कपाळावरील गद्दारीचा शिक्का घेवून जनतेत या : उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेचे संगमनेरात स्वागत; पक्षप्रमुखांच्या उपस्थितीतही गटबाजी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेना प्रमुखांनी माेदींना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला, मात्र तेच आज शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसेनेपाठाेपाठ काँग्रेससाेबतही असेच षडयंत्र रचले गेले, मात्र ती संपत नाही पाहिल्यावर आता ते काँग्रेस फोडीत आहेत. शिवसेनाही संपत नाही म्हटल्यावर आधी फोडली आणि नंतर चाेरली. भ्रष्ट-भ्रष्ट म्हणत ज्यांच्या नावाने आरडाओरड केली आज त्यांच्याच तळ्या उचलण्याची वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आल्याची घणाघाती टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.


आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचे संगमनेरात आगमन झाले. शिवसैनिकांच्यावतीने बसस्थानक चाैकात त्यांचे जाेरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. राज्यसभेचे सदस्य, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार शंकरराव गडाख, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचाैरे, शिवसेनेचे शहरप्रमुख अप्पा केसेकर, तालुका प्रमुख संजय फड, कैलास वाकचाैरे, अशाेक सातपुते, अमित चव्हाण, पप्पू कानकाटे यांच्यासह काँग्रेसच्यावतीने कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, साेमेश्वर दिवटे, शैलेश कलंत्री आदी उपस्थित होते.


यावेळी बाेलताना ठाकरे यांनी विराेधी पक्षांना फोडून नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या प्रकारांवर भाष्य करताना मंगळवारी भाजपवासी झालेल्या अशाेक चव्हाण यांच्या नावाचा दाखला दिला. पंतप्रधान माेदी आणि फडणवीस यांनी चव्हाणांवर घाेटाळ्याचे आराेप केले, मात्र त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांनी त्यांचा उल्लेख गृहमंत्री नव्हेतर ‘घरफोड्या‘ मंत्री असल्याचा घणाघात केला. अजित पवारांवर खुद्द पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. आता त्याच पवारांचे उष्टे-धुणे करण्याची वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.


शिर्डीच्या खासदाराने गद्दारी केल्याचे सांगत ठाकरेंनी आपल्या शैलीत खासदार सदाशिव लाेखंडे यांचाही खरपूस समाचार घेतला. भाऊसाहेब वाकचाैरेंना आपण निवडून दिल्यानंतर ते चुकले, पण परत आले. त्यांनी कधी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र या गद्दारांना मिंधे गटाने रचलेल्या कारस्थानात साथ देवून मोठे पाप केल्याचे सांगत त्यांचे तिकिटं कापले जाणार असल्याची भविष्यवाणीही त्यांनी केली. पक्षाशी गद्दारी करुन गेलेल्यांच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का हिच त्यांची निशाणी असून आधी आपली दाढी सांभाळता येते का ते बघा आणि नंतर धनुष्यबाण पेला असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.


मिंध्यांना थाेडीही लाज असेल तर त्यांनी घरात गप्प बसावे, नाहीतर कपाळावरचा गद्दारीचा शिक्का घेवून जनतेत येवून दाखवण्याचे आव्हान देत ठाकरे यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी आपल्या सरकारच्या काळात निधी दिल्याचा उल्लेख केला. मात्र आज भलतेच टिकोजीराव श्रेयासाठी सरसावल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला. महाराष्ट्रातला शेतकरी दरराेज मरतोय, तर दिल्लीच्या सीमेवर तडफडताेय. मात्र केंद्र आणि राज्य सरकार फक्त पक्ष फोडण्याच्या कामात गुंतल्याची टीका करताना त्यांनी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्जातून मुक्ती दिल्याचाही दाखला दिला.


सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या केवळ घाेषणा केल्या असून या याेजनांच्या नियम व अटी इतक्या जाचक आहेत की त्याची पूर्तता करण्यातच शेतकरी दमून जाताेय. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवल्याने कारस्थान रचून सरकार पाडल्याची घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी संगमनेरातील जनसंवाद यात्रेतून केली. शिवसेना काँग्रेससाेबत गेल्याचा अपप्रचार भाजप करीत आहे. मात्र ज्या भाजपसाेबत आम्ही २५-३० वर्ष राहीलाे, त्यावेळी शिवसेनेची भाजप झाली नाही, मग आज त्याची काॅग्रेस कशी हाेईल् असा सवालही त्यांनी केला. आपल्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सारख्या चांगल्या पक्षाची साथ मिळाल्याचे आणि त्यांच्यासाेबतच यापुढील लढा सुरु ठेवणार असल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.


ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमातूनही संगमनेर शिवसेनेतील गटबाजी दिसून आली. ठाकरेंना मंचावरुन आपली ओळख व्हावी आणि नाव दिसावे यासाठी दत्त मंदिराच्या बाजूने अक्षरशः फ्लेक्सची दाटी करण्यात आली होती, त्यावरुन ही बाब अधोरेखित झाली. पक्षप्रमुखांचा सत्कार करतांनाही स्थानिक पक्षातील एकसंघपणा दिसून आला नाही. प्रत्येक गटाने आपले स्वतंत्र अस्तित्त्व दाखवण्यासाठी वेगवेगळ्या सत्काराचा प्रयत्न केला. मात्र त्यात वेळेचा अपव्यय हाेवू लागल्याने ठराविक सत्कारानंतर खुद्द ठाकरेंनीच ‘लढाई माेठी आहे, सत्कारात वेळ खर्ची घालणं परवडणारे नाही’ असे सांगत मंचावर येण्यासाठी लागलेली रिघही त्यांनीच थाेपवली.

Visits: 121 Today: 2 Total: 439794

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *