यंदाच्या बैलपोळ्यावर कोरोना आणि महागाईचे सावट! साकूरसह संगमनेरात सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची तुरळक गर्दी

नायक वृत्तसेवा, घारगाव
बैलपोळा म्हटला की शेतकर्‍यांची आठ दिवस अगोदरच तयारी सुरू होते. आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी विविध साहित्य खरेदी करतात. मात्र शेतीचे आधुनिकीकरण, कोरोना आणि महागाईचे सावट असल्याने साकूर येथील बाजारात तुरळक गर्दी दिसून आली. अनेक दुकानदार मुद्दल भावात सजावटीचे साहित्य विक्री करण्यास तयार असतानाही शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.

वर्षभर शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लाऊन राबणार्‍या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा हा आनंदाचा दिवस असतो. त्यानुसार शेतकरी देखील त्यांना सजविण्यासाठी आठ दिवस अगोदर पासूनच तयारीला लागतात. बाजारात जाऊन घेरु, रंग, घुंगरांच्या माळा, फुगे, झालर, मुकूट आदी साहित्य खरेदी करतात. संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात शेतकरी वर्ग खरेदीसाठी साकूरला येतात. कोविडचे संकट काहीअंशी कमी झाल्याने आणि निर्बंध शिथील असल्याने दुकानदारांनी दुकाने थाटली होती. मात्र, शेतीला बाजारभाव नसल्याने आणि महागाई असल्याने शेतकर्‍यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे विक्रेते मुद्दल भावात साहित्य विक्री करण्यास तयार असतानाही शेतकर्‍यांनी त्याकडे पाठ फिरविली.

असेच काहीसे चित्र संगमनेरातही पहावयास मिळाले. बाजार समिती आणि मोठी बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातून येणार्‍या शेतकर्‍यांचा संगमनेरात दैनंदिन मोठा राबता असतो. परंतु, एकामागोमाग येणार्‍या संकटांमुळे आर्थिक गणित कोलमडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे बैलपोळा सणावर याचा परिणाम दिसून आला आहे.

यावर्षी बैलपोळा सणाची परिस्थिती खूप वाईट आहे. बैलांना सजावट करण्यासाठी विविध साहित्य विक्रीसाठी आणले आहे. मात्र ते खरेदीसाठी शेतकरी अत्यंत कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साहित्य पडून आहे.
– दत्ता रासने (दुकानदार, साकूर)

पूर्वी बैलपोळा म्हटला की एक मोठी पर्वणीच असायची. वर्षभर शेतात राबराब राबणार्‍या आपल्या बैलांना पोळ्याच्या दिवसी भल्या पहाटे उठून नदीवर नेऊन अंघोळ घातली जात असे. त्यानंतर घरी आणल्यानंतर त्यांना सजवले जात असे. दुपारी ढोल-ताशांच्या गजरात गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढली जात होती. मात्र आता बैलांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वी सारखा बैलपोळा आता होत नाही.
– रमेश लक्ष्मण आहेर (शेतकरी, घारगाव)

Visits: 90 Today: 1 Total: 1111051

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *