भोकरला छप्पराच्या जळीतात सत्तर हजारांचे नुकसान! आगीचे कारण अस्पष्ट; सुदैवाने जीवितहानी टळली

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील भोकर परिसरातील वडजाई शिवारातील आबासाहेब बर्डे यांच्या छप्पराच्या घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळाल्याने या कुटुंबाचे सुमारे सत्तर हजाराचे नुकसान झाले. हे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या कुटुंबाचे केवळ अंगावरील कपडे शिल्लक राहिले. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

भोकर शिवारातील वडजाई परीसरात असलेल्या बारा खोंगळ्या तळ्याजवळ राहत असलेले आबासाहेब बर्डे हे आपल्या कुटुंंबियांसह छप्पराच्या घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छप्पराला आग लागली. परंतु त्यांना जाग आल्याने सर्व कुटुंबातील सदस्यांसह त्यांनी घराबाहेर पळ काढल्याने कुठलीही जीवितहानी अथवा जखमी झाले नसले तरी या कुटुंबाच्या केवळ अंगावरील कपड्याशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. याठिकाणी केवळ घराच्या भिंती उभ्या आहेत.

या जळीतात बर्डे कुटुंबाच्या संसारोपयोगी वस्तूसह घरात असलेले तीन गोण्या धान्य, टीव्ही, कपाट, लाकडी वस्तू, छप्पराचे बांबू व पाचरटासह सर्व उपयोगी वस्तू जळाल्या. यात या कुटुंबाचे सत्तर हजाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या दिवशी वीज पुरवठा खंडित असल्याने घरात दिवा लावलेला होता. वीज पुरवठा नसल्याने आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. दरम्यान, आगीची घटना समजताच कामगार तलाठी अशोक चितळकर यांनी तातडीने भेट देत पंचनामा केला. एकलव्य संघटनेचे युवा तालुका सचिव दीपक बर्डे, सर्जेराव आहेर, शाखाध्यक्ष बबन आहेर, उपाध्यक्ष राजू लोखंडे व बापू आहेर आदिंनी घटनास्थळी भेट देत बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले.
