‘अखेर’ बबन घोलप यांचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’! शिर्डी लोकसभेचे गणितं बिघडणार; कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची उत्सुकता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे उपनेते, माजीमंत्री बबन घोलप यांनी आज शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेटही घेतली होती. त्यामुळे राजीनामा देताच ते तशी घोषणा करतील असे अपेक्षित होते. मात्र त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाची उत्कंठा अजूनही ताणून धरताना कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याबाबत मौन बाळगले आहे. नाशिकच्या देवळालीतून मुलाला विधानसभा आणि शिर्डीत स्वतःला लोकसभा अशी घोलप यांची मागणी असून शिर्डीची जागा शिंदे गट लढवणार की भाजप यावरच त्यांच्याकडून पक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत बबन घोलप यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रत्यक्ष उपलब्ध झाले नाहीत, मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पक्षाने ऐनवेळी कर्जत-जामखेडचे आमदार सदाशिव लोखंडे यांना शिर्डीची उमेदवारी देण्यात आली. अवघ्या 20-22 दिवसांच्या प्रचारातच ते मोदी लाटेत विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेना सोडून गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा दारुण पराभव झाला. 2019 सालच्या निवडणुकीपर्यंत वाकचौरे भाजपात आले, मात्र शिर्डीची जागा शिवसेनेकडेच राहिल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली. मात्र यावेळीही त्यांना अपयशच आले.

गेल्या दोन वर्षात राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडीतून शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. त्याचा परिणाम राज्यातील अनेक लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांवर झाला आहे. त्यामुळे संभाव्य गणितांचा विचार करुन अनेक राजकीय नेते पक्षांतर करीत आहेत. शिवसेना फुटीनंतर शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेही शिंदे गटात सामील झाले. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या वाट्याला ही जागा असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात पडझड सुरु असतांना माजीमंत्री बबन घोलप यांना शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून पाठवले. त्याचवेळी शिर्डीच्या उमेदवारीचाही शब्द घोलप यांनी पदरात पाडून घेतला.

घोलप यांनी शिर्डीची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच कामाला सुरुवात केली. जुन्या शिवसैनिकांना साद घालून संघटना बांधणीवर भर दिला. अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून जात असतानाही त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर साथ देत पक्षबांधणीला महत्त्व दिले. त्याचा परिणाम राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात पक्षाची खूप कमी पडझड झाली. मात्र त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत पक्षप्रमुखांनी दहा वर्षांपूर्वी पक्षाशी गद्दारी करणार्या भाऊसाहेब वाकचौरे यांना थेट मातोश्रीवर पक्षप्रवेश दिल्याने बबन घोलप दुखावले गेले. पक्षाने त्यानंतरही त्याच्याकडे गांभीर्याने पाहीले नाही. उलट संपर्कपदी सुनील शिंदे यांची नेमणूक करुन घोलपांच्या जखमांवर मीठच चोळले गेले. त्यामुळे त्यांनी पक्षाचा उपनेतेपदाचाही राजीनामा दिला, मात्र पक्षाने तो स्वीकारला नाही.

तेव्हापासून बबन घोलप यांच्याबाबत राजकीय वावड्या उठतच राहिल्या. दोन दिवसांपूर्वी चर्मकार समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते शिंदे गटात प्रवेश करतील असे कयास वर्तवले जात असतांनाच आज (ता.15) सकाळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका ओळीत ‘मी शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे..’ असे लिहून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर लागलीच ते शिंदे गटात जाण्याची घोषणा करतील अशीच अनेकांना अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली आहे. याबाबत घोलप यांच्याशी संपर्क साधला असता ते यवतमाळ येथील एका कार्यक्रमात असल्याचे व पुढील काही तास उपलब्ध होणार नसल्याचे समजले. यावेळी राजीनाम्यानंतरच्या भूमिकेबाबत दोन-तीन दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

शिर्डी लोकसभा मतदार संघ पुढील वर्षी खुला होणार आहे. त्या दृष्टीने या मतदार संघावर भाजपचा डोळा आहे. त्यामुळे बबन घोलप राजीनामा देताच शिंदे गटात जातील हा कयास फोल ठरला आहे. घोलप यांनी जवळपास पन्नाश वर्षांहून अधिक काळ शिवसेनेत काम केले असल्याने त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी विशेष संवाद आहे. त्यामुळे जागा वाटपानंतर अथवा शिर्डीच्या जागेवर दोन्ही पक्षाचे एकमत झाल्यानंतरच घोलप कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतील हे ठरण्याची शक्यताही आहे. देवळालीतून मुलगा योगेशला विधानसभा आणि शिर्डीतून स्वतःला लोकसभा अशी त्यांची मागणी असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र तूर्त कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार या वाक्यावरच घोलप यांचा पुढील राजकीय प्रवास थांबला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये आता आणखी एक प्रबळ दावेदार दाखल झाल्याने या निवडणुकीची रंगतही वाढणार हे निश्चित झाले आहे.

माजीमंत्री बबन घोलप नाशिक जिल्ह्यातील देवळालीचे रहिवासी आहेत. पूर्वी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात काम केलेले असल्याने आणि ज्येष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. 2009 साली शिवसेनेकडून त्यांनाच उमेदवारी जाहीर होणार होती, मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांच्याऐवजी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. खासदार लोखंडे यांनी पक्षत्याग केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द मिळाल्याचेही बोलले जाते, मात्र तो पाळला गेला नाही, म्हणून ते नाराज होते. खासदार संजय राऊत यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला होता. गेल्या महिन्यात नाशिकमधील शिवसेना अधिवेशनातही ते अनुपस्थित होते, त्यावरुन ते पक्षांतर करणार हे निश्चित होते, आज त्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरीही उत्कंठा मात्र कायम आहे.

