अंगणवाडी सेविकांची चेहरा ओळख योजनेतून सुटका करा बालविकास मंत्र्यांना खा. वाकचौरे यांनी दिले पत्र


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविणार्‍या अंगणवाडी सेविकांची फेस रेकग्निशन सिस्टममधून (चेहरा ओळख योजनेतून) सुटका करावी, या व इतर प्रश्नांकडे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे लक्ष वेधले.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री ना. अन्नपूर्णा देवी यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट घेत अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा केली. या सर्व समस्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत अंगणवाडी सेविकांना न्याय देण्यात देईल, असे आश्वासन ना. अन्नपूर्णा देवी यांनी खासदार वाकचौरे यांना दिले.


यावेळी खासदार वाकचौरे यांनी मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्र देत त्यात विविध मागण्या केल्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की, १९८५ मध्ये महिला तसेच बालकांचा समग्र विकास करण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग म्हणून महिला व बाल विकास विभागाची स्थापना करण्यात आली. त्यास ३० जानेवारी २००६ मध्ये या विभागास मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. केंद्र शासन विविध पद्धतीच्या योजना तयार करून तळागाळापर्यंत नेण्यासाठी यंत्रणा उभी करत आहे. या यंत्रणेचा भाग म्हणून अंगणवाडी सेविका यांची प्रमुख भूमिका आहे. अंगणवाडी केंद्रातील ६ महिने ते ३ वर्षाची बालके, गरोदर व स्तनदा माता या लाभार्थ्यांना दिल्या जाणार्‍या घरपोच आहार, ट्रॅकर अ‍ॅपच्या फेस रेकग्निशन सिस्टम आणण्यात आली असून अंगणवाडी सेविकांना स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत. १ जुलै २०२५ पासून एफ. आर. एस. मध्ये नोंदणी न होऊ शकलेल्या लाभार्थ्यांना टीएचआर देऊ नका, असे निर्देश आहेत, परंतु सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये हे काम होत नसल्यामुळे सेविकांवर फोन स्वतःच्या खर्चाने खरेदी करून त्यावर काम करण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यांना धारेवर धरले जात आहे. नोटिसा दिल्या जात आहेत, त्यामुळे फेस रेकग्निशन सिस्टम बंद करण्यात येऊन पूर्वीप्रमाणेच लाभार्थ्याच्या सह्या घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

 

Visits: 273 Today: 1 Total: 1881022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *