संगमनेरच्या सुकेवाडीत सापडले गांजाचे गोदाम! नाशिकच्या ‘ए.एन.टी.एफ’चा छापा; साडेचारशेहून अधिक किलोचा मुद्देमाल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांत संगमनेर शहरात अमली पदार्थां विरोधात कारवाया वाढल्याने त्यावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. शहरात कोठेही सहज मिळणारा गांजा, एमडी सारख्या घातक नशेली पदार्थांमुळे विद्यार्थी नशेच्या आहारी जात असल्याचे गंभीर आरोपही त्यातून सुरु आहेत. अशातच आता थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर नाशिक व पुण्याच्या अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने संगमनेर पोलिसांच्या मदतीने शहरानजीकच्या सुकेवाडीत छापा घातला असून एका बंद पत्र्याच्या गोदामासह बाजूलाच उभ्या केलेल्या अ‍ॅपेरिक्षामधून सुमारे एक कोटी 14 लाख रुपये बाजारमूल्य असलेला 456 किलो गांजा हस्तगत केला आहे. मात्र पथकाला पाहून आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या घटनास्थळावरुन पसार होण्यात यशस्वी ठरला आहे. या कारवाईने संगमनेरच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फूटण्याची शक्यता आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील सुकेवाडीत इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आणि त्याचे वितरण होत असल्याची माहिती ‘थेट’ राज्याच्या पोलीस महासंचालकांना मिळाली होती. त्यांनी त्यावर कठोर कारवाई करुन या नेटवर्कची पाळेमूळे खोदून काढण्यासाठी पुण्यासह नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या अधिक्षकांना आदेश बजावले. त्यानुसार नाशिकचे पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता.10) रात्री साडेअकराच्या सुमारास संगमनेरात दाखल झालेल्या फोर्सच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने जाळे विणले.


संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडीतून सुरु असलेला हा गोरखधंदा कोण चालवतो?, आरोपी एक आहे की एकापेक्षा अधिक?, मिळालेल्या माहितीच्या ठिकाणासह अन्य कोठे गांजाचा साठा असण्याची शक्यता आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलित करीत पोलिसांनी रात्रीपासूनच आपले संपूर्ण लक्ष सुकेवाडीतील मोठेबाबा मंदिरालगतच्या परिसरावर केंद्रीत केले होते. या परिसरात येणार्‍या-जाणार्‍यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. पथकाला मिळालेल्या माहितीची खातरजमा होताच एकमेकांना इशारे करीत आज सकाळी पोलिसांच्या संयुक्त पथकांनी संशयीत ठिकाणी छापा घातला. मात्र पोलिसांच्या वावरण्याची चाहुल लागल्याने आरोपी तत्पूर्वीच घटनास्थळावरुन पसार होण्यात यशस्वी ठरला.


यावेळी पोलिसांनी संशयीत पत्र्याच्या गोदामाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवल्याचे आढळले. तर, तेथून काही अंतरावरच संशयीतपणे ताडपत्रीने अर्धवट अवस्थेत झाकून ठेवलेल्या एका अ‍ॅपेरिक्षाच्या झाडाझडतीतही त्यात गांजा ठेवल्याचे आढळून आले. दोन्ही ठिकाणी साठवून ठेवलेल्या गांजाची एकत्रित मोजणी केली असता तो 456 किलो भरला असून त्याचे बाजारातील मूल्य एक कोटी 14 लाखांहून अधिक आहे. या गुन्ह्यात आढळलेल्या रिक्षाचा क्रमांकही बनावट असल्याचा संशय आहे. सदर गोदामापासून काही अंतरावर राहणार्‍या कुटुंबाकडे केलेल्या चौकशीत आरोपीचे नाव तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या असल्याचे निश्‍चित झाले आहे.


पुणे, नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या हद्दिंना थेट भिडणार्‍या संगमनेर तालुक्यात गेल्याकाही वर्षात अमलीपदार्थांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात गांजाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मध्यप्रदेशसारख्या राज्यातून नाशिक, धुळे मार्गाने गांजाची तस्करी वाढल्याने शहर व परिसरातील काही विद्यालयांसह महाविद्यालयांच्या परिसरात गांजा भरलेल्या सिगारेटची विक्री वाढली आहे. विद्यार्थीदशेतील तरुण मुलं सहज मिळणार्‍या गांजाच्या सिगारेटकडे आकर्षित होत असल्याने तरुणांमधील व्यसनाधीनता वाढली आहे. त्यातच पुण्यातील कारवाईनंतर राज्यभर विखुरलेल्या ‘एमडी’ या अतिशय घातक अमली पदार्थाच्या तस्करांनी संगमनेरातही पाय पसरल्याचे झालेल्या काही कारवायांमधून समोर आले. त्यावरुन राजकारण तापलेले असताना त्यात आता गांजाचा धूरही समावीष्ट झाल्याने येणार्‍या काळात त्यावरुन राजकीय धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


गेल्याकाही वर्षात जिल्ह्यात अमलीपदार्थांच्या तस्करांचा वावर वाढल्याचे दिसून आले असून संगमनेरातही त्याची खोलवर पाळेमूळे पसरल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. गेल्या पंधरवड्यातच शहर पोलिसांनी अतिशय घातक समजल्या जाणार्‍या ‘एमडी’ या अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या व्हाईट कॉलर आशीष मेहेरे या आरोपीला अलिशान वाहनासह जेरबंद केल्याची घटना ताजी असताना आता शहराच्या अगदी वेशीवरच असलेल्या सुकेवाडीत गांजाचे गोदामच आढळून आल्याने त्यावरुन येणार्‍या काळात संगमनेरातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

Visits: 49 Today: 1 Total: 1414138

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *