भविष्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज ः देशमुख राजहंस दूध संघाच्यावतीने देवगड परिसरात वृक्षारोपण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर व परिसर हा अवर्षण प्रवण क्षेत्र आहे. यामुळे येथे कायम कमी पाऊस पडतो. सततचा दुष्काळ व ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 16 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे राज्यासह तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली आहे. आगामी काळात हीच परंपरा जोपासत संपूर्ण तालुका हा हिरव्या वनराईचा तालुका निर्माण करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत असून भावी पिढीकरिता वृक्ष संवर्धन अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा (देवगड) येथे दंडकारण्य अभियानांतर्गत संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ व खंडोबा देवस्थान ट्रस्ट देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षरोपण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर हे होते. साहेबराव गडाख, मोहन करंजकर, माणिक यादव, विलास वर्पे, अॅड. बाबासाहेब गायकर, विलास कवडे, अण्णासाहेब राहिंज, संतोष मांडेकर, डॉ. गंगाधर चव्हाण, राजेंद्र देशमुख, अजित देशमुख, मथाजी पावसे, सुभाष गडाख, सगाजी पावसे, भाऊसाहेब जाधव, मोठ्याभाऊ बढे, यादव पावसे, अण्णासाहेब येरमल, डॉ. प्रमोद पावसे, डॉ. विजय पावसे, गणपत पावसे, रामनाथ गडाख, बाबासाहेब पावसे, उत्तम जाधव व राजहंस दूध संघाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मागील सोळा वर्षांपासून तालुक्यात दंडकारण्य अभियान राबविले जात आहे. उघड्या, बोडक्या डोंगरांवर मोकळ्या जागेमध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. वृक्ष संवर्धन ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण कोरोना संकटात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला यातून अनेकांना प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये भविष्यातील पिढ्या सुरक्षित रहाव्यात म्हणून वृक्ष संवर्धन गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन रणजीतसिंह देशमुख यांनी केले. प्रास्ताविक मोहन करंजकर यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. सुरेश जोंधळे यांनी केले. तर आभार डॉ. प्रमोद पावसे यांनी मानले.
