तृप्ती देसाई यांना शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास प्रतिबंध प्रशासनाने देसाई यांच्या घरी जाऊन दिली आदेशाची प्रत
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साई संस्थानने भक्तांच्या पेहरावासंदर्भात लावलेला वादग्रस्त फलक तातडीने हटवावा, अन्यथा 10 डिसेंबर रोजी लोकशाही मार्गाने आम्ही शिर्डीमध्ये येऊन हा फलक काढू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानला दिल्यानंतर प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. प्रशासनाने तृप्ती देसाई यांना शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये मंगळवारी (ता.8) रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी (11 डिसेंबर) रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. तसा आदेशही शिर्डीचे प्रातांधिकारी गोविंद शिंदे यांनी काढला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाची प्रत महसूल व पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्यांनी देसाई यांना त्यांच्या घरी जाऊन दिली आहे. त्यामुळे आता देसाई यांच्याकडून करण्यात येणार्या आंदोलनाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून मोठा वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा फलक संस्थानने काढला नाही तर आम्ही तिथे येऊन काढू, असा थेट इशाराच दिला होता. मात्र त्यानंतरही हा फलक हटवला गेला नसल्याने आम्ही 10 डिसेंबर रोजी हा फलक काढण्यासाठी येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले होते. त्यानंतर तातडीने साई संस्थान व भूमाता ब्रिगेडच्या वादात प्रशासनाने उडी घेत देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली आहे.
तृप्ती देसाई या शिर्डी येथे आल्यास धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी 14 नोव्हेंबरपासून श्री साईबाबा समाधी मंदिर भक्तांसाठी खुले झाल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविकांची होणारी गर्दी पाहाता व तातडीची निकड पाहता संबंधित व्यक्तीस म्हणणे मांडण्यास पुरेसा अवधी देणे शक्य नाही. त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे प्राप्त अधिकारानुसार तृप्ती देसाई यांना 8 डिसेंबर रात्री बारा वाजल्यापासून ते 11 डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत शिर्डी नगरपंचायत हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे प्रांताधिकार्यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आदेशाची प्रत महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचार्यांनी देसाई यांना त्यांच्या घरी जाऊन दिली आहे. त्यामुळे आता देसाई काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.