राहुरीकरांना आता ‘खमक्या’ अधिकार्याची प्रतीक्षा! नेवाशात वादग्रस्त ठरलेल्या विजय करे यांचे नाव चर्चेत; राहुरीत मात्र विरोध..

नायक वृत्तसेवा, राहुरी
कुख्यात सागर भांड टोळीच्या कारागृह पलायन प्रकरणानंतर उशिराने का होईना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचे निलंबन केले. मात्र आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावरुन सध्या राहुरीतील वातावरण ढवळून निघाले असून जिल्ह्यात बदलून आलेल्या दोघांसह वादग्रस्त पोलीस निरीक्षक विजय करे यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र नेवाशातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरल्याने करे यांच्या नियुक्तीच्या चर्चेतूनच त्यांना मोठा विरोध होवू लागल्याचे चित्र राहुरीत दिसत आहे. राहुरीच्या पोलीस निरीक्षकपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

चोर्या, दरोडे, घरफोड्या, अपहरण, हाणामार्या आणि अवैध व्यवसायांमुळे चर्चेत असलेल्या राहुरीच्या कारागृहातून गेल्या महिन्यात संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) कैद असलेली सागर भांड टोळी चक्क कारागृहाचे गज कापून पसार झाली होती. या घटनेने राहुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरप्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या घटनेनंतर नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अनेक वरीष्ठ अधिकार्यांनी राहुरीत
धाव घेतली. त्यावरुन या घटनेला जबाबदार धरुन तेथील पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचे निलंबन होईल अशी राहुरीकरांना अपेक्षा होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह पाच कर्मचार्यांना निलंबित करुन एकाप्रकारे इंगळे यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत दैनिक नायकने राहुरीकरांच्या आवाजाला वाचा फोडल्याने उशिराने का होईना इंगळे यांचे अखेर निलंबन झाले. मात्र उपनिरीक्षक धाकराव यांचे निलंबन अद्याप मागे घेण्यात आलेले नाही.

पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या निलंबनानंतर आता राहुरीचा पदभार कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु असताना नेवासा पोलीस ठाण्यात वादग्रस्त ठरलेल्या व सध्या त्याच कारणावरुन नियंत्रण कक्षात असणार्या पोलीस निरीक्षक विजय करे यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र त्यांची नेवाशातील कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने व राहुरीतील कायदा-व्यवस्थेची सध्याची स्थिती नाजूक बनल्याने येथे खमक्या अधिकार्यांचीच नियुक्ती करावी अशी मागणी राहुरीकर करीत आहेत. त्यातच जिल्ह्याबाहेरुन आलेले पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी राहुरीत येवून येथील काही सामाजिक व राजकीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्याचीही माहिती समोर आल्याने करे यांच्यासह त्यांचेही नाव चर्चेत आले आहे.

मागील काही महिन्यांत राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांनी अक्षरशः उच्छाद घातला आहे. सतत होणार्या चोर्या आणि घरफोड्यांच्या प्रकाराने राहुरीकर नागरिक हैराण झाले असून व्यापारी वर्गाने वारंवार पोलिसांना भेटून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यानंतरही अशा घटनांमध्ये कोठेही घट झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राहुरीतील चोरटे पोलिसांपेक्षा अधिक प्रबळ झाल्याचे दिसत आहे. या सर्व घडामोडीत तुरुंगही असुरक्षित बनल्याने येथील बिघडलेल्या कायदा-व्यवस्थेची घडी बसवून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणार्या अधिकार्याचीच येथे वर्णी लागावी अशी मागणी समोर येत आहे. त्यानुसार राहुरीकरांना पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह डांगे, सायबर सेलचे ज्ञानेश्वर भोसले, घनश्याम बळप, यादव आदी अधिकार्यांमधून एखाद्याची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा आहे. पोलीस अधीक्षक त्यावर काय निर्णय घेतात याकडे आता राहुरीकरांचे लक्ष लागले आहे.

कुख्यात सांगर भांड टोळीच्या पलायन प्रकरणात सुरुवातीला पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह पाच जणांना निलंबित केले होते. मात्र त्यानंतर राहुरीतून नाराजीचा सूर समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी आता पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. उशिरा का होईना पोलीस अधीक्षकांनी योग्य कारवाई केल्याने राहुरीतून समाधान व्यक्त होत असतानाच यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या धाकराव यांना पुन्हा सेवेत रुजू करण्याचीही मागणी होत आहे.

