संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या लोहमार्गात कोणाचा खोडा? सधनता खुंटवण्याचे षडयंत्र; शंभरावर खरेदीखत झालेली असताना मार्गात बदल संशयास्पद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील तीन दशकांपासून प्रतिक्षा असलेल्या संगमनेरकरांचे झुकझुक गाडीचे स्वप्नं अखेर भंगले आहे. राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वेमार्गात बदल केला असून त्यातून संगमनेर तालुक्याला वगळून तो शिर्डीकडे नेल्याने तालुक्यात संताप निर्माण झाला आहे. पुणे आणि नाशिकमधील चार औद्योगिक वसाहतींना जोडणार्‍या पूर्वीच्या प्रस्तावित रेल्वेमार्गामूळे तालुक्यातील सुशिक्षितांना रोजगाराच्या संधी मिळण्यासह शेती उत्पादनांसाठी महानगरांचे द्वार उघडले जावून तालुक्याची सधनता वाढण्याची अपेक्षा असताना राज्य सरकारने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यामागे कोणाचे षडयंत्र तर नाही? असा संशयही आता वर्तविला जात असून नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वेमार्गातून राजगुरुनगरपासून बदल करुन तो शिर्डीकडे वळवण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयाचा संगमनेरच्या लोकप्रतिनिधींकडून कोणताही विरोध झाला नसल्याने आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे.


राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात गती मिळालेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाने अडथळ्यांची अक्षरशः स्पर्धा पूर्ण केली. मध्यंतरी हा प्रकल्प बासनात गेल्यासारखी स्थितीही निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर अचानक नव्याने डीपीआर करुन त्याची मंजूरी घेण्यात आली. रेल्वे मंत्रालयानेही महारेलकडून प्रकल्प काढून घेत स्वतःच तो पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्र्यांशी बोलून हा रेल्वेप्रकल्प महारेलकडूनच पूर्ण करण्याचा निर्णय घडवून आणला. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यासह संगमनेर तालुक्यात भूसंपादनाचे कामही पुढे गेले. एकट्या संगमनेर तालुक्यात 103 खरेदीखतांद्वारे थेट शेतकर्‍यांकडून जमिनीची खरेदी घेण्यात आली. पुणे व नाशिकमध्येही हिच स्थिती होती.


अशातच रेल्वे अर्थसंकल्पातही या रेल्वेमार्गासाठी 2 हजार 424 कोटी रुपयांची भरीव तरतूदही करण्यात आली. त्यामुळे येत्याकाही वर्षातच संगमनेर तालुक्यातून महानगरांना जोडणारी झुकझुकगाडी धावेल असे चित्र निर्माण झाले. हा रेल्वेमार्ग वास्तवात आला असता तर या मार्गामूळे पुण्यातील भेासरी व चाकण आणि नाशिकमधील सिन्नर व मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या गेल्या असता. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेकडों तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या असता. या मार्गावरुन धावणारी रेल्वे सेमीहायस्पीड असल्याने प्रवासाचा वेळ वाचून दूध, भाजीपाला, फळे व अन्य शेती उत्पादनांना कमी वेळात महानगरांत नेण्याची सोय झाली असती.


पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागांना निळवंडे धरणाच्या कालव्यांमधून पाणी मिळाले आहे. येणार्‍या काळात आजवर दुष्काळात होरपळलेल्या या मोठ्या भागात हिरवाई नटेल. अशावेळी पुणे-नाशिक लोहमार्ग अस्तित्वात असता तर तालुक्याची सधनता शिखरावर पोहोचली असती. त्यासोबतच दक्षिण भारताला उत्तरेशी जोडणार्‍या या मार्गाने तालुक्याच्या समृद्धीतही वाढ झाली असती. मात्र या सगळ्या गोष्टी कोणाच्या डोळ्यात खुपल्यागत शासनाने अचानक या रेल्वेमार्गात बदल करुन संगमनेरकरांचे गेल्या 30 वर्षांचे स्वप्नं एका क्षणात मोडले आहे.


खरेतर नव्याने प्रस्तावित असलेला रेल्वेमार्ग नगर-श्रीरामपूर रेल्वेमार्गापासून काही किलोमीटरच्या अंतरावरच असणार आहे. मात्र असे असतांनाही राजगुरुनगरपासून तो शिर्डीकडे वळवण्याचा अट्टाहास संशयास्पद असून केवळ संगमनेर तालुका वगळण्यासाठी तर हे षडयंत्र रचले गेले नसेल? अशी शंकाही आता संगमनेरकरांमधून व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयाने सामान्य संगमनेरकराच्या मनात संताप निर्माण झाला असला तरीही तो संघटीत नसल्याने आणि त्यातच संगमनेरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सरकारच्या या निर्णया विरोधात ‘ब्र’ ही न काढल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गामूळे संगमनेर तालुक्याच्या सधनतेमध्ये वाढ होवून तालुक्यातील बरोजगार तरुणांना महानगरात मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता होती. शेती उत्पादनांनाही महानगरांची बाजारपेठ उपलब्ध होवून शेतकर्‍यांच्या दारात समृद्धी नांदली असती. मात्र शासनाच्या तुघलकी निर्णयाने यासर्व गोष्टी पाणी फेरले गेले असून वेगवेगळ्या विषयांवर सभागृहात सरकारला प्रश्‍न विचारणार्‍या आमदार सत्यजित तांबे यांनी या विषयावर जाब विचारुन सरकारला मार्गात बदल करण्यापासून रोखण्याची अपेक्षा संगमनेरातून व्यक्त केली जात आहे.

Visits: 293 Today: 2 Total: 1582270

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *