चारित्र्याच्या संशयातून 60 वर्षीय महिलेचा निर्घृन खून! घारगावमधील धक्कायदायक घटना; संशयखोर म्हातार्‍याला पोलिसांकडून अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पती-पत्नी दोहींचाही वार्धक्याच्या दिशेने प्रवास सुरु असताना अचानक व्यसनी पतीच्या मानगुटावर संशयाचे भूत येवून बसले आणि सुखाने चाललेल्या त्यांच्या चाळीस वर्षांच्या संसारी जीवनाला नजर लागली. त्यातून गेल्यावर्षी ऐन दिवाळीत संशयखोर म्हातार्‍याने हातात काठी घेत गावातील ‘त्या’ संशयिताच्या घरी जावून धिंगाणाही घातला, मात्र त्यावेळी त्याच्या चाळीस वर्षीय मुलाने बापाच्या व्यसनाचा हवाला देत प्रकरण मिटवले. त्याचा फारसा परिणाम न झाल्याने तेव्हापासून ‘त्या’ 60 वर्षीय महिलेला जीवनाच्या उत्तरार्धात मात्र आपल्या 65 वर्षीय पतीचा संशय आणि त्यातून रोज होणारी शिवीगाळ सहन करण्याची पाळी आली. चारित्र्याच्या संशयातून अवघ्या वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या या प्रकाराने बुधवारी क्रूरता गाठली आणि त्यातूनच अखेर या संशयीवृत्तीचा शेवट चंद्रकला खंदारे या साठीतल्या महिलेचा निर्घृन खून होण्यात झाला. संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवून देणार्‍या या प्रकरणातील 65 वर्षीय आरोपी दगडू खंदारे याला घारगाव पोलिसांनी तत्काळ अटक केली असून त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.30) रात्री साडेआठ ते पहाटे एकच्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दितील खंदारेवस्ती परिसरात घडला. या वस्तीवर राहणार्‍या दगडू खंदारे या 65 वर्षीय इसमाला त्याची पत्नी चंद्रकलाचे गावातील एका इसमाशी अनैतिक संबंध असल्याचा मनोमन संशय होता. त्यातच त्याला दारुचे व्यसनही असल्याने गेल्यावर्षी ऐन दिवाळीच्या दिवशी त्याने नशेत असताना हातात काठी घेत त्याला संशय असलेल्या गावातील ‘त्या’ इसमाच्या घरी जावून धिंगाणाही घातला होता. मात्र त्यावेळी त्याचा मुलगा भीमा याने बापाच्या व्यसनाचा हवाला देत प्रकरण मिटवले आणि नशेत तर्रर असलेल्या आपल्या बापाला घरी नेले.


मात्र त्या दिवसापासून एखाद्याच्या प्रदीर्घ सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागावी त्याप्रमाणे जवळजवळ चार दशकांहून अधिक काळापासून ज्यांनी एकमेकांसोबत जीवन-मरणाच्या शपथा घेवून संसार फुलवला, सोन्यासारख्या मुलाला जन्म दिला. त्याचाही संसार फुलवला. घरात मुलं-बाळं, धनधान्य आणि पशूधन असं सर्वकाही आलबेल असताना अचानक व्यसनी म्हातार्‍याच्या मानगुटावर बसलेल्या संशयाच्या भूताने त्याच्या संसारातील गोडवा नष्ट करुन शिवीगाळ आणि त्यातून अशांती निर्माण करण्यास सुरुवात झाली. रोज संध्याकाळी हा प्रकार घडत असल्याने त्याच्या पत्नीसह मुलगा, सून आणि नातवंडांनाही ते सवयीचे झाले होते, बापाच्या मनातील हाच संशय एखाद्या दिवशी जीवघेणा ठरेल असे खंदारे कुटुंबाला स्वप्नांतही वाटले नसेल.


बुधवारी (ता.30) रात्री आठच्या सुमारास आरोपी दगडूसह त्याची पत्नी चंद्रकला, मुलगा भीमा, त्याची पत्नी व दोन्ही मुलांनी सोबत जेवण केले. त्यानंतर मनातला संशय जागलेल्या दगडू खंदारे याने पुन्हा ‘तो’ विषय काढून पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने स्वतःच्या पत्नीला उद्देशून ‘तुझे *** याच्याशी अनैतिक संबंध आहेत, तु त्याच्याकडेच निघून जा..’ असे म्हणत शिव्यांची लाखोळी वाहीली. सोबतच आपल्या मुलाकडे बघत ‘तुझ्या आईचे त्या *** सोबत अनैतिक संबंध आहेत, मी एक दिवस तिला नाहीतर *** याला मारुन टाकणार..’ असा दमही दिला. मात्र आपल्या बापाचे हे नेहमीचेच कृत्य असल्याने त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्या मुलाने त्याला घरालगतच असलेल्या आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी जाण्यास सांगितले. त्यानुसार दगडू व चंद्रकला खंदारे असे दोघेही घरापासून काही अंतरावरील पत्र्याच्या शेडकडे जाण्यास निघाले.


त्यावेळी जाताजाता दगडू खंदारे याने दारात ठेवलेली दोरी सोबत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या मुलाने सकाळी गायीचे दूध काढताना लागेल असे सांगत त्याला ती तेथेच ठेवण्यास सांगितले. त्यानुसार दगडू खंदारेने हातात घेतलेली दोरी पुन्हा ठेवली व पत्नीला शिव्या घालीत तिच्याच सोबत तो शेडच्या दिशेने रवाना झाला. आज आपला बाप आईला शिव्या देतादेता दोरी घेवून जाण्याचा प्रयत्न का करतोय, अशी साधी शंकाही भीमाच्या मनात आली असती तर कदाचित त्याच्या आईचा जीव वाचला असता. मात्र सदरचा प्रकार नेहमीचाच असल्याने आपला बाप असंकाही कृत्य करेल असे त्याला स्वप्नातही वाटलं नसेल. पण तरीही त्याच्या मनात हुरहूर असल्याने आज (ता.31) पहाटे एकच्या सुमारास आईच्या काळजीने मुलगा शेतातल्या पत्र्याच्या शेडजवळ गेला आणि बापाचा नशा उतरला की नाही याची चाचपणी करु लागला.


त्यावेळी त्याला सर्वत्र शांतता आढळून आल्याने त्याने आंत डोकावून बघितले असता त्याच्या शरीराचा अक्षरशः कंप उडाला. साडेआठच्या सुमारास आईसह शेडमध्ये झोपण्यासाठी आलेला त्याचा बाप त्यावेळी तेथे हजर नव्हता, मात्र त्याची जन्मदात्री आई रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर निपचीत पडून असल्याचे भयानक दृष्य पाहून त्याने आईऽ अशी आर्त आरोळी दिली, मात्र कोणताही प्रतिसाद न आल्याने काहीतरी अनर्थ घडल्याचे ताडून पहाटेच्या थंडगार वार्‍यातही दरदरुन घाम फुटलेल्या तिच्या मुलाने घारगाव पोलिसांना फोन करुन घटनेबाबतची सूचना देत तत्काळ रुग्णवाहिकेद्वारा आपल्या आईला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.


या प्रकरणी घारगाव पोलिसांनी मयत चंद्रकला दगडू खंदारे यांचा 40 वर्षीय मुलगा भीमा याच्या फिर्यादीवरुन दगडू खंदारे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला व आरोपीला तत्काळ अटक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत आवश्यक कायदेशीर पूर्तता करताना गुन्ह्यात वापरलेली कुर्‍हाडही हस्तगत केली आहे. या घटनेत आरोपीने मयतेच्या उजव्या कानाखाली कुर्‍हाडीचे घाव घातल्याने अतिरक्तस्राव होवून सदरील महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने संशयाचा परिपाक कसा होतो याचे भयानक उदाहरण उभे राहीले असून संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


आपल्या परंपरेत विवाह विधीला अनन्य महत्त्व असून पती-पत्नी एकमेकांना सातजन्माचे सोबती म्हणून संसाराचा गाडा हाकतात. त्याप्रमाणे घारगावच्या खंदारेवस्तीवरील दगडू व चंद्रकला खंदारे यांचाही संसार सुमारे 40 वर्षापूर्वी सुरु होवून आज एक 40 वर्षीय विवाहित मुलगा, दोन नातवंडे असा परिपक्व होवून उत्तरार्धाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतानाच अचानक त्याला दृष्ट लागली आणि सुखी संसाराच्या वेलीवर संशयाची विषारी फुलं उमलली. त्यातून अवघ्या वर्षभरातच दोघांमधील अंतर वाढून त्याचा शेवट 65 वर्षीय परिपक्व इसमाकडून जवळजवळ त्याच्याच वयाच्या त्याच्या पत्नीचा निर्घृन खून करण्यात झाला. या घटनेने मानवी स्वभावाच्या आणखी एका विकृतीचे दर्शन घडले असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Visits: 511 Today: 3 Total: 1100223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *