नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरात पुन्हा राजकीय तणाव! चंद्रशेखर चौक ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; दोन्ही गटांना उत्सवाची परवानगी नाकारली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील सत्ता परिवर्तनासह सुरु झालेल्या राजकीय संघर्षात दिवसागणिक वाढ होत असून त्यातून शहराची शांतताही वारंवार खंडीत होत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रदीर्घकाळ खोळंबलेल्या स्थानिकच्या निवडणुकांना महिनाभरात मुहूर्त लागेल असे काहीसे चित्र असताना त्यालाही मुदतवाढ मिळाली. त्यामुळे पुन्हा लांबलेल्या निवडणुकांनी शहरातील राजकीय वर्चस्वाची लढाई देखील ताणली गेली असून शिवजयंती, हनुमानजयंती, गणोशोत्सवा पाठोपाठ आता नवरात्रोत्सवाच्या आयोजनातूनही त्याचे प्रतिबिंब उमटू लागले आहेत. यावेळी संगमनेरच्या राजकीय आखाड्याचे केंद्र चंद्रशेखर चौकात स्थिरावले असून दोन गटांनी एकाच ठिकाणी उत्सवाची परवानगी मागितल्याने वाद उफाळला आहे. त्यातून सामंजस्याचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर शहर पोलिसांनी चंद्रशेखर चौकाचा परिसर संवेदशनशील जाहीर करीत वादाचे ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आजपासून या परिसरात विशेष कृती दलाची तुकडीही तैनात केली जाणार असल्याने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संगमनेरातील राजकीय तणावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.


गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य विधानसभेचे निकाल जाहीर होवून संगमनेर मतदारसंघात सत्ता परिवर्तन घडले. त्यातून कधीनव्हे तो सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट संघर्ष निर्माण होवून दोन्ही बाजूने वर्चस्वासाठी चढाओढ सुरु झाली. विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आपले संपूर्ण लक्ष संगमनेरवर केंद्रीत केल्याने त्यातून महायुती विरुद्धचा त्यांचा राजकीय संघर्ष अधिक टोकदार होत गेला. त्यातून दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये वारंवार सोशल वॉर होवून शहराचे राजकीय वातावरण गंभीर होण्याच्या घटनाही या दरम्यान वारंवार घडल्या आहेत. या काळात देशातील मतदारांचा बदललेला मूड पाहता अचानक धार्मिक उत्सवांनाही महत्व प्राप्त झाल्याने शहरात पहिल्यांदाच शिवजयंती उत्सवाची वेगळीच धूम अनुभवायला मिळाली.


त्यावेळी देखील बसस्थानकावरील जागेवर दोन राजकीय समर्थक गटांनी दावा केल्याने मोठा पेच निर्माण होवून शहराची शांतता धोक्यात आली होती. प्रशासनाने हर तर्‍हेने प्रयत्न करुनही कोणीच माघार घेत नसल्याने अखेर त्यावेळी शहराच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच एखादा उत्सव एखाद्या विशिष्ट सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश निघाले व बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील ‘तो’ संपूर्ण परिसर पहिल्यांदाच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून चारही बाजूने पोलीस बंदोबस्तात वेढला गेला. तालुक्यातील सत्ता परिवर्तनानंतर साजरा झालेला तो पहिलाच उत्सव असल्याने त्यावेळी दोन्ही राजकीय धुरिणांनी ऐनवेळी सामंजस्य दाखवत प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला स्वतंत्रपणे हा उत्सव साजरा करण्याचे मान्य केल्यानंतर त्यावेळी निर्माण झालेला राजकीय तणाव निवळला होता.


शिवजयंतीच्या प्रसंगातून आगामी कालावधीतील सर्वच सण-उत्सवांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटण्याची अपेक्षा असतानाच शहराच्या ऐतिहासिक हनुमान जयंती उत्सवालाही राजकीय वादाचे गालबोट लागले. प्रत्यक्ष उत्सवाच्या पहिल्या रात्री त्याला हिंसाचाराचाही स्पर्श झाल्याने वातावरण तापले. दुसर्‍या दिवशी प्रत्यक्ष उत्सवात त्याच्या छटाही उमटल्या, मात्र मार्गस्थ झालेला रथ अडवण्याचा प्रयत्न झाल्याचे वातावरण पाहून पोलिसांनी बळाचा वापर करुन दुसर्‍या गटाला बाजूला काढल्याने उत्सवात निर्माण झालेला अडथळा टळला. मात्र त्यातून परस्परांवर जीवघेणा हल्ला केल्याचे, सोनसाखळ्या ओरबाडल्याचे आरोप करीत गंभीर कलमान्वये गुन्हेही दाखल करण्यात आले. हा प्रकार संगमनेरच्या राजकीय संस्कृतीचे धिंदवडे काढणाराही ठरला आणि त्यातून भविष्यातील शहराच्या राजकारणाचे चित्रही स्पष्टपणे समोर आले.


त्यानंतरच्या कालावधीत श्रेयवादातून घडलेल्या सोशल वॉरची चर्चा सुरु असतानाच गणेशोत्सवातील एकत्र आरतीपासून गढूळ झालेल्या राजकीय वातावरणात, आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ला आणि मानाच्या गणपतीची पहिली आरती करण्यावरुन घडलेल्या प्रसंगातून संगमनेरच्या ऐतिहासिक गणेशोत्सवालाही राजकीय झालर शिवली गेली. त्यातून मानापमान, आरोप-प्रत्यारोप घडून संगमनेरच्या सर्वच धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवात यापुढील काळात हा राजकीय संघर्ष कायम राहण्याची चिन्हे दिसत असतानाच नवरात्रोत्सवातून ती प्रत्यक्ष उमटल्याचे बघायला मिळत आहे. रंगारगल्लीतील गणेशोत्सवात पेटलेली राजकीय संघर्षाची ही ठिणगी आता चंद्रशेखर चौकात जावून पडली असून चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही गटांनी उत्सवासाठी एकाच ठिकाणी दावा करीत पोलिसांकडे परवानगीचे अर्ज दाखल केले आहेत.


त्यातून वाद निर्माण होण्याचा पुर्वानुमान असल्याने पोलिसांनी दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका घेवून सामंजस्याने तोडगा काढण्याचेही प्रयत्न केले. मात्र दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने आणि त्यामागे दोन्ही गटांना ‘अदृष्य‘ राजकीय पाठबळ असल्याने शहराची शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी आपल्या अधिकारांचा वापर केला असून त्यानुसार दोन्ही गटांना चंद्रशेखर चौकातील वादग्रस्त जागेवर कोणत्याही स्वरुपाचा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय हा संपूर्ण परिसर संवेदनशील असल्याचा गोपनीय अहवालही वरीष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला असून त्याद्वारे चंद्रशेखर चौकाचा परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला असून आजपासून विजया दशमीपर्यंत या परिसरात विशेष कृती दलाची तुकडी तैनात केली जाणार आहे. त्यामुळे वर्षभरातील अन्य सार्वजनिक उत्सवांसोबतच आता संगमनेरच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवालाही राजकीय वर्चस्वाचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.


मागील वर्षीच्या नवरात्रोत्सवातही चंद्रशेखर चौकातील या दोन्ही गटांमध्ये संघर्ष झाला होता. त्याचे पडसाद हनुमान जयंतीच्या ऐतिहासिक उत्सवातही उमटल्याचे बघायला मिळाले. गेल्याकाही काळापर्यंत अशाप्रकारचे वाद उत्सव होणार्‍या ठिकाणांपर्यंतच मर्यादीत असतं. मात्र संगमनेर तालुक्यातील सत्ता परिवर्तनानंतर आता सगळ्याच धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व वाढले असून त्यावर वर्चस्वासाठी दोन्ही बाजूने जोर लावला जात आहे. त्यातून संगमनेरातील राजकीय वातावरण गढूळ होत असून वारंवार शहराची शांतताही धोक्यात येत आहे. दोन्ही राजकीय धुरिणांनी याचा विचार करुन आपल्या राजकारणासाठी ‘स्वतंत्र’ आखाडे निर्माण करण्याची अपेक्षाही या निमित्ताने समोर येत आहे.

Visits: 304 Today: 4 Total: 1109171

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *