फूटपाथवर ‘बेफाम’ बुलेट पिटाळणार्या तिघांवर पोलिसांची कारवाई! व्हायरल व्हिडिओची ‘सुमोटो’ दखल; संगमनेर महाविद्यालयाजवळील घटना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रात्रीच्यावेळी ‘बेफाम’ झालेल्या दोघा तरुणांनी स्टंटबाजी करीत महामार्ग सोडून चक्क फूटपाथवरुन सुसाट वेगाने दुचाकी पिटाळली. तिसर्याने या अतिशय धोकादायक स्टंटबाजीचे मोबाईद्वारे चित्रीकरणही केले. संगमनेर महाविद्यालय ते 132 सब-स्टेशनपर्यंतच्या अवघ्या चार सेंकदाच्या या जीवघेण्या प्रकारात मनात शंका यावी असाच प्रकार घडला. स्टंटबाजी सुरु झाल्यानंतरच्या तिसर्याच सेकंदात फूटपाथवरील एका खटकीवर आदळल्याने पाठीमागे बसलेला तरुण हवेत उडून दुचाकीसमोरच कोसळला. धक्कादायक म्हणजे या घटनेत दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झालेले असतानाही चित्रीकरण करणार्या तिसर्याने सोशल माध्यमातून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. तब्बल महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेने सोशल माध्यमातून श्रीमंत पालकांची बेपरवाई देखील समोर आली आणि त्यातून आगपाखड व्यक्त झाली. या व्हिडिओची संगमनेर शहर पोलिसांनी ‘सुमोटो’ दखल घेत अवघ्या काही तासांतच उकल केली आणि पालकांच्या जीवावर पैशांचा ‘माज’ घेवून सार्वजनिक रस्त्यावर ‘मोकाट’ सुटलेल्या तिघांचाही शोध घेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. या घटनेतून पालकांनी बोध घेण्याची गरज असून पुण्यातील ‘पोर्शे’ प्रकरणात अटकेत असलेल्या अब्जाधीश कुटुंबाला दीड वर्षांनंतरही जामीन मिळालेला नाही याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.

दोन दिवसांपूर्वी सोशल माध्यमातून ‘संगमनेर महाविद्यालय ते 132 सब-स्टेशन’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेला हा व्हिडिओ अचानक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओत महाविद्यालयाचा परिसर स्पष्टपणे दिसत असल्याने तो संगमनेरातीलच असल्याची खात्री पटल्यानंतर अनेक सोशल समुहात त्यावर जोरदार चर्चाही झाल्या. त्यातून अनेकांनी आगपाखड करीत श्रीमंत पालकांच्या अवाजवी लाडातून आजच्या पिढीच्या विविध कृत्यांवर झोत टाकण्यास सुरुवात केली. कोविड संक्रमणाच्या काळात ग्रामीण रुग्णालयातील श्वसनयंत्रांची कमतरता लक्षात घेत सामुहीक मदतीचे आवाहन करीत सोशल माध्यमांच्या वापराचा आदर्श निर्माण करणार्या ‘व्यवस्था परिवर्तन’ या समूहात ‘शेअर’ झालेल्या ‘त्या’ व्हिडिओवरील चर्चेनंतर समूहातील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी त्याची ‘सुमोटो’ दखल घेतली.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी स्वतः फिर्यादी होत या प्रकरणाचा तपास हाती घेतला. या व्हिडिओचा अपलोड कालावधी लक्षात आल्यानंतर त्या दरम्यानचे संगमनेर महाविद्यालय ते सबस्टेशनपर्यंतचे सीसीटीव्ही तपासले गेले. अवघ्या चार तासांतच सदरचा प्रकार गेल्या महिन्यात 26 ऑगस्टरोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडल्याचे स्पष्ट झाले. या स्टंटबाजीत ‘रॉयल इनफिल्ड 650’ ही बुलेट वापरण्यात आल्याचे समोर आले. संगमनेर महाविद्यालयापासून सबस्टेशनच्या दिशेने सुसाट वेगात काही अंतर जाताच फूटपाथवरील एका खटकीवर बुलेट आदळल्यानंतर पाठीमागील तरुण दुचाकीवरुन काही फूट हवेत उडून वाहनासमोरच पडतो आणि त्यातून दोघांचाही अपघात होवून त्यांना गंभीर दुखापत झाल्याचेही सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले.

या स्टंटबाजीसाठी वापरलेली बुलेट (क्र.एम.एच.04/एल.ए.2531) अनुप अरगडे यांच्या नावावर असल्याचे समोर आल्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या घरी जावून चौकशी केली असता त्यांचा मुलगा यश याने त्याचा साथीदार प्रतिक सचिन गुंजाळ याच्यासोबत मिळून सदरचा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. या स्टंटबाजीतून घडलेल्या दुर्घटनेत दोघांनाही गंभीर दुखापती होवून त्यातून ते अलिकडेच सावरल्याचेही त्यांच्या पालकांकडून समजले. धक्कादायक म्हणजे हे दोघेही बुलेटवर बसून भरधाव वेगाने फूटपाथवरुन बुलेट चालवत असताना तिसर्या एका अल्पवयीन साथीदाराकडून त्याचे चित्रीकरणही केले गेले. या अल्पवयीनाने केलेल्या चित्रीकरणातही बुलेट खटकीवर उडाल्याने झालेला अपघात दिसतो आणि व्हिडिओ संपतो. त्याचाही पोलिसांनी शोध घेतला असून त्याला पालकांसह अधिकार्यांसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी सुमोटो दखल घेत वरील तिघांवरही मोटर वाहन कायद्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोघांकडून पुन्हा असा प्रकार घडणार नाही, घडलेल्या प्रकारातून मिळालेल्या यातना व झालेला त्रास सांगणारा व्हिडिओ देखील तयार केला जाणार असून त्याद्वारे आजच्या तरुणाईला आणि पर्यायाने बेपरवाईने वाहतुकीचे नियम माहिती नसलेल्या पाल्यांच्या हाती वाहने सोपवणार्या पालकांना कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पालकांसाठी गंभीर इशारा..
संगमनेरातील ही घटना केवळ अपघात नाही तर, पालकांसाठी गंभीर इशारा आहे. आपल्या मुलांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने सोपवताना त्यांना कायदे आणि नियमांची योग्य माहिती असणं आवश्यक आहे. रात्रीच्यावेळी वाहने घेवून घराबाहेर गेलेली मुले नेमकं काय करताहेत याकडे लक्ष ठेवण्याची नैतिक जबाबदारी पालकांची असते. केवळ पैशांचा वापर करुन मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. मुलांना सामाजिक भान देणे, शिस्त आणि कायद्याचे पालन करण्याची शिकवण देण्याचे कर्तव्य पालकांचे आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास काय घडते याचे उत्तम उदाहरण गेल्यावर्षी 19 मे 2024 रोजी पुण्यातून उभे राहीले होते. त्या प्रकरणात दोघांचा जीव घेणार्या अल्पवयीन मुलाचे अब्जाधीश असलेले वडील विशाल अग्रवाल, त्यांची पत्नी शिवानी, मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार यांच्यासह ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही या प्रकरणात अद्याप जामीन मिळालेला नाही. याचा आजच्या श्रीमंत पालकांनी विचार करण्याची गरज आहे, अन्यथा मुलांच्या गैरवर्तनाची फळे पालकांच्या पदरी पडण्याचीच अधिक शक्यता आहे.

