घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय अंधारात! रुग्णांची सुरक्षितता धोक्यात; वरिष्ठांचे दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अस्तित्वास आलेले घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय रात्रीच्या अंधारात गडप होत आहे. त्यामुळे येथे रात्री-अपरात्री ऐनवेळी उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आली असताना वरिष्ठांचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

संगमनेर (घुलेवाडी) येथील ग्रामीण रुग्णालय हे संगमनेर तालुक्यातील एक महत्वाचे शासकीय रुग्णालय आहे. येथे प्राथमिक आरोग्य सेवा, प्रसूतिगृह, लसीकरण, तपासणी व आपत्कालीन सेवा पुरवल्या जातात. जिल्हा आरोग्य यंत्रणेअंतर्गत हे रुग्णालय कार्यरत असून सर्वसामान्यांसाठी ते उपयुक्त आहे. मात्र रात्री रुग्णालय सोडून रुग्णालयाचा बाहेरचा परिसर अंधारात गडप होत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रुग्णालय परिसराच्या बाजूचे विजेचे दिवे बंद असल्याने आणि त्यातच रुग्णालय परिसरात झाडे असल्याने गडद अंधार या परिसरात असतो. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. रुग्णालयाच्या इंट्री गेट पासून रुग्णालय इमारत सोडली तर सर्वच ठिकाणी रात्रीचा गडद अंधार असतो. त्यामुळे आपत्कालीन काळी उपचारासाठी जाणारा रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अंधारात चाचपडत कसेबसे रुग्णालयापर्यंत पोहोचतात. रुग्णालय परिसरात असणारे दिवे नादुरुस्त आहेत की? विजेचे दिवे सुरू करण्याचा रुग्णालय प्रशासनाला कंटाळा येतो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रात्रीच्या वेळी रुग्णालय परिसरातील विजेचे दिवे कसे सुरु राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1108789
