टाळेबंदीची नियमावली शिथील करा ः मुरकुटे नेवासा तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
छोट्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेली टाळेबंदीची नियमावली शिथील करावी, अशी मागणी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नुकतीच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, टाळेबंदी नियमावलीमुळे सध्या सर्वसाधारण नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसाधारण नागरिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. कारण या निर्णयामुळे प्रथमता सर्वांची आर्थिक कोंडी निर्माण होणार आहे. कारण व्यापारी बाजारपेठ दुकाने बंद झालेल्या आहेत. त्यामुळे त्या दुकानात काम करणारे कामगार आज बेरोजगार झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या नियमावलीस व्यापार्यांसह सगळ्यांचाच विरोध आहे ही नियमावली करताना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करण्यात आला नाही. सद्यस्थितीत कोरोनाशी लढण्याबाबत आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती व उपायोजना उपलब्ध आहेत.
त्यामुळे व्यापारी बाजारपेठ बंद न ठेवता त्या सुरू करणे गरजेचे आहे. त्या सुरू न झाल्यास छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल. तसेच व्यापारी बाजारपेठ सुरू करताना कोविड 19 प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना करणेबाबत सूचित करण्यात यावे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, कामगार, व्यापारी यांची आर्थिक कोंडी होणार नाही. कारण आताची आर्थिक कोंडी सर्वसामान्य नागरिकाला परवडणारी नाही. त्यामुळे आवश्यक त्या अटींचे पालन करून टाळेबंदीच्या निर्णयामध्ये शिथिलता करून बाजारपेठ सुरू होण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे निवेदनात स्पष्ट केले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस व तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, प्रदेश संपर्क प्रमुख निरंजन डहाळे, नगरसेवक सुनील वाघ, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, संदीप अलवणे, सतीश गायके, आकाश देशमुख, प्रतीक शेजूळ, अमोल कोलते, सागर देशमुख उपस्थित होते.