विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने वसुंधरा अकॅडेमी; अभिनव प्री स्कूल फुलले

नायक वृत्तसेवा, अकोले
डोळ्यात कुतुहल, मनात हुरहूर, शाळेत जाण्याचा आनंद, नवीन वर्गाची उत्सुकता, मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना भेटण्याची ओढ…चेहऱ्यावर असे एक ना अनेक संमिश्र भाव, नवीन स्कूल ड्रेस, पाठीवर स्कूल बॅग, हातात टिफीन बॅग, वॉटर बॉटल अशा थाटात विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी गेटमधून प्रवेश केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळाचा परिसर दुमदुमून गेला होता.

अभिनव शिक्षण संस्थेचे वसुंधरा अकॅडमी व अभिनव प्री स्कूल या शाळा सोमवारी सुरू झाल्या. नवीन ड्रेसचा हवाहवासा वाटणारा सुगंध, नव्या वह्या, नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालत होते. उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपवून विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी फुले, झाडे, फुगे, कार्टून कट आउट्स, कार्टून कॅरेक्टर्स, रांगोळी अशा विविध प्रकारे वसुंधरा अकॅडमीचा कॅम्पस जणू सज्ज झाला होता. प्रत्येक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आनंदाने शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत होता. शाळेचे प्राचार्य व शिक्षक त्यांचे औक्षण करून स्वागत करत होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत सोडवायला आलेल्या पालकांच्या मनातही हुरहुर होती. आपला पाल्य वसुंधरा अकॅडमीत शिक्षण घेत आहे असा अभिमान होता. मोठ्या उत्साहात शाळेच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या असेम्ब्ली मध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले. जणू काही शाळा सुरू होण्याची सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि तो दिवस उगवला.

शाळेच्या गीतमंचाने एक सूर, एक लय, एक ताल धरत राष्ट्रगीत, राज्यगीत, व सकाळची प्रार्थना सादर केली. ब्लू हाऊसच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला. असेंबली नंतर शाळेचे संगीत शिक्षक इंद्रभान कोल्हाळ यांनी आपल्या सुमधुर आवाजात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत स्वागत गीत सादर केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, ज्येष्ठ शिक्षक प्राजक्ता सोलापुरे, वृषाली शेटे, सुनील खताळ व उपस्थित पालक यांनी सरस्वती पूजन करून विद्येची ज्योत प्रज्वलित केली. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याद्वारे सर्वांना आम्ही शाळेत आलोय असे म्हणत आनंद व्यक्त केला. पहिल्याच दिवशी शाळेतील विविध ॲक्टिव्हिटी मध्ये विद्यार्थी रममाण झाले. संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात झाला. शाळेचा पहिला दिवस आनंददायी व संस्मरणीय करण्यासाठी वसुंधरा अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. सुमैय्या शेख व रक्षा पांडे यांनी स्वागत समारंभाचे संचालन केले. प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनीच हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला.

प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या छोट्या चिमुकल्यांच्या हातून केक कापून शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्साहाने स्वागत झाले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

Visits: 168 Today: 2 Total: 1418390
