पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांत उपाययोजना करा : शिंदे सूचना फलकांसह ओढ्यानाल्यांवर संरक्षक कठडे बांधण्याची सूचना..

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर डिसेंबरअखेर 43 जणांचे अपघातात बळी गेले आहेत. अपघातांची श्रृंंखला कायम राहत अनेकांना अपघातामध्ये अपंगत्व येऊन वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर डोळासेण महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी अपघातप्रवण क्षेत्र शोधून त्याठिकाणी उपाययोजना करण्याबाबत सूचित केले आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 60) कर्‍हे घाट ते आळेखिंड अशी 70 किलोमीटर हद्द डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कार्यकक्षेत येते. या महामार्गावर विविध कारणांतून अपघात होत असतात. प्रामुख्याने दुभाजक कट आणि महामार्ग ओलांडताना जास्त अपघात होत असल्याचे विश्लेषणात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत केंद्राने बावीस अपघातप्रवण क्षेत्रे शोधून काढली आहेत. दैनंदिन कामासाठी प्रवास करणारे नागरिक, पादचारी, विद्यार्थी, दुचाकी चालक आदिंची नेहमीच वर्दळ असते. मात्र, भरधाव वेगात असणार्‍या वाहनांच्या धडकेत अनेकांचा बळी जातो, तर अनेकांना अपंगत्व येत आहे. याचबरोबर वाहनांचेही मोठे नुकसान होते.

त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणी रम्बलर स्ट्रीप, पांढर्‍या रंगाचे पट्टे, पुढे गाव, शाळा, कॉलेज असल्याबाबतचे सूचना फलक, चंदनापुरी घाट सुरू होताना व संपल्यावर घाट सुरु व संपल्याबाबतचे माहिती फलक, कर्‍हेघाट, चंदनापुरी घाट, माऊली घाट यातील वळणांवर असलेल्या दुभाजक व क्रॅश बॅरियरवर रेडीयम लावणे, घाटात तीव्र वळणांवर लोखंडी ठोकळ्यांचे पट्टे (कॅटेच), पांढर्‍या रंगाचे पट्टे, वेगमर्यादेबाबतचे सूचना फलक, महामार्गावरील ओढे नाल्यांवर संरक्षक कठडे उभारणे आदी उपाययोजना करणे अत्यंत गरजेच्या आहेत. यामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Visits: 104 Today: 1 Total: 1113996

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *