महावितरणच्या निषेधार्थ अकोले बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपच्यावतीने पुकारलेल्या बंदला राजूरमध्येही प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, अकोले
दोन वर्षांपासून बिकट परिस्थितीत असलेल्या शेतकर्‍यांच्या खिशातून राज्यातील हे वसुलीचे महाविकास आघाडी सरकार लूट करत आहे. महावितरणच्या माध्यामातून पूर्वसूचना न देता वीज तोडणार्‍या सरकारचा शुक्रवारी (ता.28) अकोले तालुका बंद करुन निषेध करण्यात आला. शेतकर्‍यांना व्यापारी व कष्टकरी जनतेनेही साथ दिल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे भाजप नेते तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या वीज तोडणीच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.27) दिवसभर महावितरण कंपनीच्या कार्यालयात माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलनानंतरही महावितरणने मागण्या मान्य न केल्याने अखेर भाजप कार्यालयात पिचड यांनी पत्रकार परिषद घेऊन महावितरण व शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी अकोले बंद करण्याचे आवाहन केले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, शिवाजी धुमाळ, रावसाहेब वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जे.डी.आंबरे, गोरख मालुंजकर, अ‍ॅड.वसंत मनकर, सुधाकर देशमुख, रावसाहेब वाळुंज, चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार पिचड म्हणाले, महावितरण कंपनीचे शेतकरी ग्राहक आहे. या ग्राहकांना सेवा सुविधा देणेबरोबरच वीजबिल थकले असेल तर पूर्वसूचना देवून वीज जोडणी, रोहित्र बंद करणे अपेक्षित आहे. मात्र तालुक्यात हे महावितरण व त्यांचे कर्मचारी रोहित्र बंद करतात, त्यानंतर वीजबिल देवून भरण्यास सांगतात. अतिशय काबाडकष्ट करुन मेहनतीने उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो. परंतु, राज्याची ही वीज कंपनी शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री वीज देतात, कधीही दिवसा वीज देत नाही. आपल्या तालुक्यात वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्या, तरस राजरोजपणे शेतात फिरत असतात. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक सर्पदंश अकोले तालुक्यात आहे असे असतानाही वीज कंपनी शेतकर्‍यांना रात्री 1, 2 अथवा 4 वाजता वीज देतात. त्यामुळे शेतकर्‍यांना जीवावर उदार होऊन पिकाला पाणी देण्यास जावे लागते.

पूर्वी आपल्या काळात अतिवृष्टी, दुष्काळ यामध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान येत होते. गेली दोन वर्षांपासून तर तालुक्यातील शेतकर्‍यांचे पिकांचे पंचनामे सुद्धा झालेले नाही. मात्र तालुक्यातील लोकप्रतिननिधींचे याकडे काहीच लक्ष नाही. तालुक्यातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीत जिवावार उदार होऊन पाणी भरतात यावर विधानसभेत साधा प्रश्न देखील आमदार उपस्थित करु शकले नाही. तालुक्यातील शेतकर्‍यांची वीज कोणतीही पूर्वसूचना न देता तोडली जाते यावर देखील आमदार एक शब्दही बोलत नाही. सत्ताधारी पक्षातले आमदार असूनही ते काहीच करत नाही. या पार्श्वभूमीवर महावितरणला जाब विचारण्यास अकोले कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांना वीज आकार, अधिभार आदी विषयांवर प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर देता आले नाही. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनी व राज्यातील शेतकरी विरोधी महाआघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी अकोले तालुका बंद ठेवण्याण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला अकोले शहरासह तालुक्यातील राजूरमध्येही व्यापारी, कष्टकरी जनतेने बंदमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Visits: 110 Today: 2 Total: 1419708

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *