सासरच्या छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या! संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना; पत्नीसह चौघांविरोधात प्रवृत्त केल्याचा गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या सारख्याच सामान्य शेतकर्‍याच्या कुटुंबातील मुलीशी संसार थाटून सुखी संसाराची स्वप्नं मनात घेवून लग्नगाठ बांधणार्‍या तरुणाला अवघ्या पाच वर्षातच गळफास घेण्याची वेळ आली. पाच वर्षांपूर्वी अकोले तालुक्यातील पिंपळदरीच्या माधुरी अशा गोंडस नावाच्या मुलीचा राजापूरच्या वैभवशी विवाह झाला होता. लग्नानंतर वर्षभराने त्यांना एक मुलगीही झाली. मात्र मुलीच्या जन्मासोबतच माधुरीच्या स्वभावातही बदल झाल्याने त्यांच्या संसाराला वादाचे ग्रहण लागले आणि त्यातून धनधान्याने भरलेले बापाचे घर सोडून बांधकाम व्यावसायिक असलेल्या वैभवला पत्नीसह वेगळे राहण्याची वेळ आली. मात्र त्यानंतरही त्यांच्यातील वाद सुरुच राहिल्याने अखेर पाच महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलीसह माहेरी निघून गेली. मुलीच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या वैभवने आपल्या नातेवाईकाला मध्यस्थी घालून तडजोडीचाही प्रयत्न केला, मात्र परिणामी त्याला मारहाण, शिवीगाळ आणि उपमर्द करणार्‍या शब्दांसह अपमानित होवूनच परतावे लागले. एव्हढ्यावरच हा प्रकार न थांबता विषय अगदी भरोसा सेलपर्यंत पोहोचला, त्यातून प्रत्यक्ष फारकत टळली मात्र मानसिक छळ कायम राहिल्याने अखेर यातून मुक्त होण्याचा विचार करीत अवघ्या पाच वर्षांपूर्वी संसार थाटणार्‍या वैभव नवनाथ हासे या तरणाबांड तरुणाने गळफास घेतला. तब्बल महिन्याभराने या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर त्याच्या पत्नीसह पिंपळदरीच्या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या धक्कादायक घटनेतून कौंटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याचा धाक दाखवण्यासाठी कसा गैेरवापर होतो याचेही जिवंत उदाहरण उभे राहीले आहे.


याबाबत मयत तरुणाच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तालुक्यातील राजापूरमध्ये ते आपली पत्नी व दोन मुलांसह राहातात व शेती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करतात. त्यांचा मोठा मुलगा वैभव नवनाथ हासे हा बांधकाम व्यावसायिक आहे. पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये त्याचा विवाह अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील शिवाजी तुकाराम वाडेकर यांची कन्या माधुरीसोबत झाले होते. आपल्या सारख्याच शेतकरी कुटुंबातील ग्रामीण मुलगी मिळाल्याने हासे कुटुंबाच्या आनंदालाही पारावार नव्हता. वर्षभरातच दोघांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्माने माधुरीच्या स्वभावालाही कलाटणी दिली आणि ती सतत भांडू लागली. आपल्या मुलाच्या संसारात आपली बाधा नको म्हणून नवनाथ हासे यांनी स्वतःच पुढाकार घेत त्यांना वेगळे राहाण्याचा सल्ला दिला.


त्याप्रमाणे दोघांनी संगमनेर शहरालगतच्या लक्ष्मीनगर आणि नंतर सुकेवाडी रस्त्यावर खोली घेवून काही दिवस संसारही केला. मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्यातील वादाला कोठेही ब्रेक नसल्याने घर सोडूनही वैभवच्या पदरी निराशाच पडत गेली. पाच महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये दोघांमधील वाद इतके विकोपाला गेलेत की त्यातून माधुरी आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीला घेवून तडक तिच्या बापाच्या घरी पोहोचली. त्यानंतर लागलीच तिने अख्ख्या हासे कुटुंबालाच टोकावर घेत अहिल्यानगरच्या भरोसा सेलमध्ये त्यांच्या विरोधात कौंटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. सेलच्या अधिकार्‍यांनी दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांच्यात समझौता घडवून आणला, त्यातून फारकतही टळली, मात्र मनातला दुरावा तसाच राहीला. या दरम्यान आपल्या लहानग्या मुलीच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या वैभवने माहेरी निघून गेलेल्या पत्नीला पुन्हा नांदायला येण्याची गळ घालण्यासाठी महिन्यापूर्वी एका नातेवाईकासह पिंपळदरी गाठली.


यावेळी सासरच्या मंडळीकडून दोघांनाही समजुतीच्या चारगोष्टी समाजावून त्यांच्या संसाराची अडखळलेली गाडी रुळावर आणणं अपेक्षित असताना त्याच्या पत्नीसह सासरा शिवाजी, चुलत सासरा बाळासाहेब आणि मेव्हणा तुषार वाडेकर त्याच्या अंगारवर धावून गेले. त्याला यथेच्छ शिवीगाळ आणि मारहाण केल्यानंतर ‘तु जगू नकोस, अत्महत्या कर..’ असे म्हणतं त्याच्यासह त्याच्यासोबतच्या नातेवाईकाला अक्षरशः हुसकावून दिले. या अपमानास्पद प्रकारानंतरही वैभवच्या कुटुंबाने मुलीसाठीची त्याची तळमळ बघून त्याच्या सासरी संपर्क साधून माधुरीला नांदायला पाठवण्याची विनवणी केली. वैभवनेही झाला प्रकार विसण्यासाठी संवाद साधला असता उलट त्यालाच कौंटुंबिक हिंसाचार कायद्याच्या धमक्या दिल्या गेल्या, छोट्या भावाला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची भाषा झाली. त्यामुळे वैभव प्रचंड तणावात आला आणि आपली बदनामी होईल या भितीच्या छायेखाली वावरु लागला.


पत्नी माधुरी माहेरी निघून गेल्यापासूनच आपल्या वडिलांच्या घरी राजापूरला परतलेल्या वैभवला गेल्या महिन्यात 24 ऑगस्टरोजी आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकूळ केले. मनातील त्याची तगतग त्याने वडिलांनाही बोलून दाखवली. त्यावेळी त्याने सासरी झालेली मारहाण, शिवीगाळ आणि वेळोवेळी मुलीला भेटण्यासाठी गेल्यानंतर पत्नीकडूनच ‘तु मुलीचा बाप म्हणून जगण्याच्या लायकीचा नाही, तू मरुन जा, तुझे बाहेर लफडे आहे’ असे म्हणतं नेहमी उपमर्द करीत असल्याने मनात सल असल्याचेही त्याने बोलून दाखवले. आपल्या पोटच्या लेकीसाठीच सगळं काही करतोय, कमावतोय. पण तिला भेटणंही अवघडं होत असल्याने जगण्यात अर्थ नाही, माधुरी आणि तिच्या कुटुंबालाही मी मेल्यावरच आनंद होईल असे त्यांना वाटते असे निर्वाणीचे बोलत तो रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच्या खोलीत निघून गेला.


दुसर्‍या दिवशी 25 ऑगस्टरोजी सकाळी साडेसात वाजता वैभवच्या आईने त्याच्या खोलीत डोकावून बघितले असता त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्याचा क्रियाकर्म आटोपून हासे परिवार त्याच्या खोलीची सफाई करीत असताना त्यांना वैभवने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याच्या मनातील अवस्था प्रतिबिंबित असल्याचे दिसून येते. त्यावरुन त्याच्या मृत्यूस त्याची पत्नी माधुरी, तिचा बाप शिवाजी तुकाराम वाडेकर, चुलता बाळासाहेब तुकाराम वाडेकर व मेव्हणा तुषार शिवाजी वाडेकर हे चौघे कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून अकोले तालुक्यातील पिंपळदरीच्या वरील चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने संगमनेर व अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कौंटुंबिक हिंसाचार कायद्याचा धाक म्हणून कसा गैरवापर होतो याचे जिवंत उदाहरणही उभे राहीले आहे.

Visits: 275 Today: 3 Total: 1099126

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *