेडल्याने माघारीसाठी
आवश्यक वेळ मिळाला नसल्याची तक्रार अपिलात गेलेल्या उमेदवारांनी केली होती. त्यावरील निर्णयात राज्य निवडणूक आयोगाने अशा नगरपालिका व ठराविक जागांवरील 2 डिसेंबरच्या मतदानाला स्थगिती देत नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आज (ता.10) यापूर्वीच उमेदवारी दाखल असलेल्यांना माघारीची अंतिम संधी देण्यात आली होती. त्यात प्रभाग क्र.एक (ब) मधील संकेत लोंढे यांनी माघार घेतल्याने आता या प्रभागात दुरंगी लढत रंगणार आहे.

पुढील आठवड्यात शनिवारी (ता.20) संगमनेर नगरपालिकेच्या 15 प्रभागांतील प्रभाग क्रमांक एक, दोन व पंधरा या तीन प्रभागात प्रत्येक दोनपैकी एका जागेसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रभाग क्रमांक एक (ब) मध्ये होणारी लढत सर्वाधीक लक्षवेधी ठरणार असून या ठिकाणी पालिका कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांचा
सामना शिवसेनेच्या नवख्या अभिजीत उर्फ मुन्ना पुंड या तरुणाशी होणार आहे. या प्रभागातील संकेत लोंढे या अपक्ष उमेदवाराने मंगळवारी आपली उमेदवारी मागे घेतल्याने या प्रभागातील निवडणुकीची रंगतही वाढली आहे. प्रभाग क्रमांक दोन (ब) मध्ये सेवा समितीच्या अर्चना दिघे, शिवसेनेच्या इंदिरा नामन आणि राष्ट्रवादीच्या सुवर्णा म्हस्के यांच्यासह अपक्ष सुजाता एनगंदूल यांच्यात चौरंगी लढत आहे.

तर माजी उपनगराध्यक्ष इसहाकखान पठाण यांच्या प्रभागात सेवा समितीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या त्यांच्या पत्नी नसीमबानो पठाण यांचा सामना अपक्ष जुलेखा पठाण व दिलशाद शेख यांच्याशी होणार आहे. आज अर्ज माघारीच्या अखेरच्या
दिवशी या प्रभागातील रेहाना शेख व ज्यांच्या अपिलाने निवडणूक लांबली त्या सईदा शेख यांनी माघार घेतली. या तीन प्रभागातील प्रलंबित निवडणुकीमुळे गेल्या 2 डिसेंबररोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या नगराध्यक्षपदासह 27 जागांवरील निकालही रविवारी (ता.21) जाहीर होणार असल्याने तो पर्यंत संगमनेरकरांची उत्कंठा कायम राहणार आहे.

न्यायालयीन निर्णय मिळवण्यास विलंबाच्या कारणाने लांबलेल्या तीन प्रभागांमधील तीन जागांसाठी उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. या तिनही प्रभागात यापूर्वी 02 डिसेंबररोजी नगराध्यक्षपदासह प्रत्येकी एका जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून तीनही प्रभाग मिळून सरासरी 71.35 टक्के मतदान झाले होते. त्यातील
प्रभाग क्रमांक 15 मध्ये विक्रमी 75.37 टक्के मतदानाची नोंद झाली होती. आता पुढील शनिवारी पुन्हा या तिनही प्रभागात मतदान होणार असून 57 हजार 714 मतदारांमधील 11 हजार 426 (19.80 टक्के) मतदार पुन्हा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

