‘ओटीपी’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक की काळाबाजार? संगमनेरचे ‘दिड्डी’ पुन्हा वादाच्या कचाट्यात; संतापलेल्या गॅस ग्राहकांनी महामार्ग रोखला..

श्याम तिवारी, संगमनेर
दिसेल त्यात फक्त ओरबाडण्याची वृत्ती बळावलेल्या संगमनेरातील काही गॅस वितरकांविरोधात आता ग्राहकांचा संताप उसळू लागला असून त्याचा पहिला फटका आज शहरातील दिड्डी अॅण्ड सन्सला बसला. संबंधित वितरकाकडून तालुक्यातील अनेक ग्राहकांना शुक्रवारी सिलेंडर मिळणार असल्याचे निरोप धाडण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरापासून ते शहरातील सुमारे चारशे ते पाचशे गॅस ग्राहकांनी आज भल्या पहाटेपासूनच ‘त्या’ वितरकाच्या दुकानासमोर रांगा लावल्या. मात्र ग्राहकांना निरोप दिल्यानंतरही सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान न उघडताच त्याने सिलेंडर शिल्लक नसल्याचा फलक झळकावल्याने जवळपास पाच तास तिष्ठत उभ्या राहीलेल्या ग्राहकांचा संताप झाला आणि त्यांनी वितरकाच्या गैरकारभाराचे उघड वाभाडे काढीत थेट महामार्गच रोखला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांसह वितरकाशी चर्चा करुन तासाभरात सिलेंडर उपलब्ध करण्याची हमी घेतली आणि आंदोलकांना रस्त्यावरुन बाजूला केले. यावेळी भरउन्हात रांगा लावून बसलेल्या काही ग्राहकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रीया देताना संबंधित वितरकावर ‘ओटीपी’चा बाऊ करुन सिलेंडरचा काळा बाजार करीत असल्याचे गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे या वितरकावर यापूर्वीही अशाचप्रकारे अनेकदा आरोप झाले असून राष्ट्रीय संकटातही त्याची वृत्ती कायम असल्याने त्याचे लायसन्स रद्द करण्याची मागणीही काही संतप्त ग्राहकांनी केली.

गेल्या 20 दिवसांपासून आखातात सुरु असलेल्या अमेरिका-इस्त्राईल विरुद्ध इराणच्या संघर्षाने जगातील इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली असून जागतिकस्तरावर अनेक देशांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्यातच इराणने बोर्मुज सामुद्रधुनीतून होणार्या वाहतुकीवरही पूर्णतः नियंत्रण मिळवल्याने भारतासह अनेक देशांसमोर मोठे इंधन संकट उभे राहीले आहे. मात्र या दरम्यान भारताने डिझेल व पेट्रोलसाठी पर्यायी मार्गाचा वापर सुरु केल्याने त्याची थेट झळ अद्याप भारतीयांना बसलेली नाही. मात्र त्याचवेळी स्वयंपाकासाठी लागणार्या एलपीजी गॅससाठी मात्र आपण जवळजवळ परावलंबी असल्याने युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्र सरकारने गॅस वितरणाबाबत कठोर धोरण स्वीकारले आहे.

जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांनी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहणे सोडून त्यातही राजकारण केल्याने देशातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण होवून सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक घरगुती गॅसची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णतः बंद करुन आपले संपूर्ण लक्ष स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याकडे केंद्रीत केले असून शहरी भागातील नागरिकांसाठी मागील सिलेंडर घेतल्याच्या तारखेपासून 25 दिवस तर, ग्रामीणभागासाठी 45 दिवसांचा कालावधी निश्चित करुन संपूर्ण वितरणप्रणाली ‘ऑनलाईन’ केली आहे. मात्र त्या उपरांतही या राष्ट्रीय संकटाला कमावण्याची सुवर्ण संधी मानून काही खिसेभरो गॅस वितरकांकडून सरकार आणि ग्राहक अशा दोहींच्या डोळ्यात धूळ फेकली जात असून ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केलेले सिलेंडर चढ्या दराने परस्पर व्यावसायिक ग्राहकांना विक्री केले जात आहेत.

असाच काहीसा प्रकार संगमनेरातूनही समोर आला असून त्यातून ग्राहकांच्या संयमाचा आता अंत झाल्याचे चित्र बघायला मिळाले. शहरात विविध पेट्रोलियम कंपन्यांचे तब्बल पाच अधिकृत गॅस वितरक आहेत. त्यातील ‘दिड्डी अॅण्ड सन्स’ या गणेशनगरमधील सतत वादग्रस्त ठरणार्या गॅस एजन्सीसमोर आज संतप्त ग्राहकांच्या संयमाचा उद्रेक झाला. दोन सिलेंडरमधील नोंदणीच्या नियमानुसार मुदत उलटूनही अद्याप गॅस न मिळालेल्या आणि वारंवार हेलपाटे मारुन वेळ आणि पैसा खर्च करणार्या सुमारे चारशे ते पाचशे ग्राहकांनी आज दिड्डी यांच्या गोदामाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत नंतर पुणे-नाशिक महामार्गही रोखून धरला. ऐनवेळी झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, यावेळी संतप्त ग्राहकांच्या मुखातून राष्ट्रीय संकटातही ओरबाडण्याची मानसिकता बाळगणार्या या गॅस वितरकाच्या गैरकारभाराची जंत्रीच समोर आली.

आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे बहुतेक ग्रामीणभागातील ग्राहकांचा भरणा असलेल्या या गॅस एजन्सीकडे नियमानुसार आधीचे सिलेंडर घेवून 45 दिवसांहून अधिक काळ लोटलेल्या ग्राहकांनी सिलेंडरची ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार त्यातील अनेकांना वितरकाकडून आज शुक्रवारी (ता.20) सिलेंडर मिळेल असे संदेश धाडण्यात आले. त्यासाठी सकाळी लवकर येण्याचीही सूचना केली गेल्याने तालुक्यातील 20 ते 25 किलोमीटर अंतरावर राहणार्या ग्रामीण ग्राहकांसह शहरातील सुमारे चारशे ते पाचशे जणांनी आज पहाटे पाचपासूनच या एजन्सीसमोर सिलेंडरसाठी रांगा लावल्या होत्या. मात्र सकाळचे साडेदहा वाजून गेल्यानंतरही संबंधित वितरक दुकानाकडे फिरकलाच नाही, मात्र या दरम्यान त्याने दुकान न उघडताच ‘सिलेंडर शिल्लक नाही’ अशा आशयाचा फलक लावल्याने ग्राहकांच्या संयमाचा उद्रेक झाला.

नियमानुसार आगाऊ नोंदणी आणि वितरकाचा निरोप मिळाल्यानंतर येवूनही सिलेंडर शिल्लक नसल्याचे सांगितले जावू लागल्याने सदरील वितरकाने त्याला मिळालेले सामान्य ग्राहकांसाठीचे सिलेंडर चढ्याभावाने काळ्या बाजारात विकल्याचे आरोप काही ग्राहकांनी करायला सुरुवात केली. त्यातून भल्या पहाटेपासून तिष्ठत बसलेल्या एक-एक ग्राहकाच्या भावना उचंबळून बाहेर पडू लागल्याने सर्वच उद्योगात वादग्रस्त ठरलेल्या आणि नेहमीच चर्चेत राहणार्या दिड्डी अॅण्ड सन्सच्या गैरकारभाराचे वाभाडे निघू लागले. त्यामुळे जमलेल्या ग्राहकांचा संताप अनावर होवून त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास एजन्सीच्या समोरच पुणे-नाशिक महामार्गावर ठिय्या दिला. त्याचा परिणाम अवघ्या काही मिनिटांतच हा संपूर्ण महामार्ग तुंबला.

याबाबतची माहिती समजताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या एजन्सीकडून नेहमीच ग्राहकांचा छळ होत असल्याचा आरोप करीत काहींनी आपण तब्बल शंभर दिवसांनंतर सिलेंडरची नोंदणी करुनही गॅस मिळत नसल्याची गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित गॅस वितरकाशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून एजन्सीच्या वितरकाला तात्काळ हजर होण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपल्या दूष्कृत्यातून संतापलेल्या ग्राहकांपासून तोंड लपवून बसलेला एजन्सीचा व्यवस्थापक समोर आला. यावेळी पोलीस निरीक्षक बारवकर यांनी त्याची चांगलीच कानउघडणी करुन भरउन्हात बसलेल्या अबालवृद्धांचा तरी विचार करा अशा शब्दात त्याला फटकारीत रांगेत असलेल्यांना सिलेंडर कधी देणार? अशी विचारणा केली, त्यावर तासाभरात सिलेंडरचे वाहन येणार असल्याचे ठोबळ उत्तर मिळाल्याने पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलकांनी महामार्ग मोकळा केला.

जवळपास तासभर चाललेल्या या गोंधळात माध्यमांनी गॅस ग्राहकांशी संवाद साधल्यानंतर काहींनी संबंधित वितरकाच्या गैरकारभारावर बोटं ठेवून सामान्य व गरीब ग्राहकांच्या नावावर नोंदणी झालेले सिलेंडर ओटीपी नसल्याचे कारण सांगत काळ्याबाजारात पंधराशे ते दोन हजार रुपये घेवून चढ्याभावाने विक्री करीत असल्याचा गंभीर आरोपही केला. सदरील वितरक आपले कारनामे लपवण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्षांशी सलगीत राहत असल्याचा व त्याचा वापर करुन तो आपले खिशे भरीत असल्याचा गंभीर आरोप करीत काहींनी त्याच्या एजन्सीचे लायसन्स रद्द करण्याचीही मागणी केली. विशेष म्हणजे जवळपास दोनतासांहून अधिक वेळ सुरु असलेल्या या गोंधळानंतरही संगमनेरच्या पुरवठा अधिकार्यांना त्याची भणक नसल्याने संतप्त ग्राहकांनी या विभागाच्या कारभारावरही ताशेरे ओढले.

मद्य, लॉजिंग आणि घरगुती गॅसशी संबंधित व्यवसायात असलेल्या या महाशयांच्या सर्वच उद्योगांबाबत यापूर्वी वारंवार गंभीर आरोप झाले आहेत. केवळ ओरबाडण्याच्या मानसिकतेत असलेल्या या व्यक्तिने यापूर्वी अल्पवयीन शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींना बेकायदा लॉजिंगमधील खोल्या उपलब्ध करुन देण्यासह वेश्या व्यवसायास प्रोत्साहन दिल्याचेही आरोप झाले आहेत. शिवाय यापूर्वी त्याने कायदा पायदळी तुडवून अल्पवयीन मुलांना कामावर ठेवीत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचेही दाखले असून त्यातील एका प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला थेट पोलिसांसमोर नाक घासायचीही वेळ आली होती, मात्र त्यातून कोणताही बोध न घेता त्याचे उद्योग सर्रासपणे सुरुच असल्याने राष्ट्रीय संकटातही देशविरोधी कृत्य करणार्या या एजन्सीचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणीही काही संतप्त ग्राहकांनी केली.

