निळवंडेच्या विरोधकांनी आता तरी विघ्न आणू नये ः थोरात सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल सरकारचे मानले आभार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी बुधवारी (ता.15) मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली, महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सरकारने ही मान्यता द्यायला पाच महिने उशीर केला. त्यामुळे लाभक्षेत्रातील कामे रखडली, उशिरा का होईना सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सरकारचे आभार. परंतु, आता तरी निळवंडेच्या विरोधकांनी लाभधारक शेतकर्‍यांच्या वाटेत विघ्न आणू नये, असे म्हणत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे स्वागत केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गतिमान झालेले निळवंडे कालव्यांचे काम शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर खोळंबले होते. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निळवंडे कालव्यांच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे निळवंडे कालव्यांचे काम वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला. यासंदर्भात माजी मंत्री थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे सरकारचे अभिनंदन केले आणि भविष्यात तरी निळवंडे कामांच्या कालव्यात विघ्न आणू नका असेही सुनावले.

याविषयी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, निळवंडेच्या रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी पुढाकार घेतला. शासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. जानेवारी 2022 मध्ये निळवंडे कालव्यांच्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला दिवाळीपूर्वीच मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र सरकारने दिरंगाई केली. त्यामुळे निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम गेली पाच महिने रखडले होते. मी या विषयात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवलेला होता. मागील पाच महिने काम सरकारच्या चुकीमुळे रखडले याचा कबुली जबाब पालकमंत्री महोदयांनी देणे अपेक्षित आहे. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना आणि लाभधारकांना निळवंडे कालव्यांचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे माहत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांच्या कामाला गती दिली, मात्र सध्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे काम मंदावलेले आहे, आता सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर तरी या दोन्ही कालव्यांतून वेळेत पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचवा असे म्हणाले.

Visits: 92 Today: 1 Total: 1106861

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *