नायक वृत्तसेवा, संगमनेर 
महाराष्ट्रातून होमिओपॅथी शिक्षणाचा अस्त होतो की काय अशी परिस्थिती असताना डॉ. राधेश्याम गुंजाळ यांनी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सुरू केले. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी होमिओपॅथीला लोकमान्यता मिळवून दिली. डॉ. गुंजाळ हेच खरे होमिओपॅथीचे प्रचारक असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शाह यांनी काढले.
डॉ.आर.एस.गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या हिवाळी २०२२ व उन्हाळी २०२३ या सत्रात पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात डॉ. बाहुबली शाह बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ होते. यावेळी संस्थेच्या विश्वस्त उषा गुंजाळ, विश्वस्त डॉ. दिपाली पानसरे, सहसचिव अतुल जोंधळे, जनशिक्षण संस्थानचे संचालक बाळासाहेब पवार, प्राचार्य डॉ. अरुण जाधव, उपप्राचार्या डॉ. पूनम ढगे, पदवीदान समारंभ संयोजन समितीच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा घोडके यांच्यासह सर्व शाखा  व विभाग प्रमुख आणि पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक उपस्थित होते.
     डॉ. बाहुबली शाह म्हणाले, डॉ.राधेश्याम गुंजाळ यांनी सुरू केलेले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा नावलौकिक मोठा आहे. या कॉलेजमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेल्या पूर्णवेळ प्राचार्यांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.राधेश्याम गुंजाळ म्हणाले, डॉक्टर बनविण्याचे पालकांनी पाहिलेले स्वप्न मुलांनी पूर्ण केले.  पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. होमिओपॅथिक परिषदेच्या निमित्ताने जर्मनीला गेलो असताना डोंगर माथ्यावर निसर्गाच्या सानिध्यात कॉलेज सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.  शहरापासून दूर चंदनापुरी घाटमाथ्यावर वनराईच्या सानिध्यात शैक्षणिक संकुल उभारण्यात यश आले. या ठिकाणी शिक्षण घेऊन तुम्ही वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी सिद्ध झाला आहात. कोणत्याही औषधोपचार पद्धतीचा अवलंब करा फक्त त्यातून रुग्ण बरा होणे आवश्यक आहे. प्रामाणिक आणि निस्वार्थी सेवा केल्यास धनसंपत्ती आपोआप मिळते. सर्व आजारांवर दुष्परिणाम विरहित रामबाण इलाज करणारी उपचार पद्धती म्हणून होमिओपॅथीवर जनतेचा विश्वास असल्याचेही डॉ. राधेश्याम गुंजाळ म्हणाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.  सूत्रसंचालन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ गुंजाळ यांनी केले तर आभार उपप्राचार्या डॉ. पूनम ढगे यांनी मानले.
 
विद्यापीठाने कॉलेजला उत्कृष्ट युनिटचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. कॉलेजमधील विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी ठरले असून राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कारानेही आमच्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाने गौरव केला आहे. उच्च गुणवत्तेचा दर्जा कायम राखणाऱ्या कॉलेजची झेप सुवर्णपदक मिळविण्यापर्यंत गेली असल्याचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यावेळी म्हणाले.