किरकोळ कारणावरुन बाराजणांचा पोलीस ठाण्यात दोनतास धिंगाणा! संगमनेर शहर पोलिसांचा धाकच संपला; पोलीस ठाण्यासमोरच शहरप्रमुखांच्याही श्रीमुखात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वाहनांचा एकमेकांना कट लागल्याच्या किरकोळ कारणावरुन तक्रार दाखल करु नये यासाठी त्यापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्नात शिवसेनेच्या शहरप्रमुखांच्या श्रीमुखात पडली. त्याचे पर्यवसान दोन्ही बाजूने काहीकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातच धुमश्चक्री उडाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करीत वादाला फोडणी देणार्या आदित्य कानकाटे या तरुणाला सुरक्षितता म्हणून ताब्यात घेत बिनतारी कक्षात ठेवले. मात्र संतप्त झालेल्या जमावाने त्याला बाहेर सोडण्याच्या मागणीवरुन तब्बल दोनतास पोलीस ठाण्यात मनसोक्त धुडगूस घातला. भाऊबीजेच्या पहाटे अवघ्या एका पोलीस हवालदारासह महिला पोलीस शिपायाच्या उपस्थितीत सुरु असलेला हा धिंगाणा गस्तीपथकाची मदत प्राप्त झाल्यानंतरच शमला. या प्रकरणी अठरातास उलटल्यानंतर ज्ञात सहाजणांसह एकूण बाराजणांवर फौजदारी धाकदपटशा निर्माण करण्यासह बेकायदा जमाव जमवून दंगल घडवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव करणे व शांततेचा भंग करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बारा-पंधराजणांच्या टोळक्याकडून मध्यरात्रीपासून पहाटे सव्वादोन वाजेर्पंयत भर पोलीस ठाण्यातच हा धिंगाणा सुरु होता, मात्र शहर पोलीस त्यांच्यासमोर हतबल असल्याचे दिसून आले. या घटनेनंतरही दंगल माजवणार्या सर्वांवर कठोर कलमान्वये तात्काळ कारवाईची गरज होती, प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी फौजदारी धाकदपटशा आणि शांततेचा भंग या अधित्तम दोन वर्षांची शिक्षा देणार्या कलमांसह किरकोळ कारवाई केल्याने मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे. या घटनेतून पोलिसांचा धाकही संपुष्टात आल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गुरुवारी (ता.23) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. मालदाड रोड येथील आदित्य कानकाटे हा तरुण रात्री सव्वाबाराच्या सुमारास वाहनाला कट लागल्याची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर अर्धातासाच्या अंतराने सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे, सनी धारणकर आदिंसह पाच ते सहाजण तेथे आले. वाहनांना कट लागल्याच्या विषयावरुन त्यांच्यात चर्चा सुरु असताना ते सर्वजण उठून बाहेर गेले व त्यानंतर काही वेळाने आदित्य कानकाटे पुन्हा तक्रारदाराच्या खुर्चीत येवून बसला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल योगेस हासे व त्यांच्या सहकारी महिला पोलीस मनीषा पुरी नीलेश अशोक पगारे (रा.मालदाड रोड) याची तक्रार नोंदवत होते.

त्याचवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आदित्य सूर्यवंशी याच्याशी संवाद साधून तक्रार करु नये यासाठी दोन्ही बाजूने समेट घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कानकाटेला त्याचा राग आल्याने त्याने सूर्यवंशींसोबत पोलीस ठाण्याबाहेर येत त्यांच्या कानशिलात वाजवली. अचानकच्या या प्रकाराने काहीसा गोंधळ झाल्यानंतर सूर्यवंशींच्या सोबत आलेल्या तरुणांनी पोलीस ठाणे अंमलदाराच्या कक्षात येवून आरडाओरड सुरु केली. या घटनेत पोलीस ठाण्यात तक्रारदार म्हणून आलेल्या आदित्य कानकाटेची सुरक्षितता अडचणीची वाटू लागल्याने कर्तव्यावरील एका पुरुष व अवघ्या एका महिला कर्मचार्याने दहा-वीसजणांचा जमाव झुगारुन कानकाटेला ताब्यात घेत बिनतारी कक्षात नेवून बसवले व कक्षाचे दार बंद केले.

त्यानंतरही जमलेल्या जमावाचा आरडाओरडा आणि ताब्यात घेतलेल्या इसमाला धमकावण्याचा प्रकार सुरुच राहिल्याने अखेर पहाटे सव्वादोन वाजता ठाणे अंमलदाराने गस्तीपथकाला संदेश देत मदत मागीतली. त्यानंतर काही वेळातच दाखल झालेल्या उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल परमानंद काळे, बेनके, संदीप कोंदे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत जमलेला जमाव हुसकावून लावला. हा प्रकार समजताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुखही पोलीस ठाण्यात हजर झाले. घडला प्रकार त्यांना सांगण्यात आला. त्यावरुन मध्यरात्री पोलीस ठाण्यात येवून नाहक वाद निर्माण करणार्या आणि दोनतास धिंगाणा घालणार्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज होती. मात्र पोलिसांनी येथेही कच खाल्ली आणि घटनेनंतर तब्बल वीस तासांनी हवालदार हासे यांची तक्रार नोंदवण्यात आली.

धक्कादायक म्हणजे भर पोलीस ठाण्यात, सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या समोर तब्बल दोनतास हा मनसोक्त धिंगाणा सुरु असतानाही पोलिसांनी सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे, सनी धारणकर या सहा ज्ञात आरोपींसह अज्ञात सहाजणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 189 (1), (2), 194 (2), 221, 296, 351 (2), 352 अशा किरकोळ कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 115, 117 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

खरेतर पोलीस ठाण्यात आवाजाची पातळी वाढवून बोलण्यासाठीही मोठी हिम्मत लागते. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाणे अलिकडच्या काळात आपला लौकीक गमावून बसले असून कोणीही येवून पोलिसांच्या उपस्थितीत, सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या साक्षीने वाट्टेल तसा धुडगूस घालावा, समोर आलेल्या विरोधकावर, शत्रूवर थेट हात उचलावा, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मोठमोठ्याने आरडाओरड करुन पोलिसही आमचे काहीच ‘वाकडे’ करीत नाही असा संदेश देण्याचा धक्कादायक प्रकार घडावा यातून शहर पोलिसांची लक्तरे वारंवार वेशीवर येत असून पोलीस अधिक्षक नेमकी कशाची प्रतीक्षा करीत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

