पालिकेचे ‘लसीकरण’ केंद्र बनलंय ‘राजकीय’ आखाड्याचे ठिकाण! खरे लाभार्थी वंचितच; मात्र आपल्या मतदारांच्या लसीकरणावरुन नगरसेवकांमध्येच हमरीतुमरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चातकाप्रमाणे प्रतीक्षा आणि वारंवार मागणी केल्यानंतर संगमनेर नगरपालिकेने क्रीडा संकुलात ‘लसीकरण’ केंद्र सुरु केले खरे, मात्र आता या केंद्रावरच पालिकेच्या निवडणुकीचा रंग चढला असून सत्ताधारी पक्षातील ‘काही’ नगरसेवकांनी या केंद्राचाच ताबा घेवून मनमानी कारभार सुरु केला आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे नोंदणी करुन तासन्तास प्रतिक्षा करणार्या खर्या लाभार्थ्यांना मात्र लसीकरणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने आगामी निवडणुकीची तयारी करणार्या पालिकेच्या काही विद्यमान पदाधिकार्यांनी या केंद्राचाच ताबा घेतला असून नियम धुडकावून लसीकरणाचा धडाका सुरु आहे. हा सर्व प्रकार सामान्य संगमनेरकरांसाठी मात्र संतापजनक ठरला असून पारदर्शीपणे लस देता येत नसेल तर हे केंद्रच बंद करावे अशी मागणीही आता होवू लागली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांसह 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणार्या नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. त्यातच 1 मे पासून केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले केल्याने व त्याची जबाबदारी राज्यांवर सोपविल्याने लसीकरणातील सुसूत्रता हरपून त्याला राजकीय रंग येवू लागला. त्यातच दहा-पंधरा हजार लोकवस्तीचे आरोग्य सांभाळणार्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरु होवूनही लाखभर लोकसंख्येच्या संगमनेर शहरात मात्र असे केंद्र सुरु करण्याबाबत स्थानिक सत्ताधार्यांची उदासिनता दिसू लागल्याने घुलेवाडीला जावून लस घेण्याची प्रक्रीय अनेकांनी टाळली. त्यातच 18 वर्षांवरील सर्वांसाठी लस खुली करण्याचा निर्णय राज्यात लशींचा तुटवडा निर्माण करणारा ठरल्याने अचानक लशींचे महत्त्वही वाढले.

सुरुवातीला संगमनेर शहरातील नागरिकांसाठी मोफत लस हवी असल्यास घुलेवाडीचे ग्रामीण रुग्णालय हा एकमेव पर्याय असल्याने व त्याकाळातच कोविड संक्रमणाची दुसरी लाट शिखरावर असल्याने शहरातील अनेक लाभार्थ्यांनी घुलेवाडीत जावून लस घेणे टाळले. त्यातूनच संगमनेरकरांसाठी शहरातच लसीकरण केंद्र सुरु व्हावे असा सार्वजनिक सूर उमटू लागल्याने गेल्या पंधरवड्यापूर्वी पालिकेने क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेेतला. त्यामुळे संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळेल असे असे चित्र निर्माण झाले, मात्र सदरचे केंद्र सुरु झाल्यापासूनच या केंद्राचा ताबा ‘लोकांच्या वाड्यांमध्ये बळजोरीने शिरुन यथेच्छ फटके खाणार्या’ पालिकेच्या एका विद्यमान पदाधिकार्याने घेतला आणि त्याच दिवसापासून पालिकेचे लसीकरण केंद्र म्हणजे भोळ्या-भाबड्या संगमनेरकरांच्या डोळ्यात धुळ झोकणारे ठिकाण म्हणून समोर येवू लागले.

सदरच्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण राहीलेले आरोग्य सेवक व फ्रंटलाईन कार्यकर्त्यांसह दुसर्या डोसची मुदत असलेल्यांचे लसीकरण होईल असे सुरुवातीलाच जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी कोविशील्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतरानुसार निश्चित केलेल्या दिवशी लाभार्थ्यांना लस मिळणे अभिप्रेत होते. त्यासाठी लसीकरण केंद्रावर तसे बॉक्स ठेवून त्यात नाव, पत्ता, आधार क्रमांक व पहिल्या डोसची तारीख अशा चिठ्ठ्या टाकण्याचे आवाहन केले गेले व त्यानुसार सोडत पद्धतीने उपलब्ध होणार्या लशींच्या तुलनेत त्याचे वितरण करण्याची प्रणालीही जाहीर करण्यात आली. प्रत्यक्षात हा प्रकार म्हणजे केवळ नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा ‘फार्स’ असल्याचे वरील पदाधिकार्याने दुसर्याच दिवसांपासून सिद्ध करायला सुरुवात केली. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून आपल्याला बोलावणे येईल या भाबड्या आशेवर तिष्ठत बसलेल्या सामान्य नागरिकांना आजही ‘मेरा नंबर कब आयेगा’चीच प्रतीक्षा असल्याचे दृष्य बघायला मिळत आहे.

सुरुवातीला पालिकेच्या संबंधित पदाधिकार्याने आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करवून घेतले, जे वयाच्या नियमांत बसत नव्हते त्यांना ‘फ्रंटलाईन’मध्ये बसवून त्यांचे लसीकरण पार पडले. त्यानंतर संबंधित पदाधिकार्याने आपले नातेवाईक, मित्र मंडळींचेही लसीकरण याच पद्धतीने उरकले. यासर्व गोष्टी मनासारख्या घडत गेल्याने व न मिळणारी लस सहज मिळाल्याने ‘धन्य’ झालेल्या लाभार्थ्यांकडून ‘त्या’ पदाधिकार्याला एकप्रकारे ‘देवत्त्व’च प्राप्त झाले. त्यातून मनोधैर्य उंचावलेल्या त्या पदाधिकार्याने मग पालिकेचे अन्य पदाधिकारी व नगरसेवक जागे होण्याच्या आंतच ‘नोव्हेंबर’वर लक्ष केंद्रीत करुन आपल्या प्रभागातील ‘हक्का’च्या मतदारांवर ‘कृपादृष्टी’चा वर्षाव करीत गेल्या पाच वर्षात त्याने केलेल्या विविध ‘रंगीत’ किस्स्यांचा मतदारांना विसर पाडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचा परिणाम अन्य प्रभागातील काही पदाधिकारी व नगरसेवकांच्या जागृतीत झाल्याने सद्यस्थितीत क्रीडा संकुलातील लसीकरण केंद्र म्हणजे पालिकेच्या आगामी निवडणुकीचा राजकीय आखाडा बनण्यात झाले आहे.
![]()
सोमवारी (ता.7) तर पालिकेचे विद्यमान तीन पदाधिकारी आणि एका नगरसेवकांत याच मुद्द्यावरुन लसीकरण केंद्रावरच अनेकांच्या उपस्थितीत मोठे ‘नाट्य’ घडले. सतत ‘रंगीत स्वप्नं’ पाहणार्या त्या पदाधिकार्याने अन्य पदाधिकार्यांनी दिलेल्या ‘याद्या’ टाळून आपलीच यादी पुढे रेटण्याचा अट्टाहास सुरु केला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर घाईघाईत तेथे आलेल्या अन्य दोन पदाधिकार्यांसह एका नगरसेवकाची परस्परातच जुंपली. हा सगळा प्रकार भल्या सकाळपासून आज आपला नंबर येईल या आशेवर तिष्ठत बसलेला सामान्य संगमनेरकर उघड्या डोळ्यांनी बघत होता आणि त्यावरुन रंगलेले राजकीय नाट्यही अनुभवत होता. मागील पंधरा दिवसांपासून पालिकेच्या क्रीडा संकुलातील या लसीकरण केंद्रावर असाच प्रकार सुरु असून तुम्ही या देशाचे अथवा या राज्याचे नागरिक असणं महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ‘त्या’ रंगेल पदाधिकार्याचे नातेवाईक, मित्र अथवा त्याच्या प्रभागातील मतदार असणं आवश्यक आहे, अन्यथा आपणास किमान पालिकेच्या लसीकरण केंद्रावर तरी लशीसाठी तिष्ठावे लागेल अशीच धक्कादायक स्थिती येथे दररोज बघण्यास मिळत आहे.

कथित पद्धतीने संगमनेरकरांसाठी सुरु झालेल्या पालिकेच्या लसीकरण केंद्राचा ताबा सध्या पालिकेच्या एका विद्यमान पदाधिकार्याने घेतला असून त्याच्या मनमानी पद्धतीनचे येथे लशींचे डोस दिले जात आहेत. मागील पाच वर्षांत संबंधित पदाधिकारी कोणाच्या तरी वाड्यात अनाधिकाराने घुसला आणि फटके खाऊन बाहेर पडला होता. यानंतरही त्याने असेच काही प्रकार केल्याचेही गावातील चर्चेतून समोर आले होते. आपल्या ‘रंगेल’ स्वभावाने आपले काही खरे नाही याची खात्री पटल्यानंतर आता त्याने लसीकरणातून आपली गेलेली ‘पत’ पुन्हा मिळवण्याचा अट्टाहास सुरु केला असून त्याच्या प्रभागातील मतदार त्याच्या या ‘गैर’ कृतीला कितपत थारा देतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

