आधारची दहा रुपयाची किमया न्यारीच : अवसक सोमनाथ कळसकर यांनी दिली ५१ हजारांची मदत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधारची दहा रुपयाची किमया न्यारीच असल्याचे प्रतिपादन साथी भास्करराव दुर्वे नाना स्मारक समितीचे कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ अवसक यांनी केले.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधत आधार फाउंडेशनच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी आधार ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर, हरिभाऊ कोते, उद्योजक कार्तिक तांगडकर, माजी सैनिक सूर्यकांत घेगडमल, प्रा. आर. वाय. कमलाकर आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना अवसक म्हणाले, आधारचे शिलेदार शिक्षणासाठी चालू असलेल्या विवेकी संवर्धन परंपरेला पुढे नेण्याचं काम करत असून वंचित विद्यार्थ्यांत माणूस घडवत आहेत.

दरवर्षी आधार फाउंडेशन संगमनेरच्या वतीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आधारचे शिलेदार असणारे शंभर ज्येष्ठ नागरिक या मेळाव्याला उपस्थित होते. कार्तिक तांगडकर, हरिभाऊ कोते, सोमनाथ कळसकर, बापूसाहेब नन्नवरे यांनीही आधारच्या कार्याचे कौतुक करत ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या.चला हसू या हा मनोरंजनात्मक खेळही याप्रसंगी आधारचे शिलेदार देविदास गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या खेळामध्ये पुरुष गटात विरेश आडेप तर स्त्रियांच्या गटात विजया मिसाळ ह्या प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल त्यांना ग्रामगीता हे पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले.

स्नेह मेळाव्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तु देत यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी आधारचे समन्वयक तथा संगीत विशारद विनोद राऊत यांनी उपस्थितांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधारचे समन्वयक विठ्ठल कडूसकर, पी. डी. सोनवणे, डॉ. महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, अनिल कडलग, लक्ष्मण कोते, व्यवस्थापक सोमनाथ बोर्हाडे यांसह सर्व आधारच्या शिलेदारांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले.

आधारचे शिलेदार आदर्श शिक्षक सोमनाथ कळसकर यांनी आधार भवन या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामासाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली. त्याचबरोबर रेणुका डंग यांनी ५ हजार, अब्दुलहमीद शेख व दत्तात्रय बिडवे यांनी प्रत्येकी १ हजार, संगिता पाटील यांनी ६७१ रुपयांची देणगी दिली.

