अकोलेतील शिवसेना नेत्याचा समर्थकांसह अजितदादा गटात प्रवेश आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला निर्णय


नायक वृत्तसेवा, अकोले
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी समर्थकांसह, तसेच अकोले मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.१७) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजी गर्जे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार बाबाजानी दुर्राणी, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, धुळे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जावेद बिल्डर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाचा निकाल जाहीर केला असून खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचीच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. अकोलेतही ठाकरे व शिंदे गट असून, ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी समर्थकांसह आमदार लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा गटात जाहीर प्रवेश केला. यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, स्थानिक, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुनच याचा परिणाम किती झाला हे पाहायला मिळेल.

Visits: 161 Today: 1 Total: 1795286

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *