कारुण्यमूर्ती ः प्रा.चं.का.देशमुख

कारुण्यमूर्ती ः प्रा.चं.का.देशमुख

प्रकाशाची पूजा सर्वजण करतात. दिवाळी तर प्रकाशाचे पर्व आहे. एकेक आशेचा किरण सर्वत्र दिसावा, प्रत्येकाचे आंगण चैतन्याने फुलून यावे. आनंद, उत्साह व स्नेहभेटी घडून याव्यात. जीवन आनंदाने भरून यावे म्हणून दिवाळी आदी सण-उत्सव आपण साजरे करतो. मिणमिणती इवलीशी पणती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि जगण्याला बळ देऊन उभारी देते. अशीच एक ज्ञान व करुणेची पणती घेऊन जीवनभर प्रवास करणारा एक विद्यार्थीप्रेमी यात्री म्हणजे संगमनेरमधील प्रा.चं.का.देशमुख होय.

अकोल्यातील उंचखडक हे प्रा.देशमुख यांचे मूळगाव. सरांनी अकोल्यातील मातीचा वारसा घेतला व संगमनेरच्या भूमीत सेवेचा वसा चालू ठेवला. ते सतत बहुजनांमध्ये रमले. बहुजनांची ‘ज्ञानमाता’ झाले. ज्ञानमाता विद्यानगरीत 32 वर्षे मनोभावे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. 2011 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर तर सरांनी महाराष्ट्रभर प्रबोधनाचे, स्वच्छतेचे व वाचनसंस्कृती टिकविण्याचे कार्य चालू ठेवले.

1979 मध्ये संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य कौंडिण्य मामांच्या सहवासात देशमुख सरांनी एक वर्ष सेवा केली. तेव्हापासून सरांनी गरजू, निराधार तसेच प्रज्ञावान विद्यार्थ्यांना पुस्तके, पेन, वेटबॉक्स आदी शैक्षणिक साहित्य वाटणे असे उपक्रम सुरु केले. एक वर्षानंतर देशमुख सर ज्ञानमाता कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सरांवर तिथेही सेवेचे संस्कार झाले. असाच एक प्रसंग. सप्टेंबर 1993 मध्ये लातूर-उस्मानाबादला भूकंप झाला. तेव्हा ज्ञानमाता कॉलेजचे प्राचार्य फादर साळवे ऑक्टोबरच्या दरम्यान र्स शिक्षकांशी भूकंपाबाबत संवाद साधला आणि विचारले आपण भूकंपाबाबत काही मदत पाठवणार आहेत. त्याकाळात भूकंप परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण होते. जमिनीला भेगा पडत. छोटे-मोठे आवाज येत. मग प्राचार्य साळवे यांनी विचारले, कोण जाणार भूकंप परिसरात मदत कार्य घेऊन? भीती सर्वांच्या मनात होती. तेव्हा प्रा.चंका उभे राहिले व मी तयार आहे असे सांगितले. नंतर बी.के.गायकवाड, श्री.आव्हाड व फादर पॅट्रीक असे तिघेजण तयार झाले. चार हजार रुपयांचे धोतर, फेटे व साड्या आदी कपडे आणि चार हजार रुपये रोख घेऊन देशमुख सर आपल्या सहकार्‍यांसोबत भूम, किल्लारी, लातूर व लातूर परिसरात चार दिवस मदत देण्यासाठी फिरले.

ज्ञानमाता कॉलेजमध्ये नऊ-दहा वर्षे सेंड ऑफ कार्यक्रमाचे इनचार्ज राहिले. त्याकाळात सरांनी पुस्तकदानाचे भरभरुन काम केले. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे महात्मा गांधींचे चरित्र, शब्दकोश व पेन इत्यादी शैक्षणिक व वाचनीय गोष्टी सर दरवर्षी विद्यार्थ्यांना भेट देत असत. साने गुरुजी, संत गाडगेबाबा व विनोबा भावे यांचा देशमुख सरांच्या जीवनावर विशेष प्रभाव आहे. सरांचे साने गुरुजींच्या साधनेवर, गाडगेबाबांच्या खराट्यावर व विनोबा भावेंच्या ‘गिताई’वर खूप प्रेम. सरांचा मराठीचा व्यासंग खूप दांडगा. मारुती चितमपल्ली, पु.भा.भावे, बाबा आमटे यांची पुस्तके सर वारंवार वाचतात. सरांचे अनेक विद्यार्थी सरांच्या शिकवण्याच्या तंत्राबद्दल अवांतर वाचनाबद्दल भरभरुन बोलतात. अक्षरभारती (पुणे) संस्थेचे अध्यक्ष व सॉफ्टवेअर इंजिनियर भानुदास आभाळे हे सरांचे विद्यार्थी. ते सरांबद्दल नेहमी सांगतात की, प्रा.देशमुख म्हणजे मराठीतील खणखणीत नाणं होय. सरांचं भाषेवरील प्रभुत्व, सेवाभाव, विद्यार्थीहित व अवांतर वाचन या गोष्टी आम्हा विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देतात असं भानुदास आभाळे मानतात.

रुरल हौसिंग महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ.राजाराम दिघे हेही प्रा.देशमुख सरांचे विद्यार्थी होय. डॉ.दिघे सांगतात की, प्रा.देशमुख सरांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिकण्याची, मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण होत असे. प्रा.देशमुख सर विद्यार्थ्यांना देव मानतात. सेवानिवृत्तीनंतरही सर अनेक माजी विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी सांगत असतात. गिताई, मधुकर, जंगलातले दिवस, रक्त आणि अश्रू, झंझावात आदिंसारखी पुस्तके सर नेहमी विद्यार्थ्यांना वाचायला सांगतात.

प्रा.देशमुख 2011 साली सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर सर थांबले नाही नियमांनुसार निवृत्ती झाली अन सामाजिक बांधिलकीची बांधिलकी उभारुन आली. संत तुकारामांनी म्हटलयं..
न लगे चंदना, सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी
अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेना..
चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरतो. तो सांगावा लागत नाही. तसेच प्रा.देशमुख सरांच्या रक्तातच जनसेवेचा, कारुण्याचा संस्कार असल्याने त्यांचे सामाजिक, शैक्षणिक काम सध्याही उत्साहाने चालू आहे. या उद्देशाने सरांनी 2015 साली ‘श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकर सेवा प्रतिष्ठान’ची संगमनेरमध्ये स्थापना केली. कसलेला शेतकरी जसा उत्तम शेती करतो तसे देशमुख सर प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणसांच्या मनाची मशागत करतात. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ गीतेतील या वचनाप्रमाणे देशमुख सर निवृत्तीनंतर निरंतर कर्म करत राहतात. कशाचीही अपेक्षा न करता सेवानिवृत्तीचं ‘लाखाचं धन’ गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखमोलाचं सामाजिक काम करण्यासाठी वापरतात.
प्रा.चं.का.देशमुख म्हणजे पुस्तकयात्री. पुस्तकांवर जिवापाड प्रेम. जपानी कवी ‘याशिका के माके’ने म्हंटल्याप्रमाणे
सामसूम रात
कोळी विणते वात
मी एकटा
प्रिय पुस्तकांची साथ
समाधानाची बरसात..
कोणी बरोबर असो वा नसो देशमुख सरांसोबत पुस्तकं मात्र नेहमी असतात. पुस्तके वाटणारा माणूस म्हणून लोक त्यांना ओळखतात. विनोबा भावेंची ‘गिताई’, साने गुरुजींची साधना व गाडगेबाबांचा खराटा या तीन गोष्टी सरांसोबत सतत असतात. मराठीप्रमाणे देशमुख सर गुजराती, कन्नड व इंग्रजी अस्खलित बोलतात.

देशमुख सरांनी ग्रामीण, शहरी भागातील अनेक शाळांची ग्रंथालये समृद्ध केली. मराठी, हिंदी व इंग्रजीचे दर्जेदार बालसाहित्य सर नेहमी विद्यार्थ्यांना भेट देतात. अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांना सरांनी पुस्तकरुपी धन वाटलं आहे. संगमनेर परिसरातील पानोडी, निमगाव जाळी, नान्नज दुमाला, तळेगाव दिघे, पारेगाव गडाख, साकूर आदी शाळांना सर नेहमी प्रोत्साहन देतात. कुठं वाचनपेटी, कुठं फिरते बालग्रंथालय तर कुठे शब्दकोश भेट देतात. शब्दकोशांवर देशमुख सरांचे विशेष प्रेम. सरांच्या घरात पुस्तकांप्रमाणेच मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती आदी भाषांचे शब्दकोश जरुर बघायला भेटतात. शब्दांशब्दाजवळ देशमुख सर थांबतात. नवनवीन शब्द शोधत राहतात. शुद्धलेखनाबद्दल सर अधिक जागरुक असतात. लखेनात होणार्‍या चुकांविषयी सर नेहमी मार्गदर्शन करतात.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु..
याप्रमाणे देशमुख सर शब्दांनाच धन मानून शब्दांचीच पूजा करतात. जिथं-तिथं साहित्य संमेलन, पुस्तक प्रदर्शन असतात तिथं-तिथं देशमुख सर आवर्जुन भेट देतात व दुर्मिक पुस्तकांची खरेदी करतात. हेच अनमोल धन दुर्गम भागातील शाळा, उपक्रमशील शाळा व ग्रामीण भागातील शाळांच्या अंगणात घेऊन जातात. वंचित विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देताना देशमुख सरांचा चेहरा आनंदून जातो.

दर दिवाळीला देशमुख सर साधना प्रकाशनचा बालकुमार दिवाळी अंक मोठ्या उत्साहाने खरेदी करतात. यावर्षी तर देशमुख सरांनी दोनशे बालकुमार दिवाळी अंक व शंभर श्यामची आई पुस्तके परिसरातील शाळांना, गरजू संस्थांना वाटली. साने गुरुजींचा अनमोल ठेवा सरांनी घराघरात पोहोचवला. रानात जसे एखादे आकर्षक व सुगंधी फुल असावे ते वारा गंधीत करते. त्याला प्रशंसेची ना प्रसिद्धीची गरज असते. तसे प्रा.देशमुख सरांची साधना निरंतर चालू असते.

तालुक्यात कुठे आकस्मिक जळिताची घटना घडली तर देशमुख सर वंचित व निराधरांसाठी काम करणार्‍या आधार फाऊंडेशन समवेत धावून जातात. संकटग्रस्त कुटुंबास कपडे, किराणा व भांडी देऊन जगण्याला बळ देतात. सरांनी कोविड महामारीच्या काळात निराधार व गरजू महिलांना, नगरपालिका स्वच्छता कर्मचार्‍यांना संसारोपयोगी वस्तू व किराणा भेट देऊन मायेची ऊब दिली आहे. नारळ आतून रसाळ व बाहेरुन कठीण असतो. देशमुख सरांच्या परसबागेत दोन उंच वाढलेली व सदा फळांनी डवरलेली दोन नारळाची झाडे आहेत. ही उंच झाडे घरावर छाया व इतरांना माया देतात. कारण देशमुख सर वर्षभर या झाडांची नारळं परिसरातील लोकांना, शेजारी, मित्र परिवारात वाटत राहतात. शेकडो रसाळ नारळ सर दरवर्षी इतरांना गोड भेट म्हणून देत राहतात. प्रा.चं.का.देशमुख म्हणजे अंतर्बाह्य निर्मळ व रसाळ व्यक्तिमत्त्व.

देशमुख सरांची आई प्रभाबाई व वडील कारभारी हे विडी कामगार होते. त्यांचा आशीर्वाद सतत पाठिशी असतो. पत्नी सुवर्णा उच्च विद्याविभूषित. विवाहित कन्या अक्षया बढेकर कृषी पदवीधर तर संपदा बोरकर ही अभियंता आहे. या सर्वांची साथ असल्याने आपण हा खारीचा वाटा उचलू शकतो अशी प्रांजळ भावना देशमुख बोलून दाखवतात. योगगुरु व आधार फाऊंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे सोबत देशमुख सरांची सकाळ योगमय होते. त्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळते. देशमुख सर एक उत्तम वक्ते बोलता-बोलता श्रोत्यांची मने जिंकून घेतात. सरांचे वक्तृत्व कधी उगवतीच्या मनमोहक रंगाप्रमाणे आल्हाददायक कधी कोवळ्या अंकुरित नाजूक पानांप्रमाणे कधी सागरावर उसळणार्‍या लाटांप्रमाणे बेभान तर कधी हस्याची कारंजी उडवत मनाला भावणारं विनोदी वाटतं.

वंचितांसाठी संचित घेऊन जाणारा, शाळांवर प्रेम करणारा व पुस्तकांना मित्र माणणारा असा हा कारुण्यमूर्ती, पुस्तकयात्री माणूस इतरांसाठी ‘आनंदयात्री’ बनला आहे. समाजाप्रती संवेदना ठेवून, इतरांच्या वेदना जाणून आयुष्यभर कर्म साधना करणार्‍या देशमुख सरांचे वर्णन संत तुकाराम यांच्याच शब्दांत करावे लागेल –
मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त
त्यासी आपंगिता नाही, त्यासी धरीजो हृदयी
तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंताची मूर्ती…
वाढदिवसानिमित्त या सहृदयी माणसास आधार फाऊंडेशन व दैनिक नायक परिवाराच्यावतीने उत्तम आरोग्यासाठी लाख लाख शुभेच्छा…!
शब्दांकन ः बाळासाहेब पिंगळे (समन्वयक आधार फाऊंडेशन, संगमनेर 9860676460)

Visits: 86 Today: 1 Total: 437688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *