रुग्णसेवेसाठी डॉक्टरांचा एकत्रित प्रवास कौतुकास्पद : माजी मंत्री थोरात 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे प्रचंड भांडवल आणि किचकट नियमामुळे एकट्या डॉक्टरने आपले हॉस्पिटल उभारणे आणि चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील काही डॉक्टर मित्रांनी ‘कल्पतरू हॉस्पिटल’ च्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी एकत्रित सुरू केलेला प्रवास कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
शहरातील नवीन अकोले बायपास रोड वरील विठ्ठल मंदिरासमोर नव्याने सुरू झालेल्या १०० बेड्स, तज्ञ डॉक्टर्स आणि अत्याधुनिक सुविधाने परिपूर्ण असलेल्या कल्पतरू हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे, पांडुरंग घुले, हिरालाल पगडाल, प्रमिला अभंग, दिपाली वर्पे, यांच्यासह युनियन बँकेचे सुनीलकुमार यादव, अमितकुमार सिन्हा, वास्तु विशारद डॉ. महेंद्रदास वारेकर, युनियन बँकेचे चीफ मॅनेजर संदीप पवार, इंजिनीयर गोपीनाथ म्हस्के, ॲड. श्रीकृष्ण गिते, प्रा.नामदेव बोरले, प्रभाकर मेहत्रे, नौसेना अधिकारी भानुदास घनकुटे, श्रीमती सुशीला शिंदे, श्रीमती रजनी वाव्हळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणात कार्पोरेट यंत्रणांचा शिरकाव झालेला असताना रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील सुसंवाद, विश्वास आणि मानवी भावनांची नाळ तुटत चालली आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर फक्त व्यवस्थापनाच्या आदेशाने काम करणारे कर्मचारी बनले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील काही डॉक्टर मित्रांनी रुग्णसेवेची खरी भावना जपत एकत्र येऊन कल्पतरू हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेचा खरा हेतू आणि डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय येतो.
संगमनेरसह शेजारील अकोले तालुक्यासह इतर अनेक तालुके आणि ग्रामीण भागातील रुग्णांना आता अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवरच विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या दरात कल्पतरूत उपचार मिळणार असल्यामुळे वेळेची आणि खर्चाची ही बचत होणार आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी मानसिक घालमेलही कमी होण्यास कल्पतरू कारणीभूत ठरेल असेही माजी मंत्री थोरात यावेळी म्हणाले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, आमचे तांबे हॉस्पिटल डॉ. राजेंद्र म्हस्के यांनी २५ वर्षे सांभाळले. कष्टाळू,प्रामाणिक आणि रुग्णसेवेची आवड यामुळे त्यांची वाटचाल यशस्वी झाली. मी त्यांच्या जबाबदारीवर हॉस्पिटल सोडून बाहेरगावी जायचो. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी उत्तम संवाद आणि योग्य उपचारासाठी त्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची होती. डॉ. राजेंद्र आणि डॉ. स्वाती म्हस्के  हे पती-पत्नी २४ तास रुग्णसेवेत तत्पर असायचे. आमच्या हॉस्पिटलमध्ये सेवा दिलेले डॉ. बोरले, डॉ. गीते व इतर डॉक्टरांचे कामही मी जवळून बघितले आहे.
त्यांच्यासोबत इतर निष्णांत डॉक्टर आणि महेश वाव्हळ यांनी सुरू केलेले कल्पतरू मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटल अल्पावधीत नावलौकिकास प्राप्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपस्थित पाहुण्यांचे डॉ. राजेंद्र म्हस्के, डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. सुशांत गिते, डॉ. सोनाली गिते, डॉ. संदीप बोरले, डॉ. कोमल बोरले, डॉ. बाळासाहेब मेहत्रे, डॉ. सुवर्णा मेहेत्रे, डॉ. अमित शिंदे, डॉ. रूपाली शिंदे, डॉ. सखाराम घनकुटे, मीनाक्षी घनकुटे, महेश वाव्हळ, कोमल वाव्हळ आदींनी स्वागत केले.
१०० बेड्स, तज्ञ डॉक्टर्स आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या के.एम. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा रुग्णांना माफक दरात मिळणार आहेत. या ठिकाणी हृदयवकार, समर्पित स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग, अपघात विभाग, मुत्र विकार, मधुमेह विकार, जनरल मेडिसिन, छातीचे विकार, पॅरालिसिस, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, गुडघा व खुबा, मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया, कॅथ लॅब, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस या सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Visits: 151 Today: 2 Total: 1598642

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *