तुरुंगाचे गज कापून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींचे पलायन! संगमनेरच्या उपकारागृहातील घटना; पहाटे साडेसहाच्या सुमारास ठोकली धूम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अगदी भिंतीलाच असलेल्या उपकारागृहातील चार आरोपींनी बराकीचे गज कापून आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पलायन करणार्या आरोपींमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, पोक्सो आणि अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. सदरची घटना समोर आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार तथा जेलर धिरज मांजरे यांनी कारागृहाकडे धाव घेतली असून पोलिसांची वेगवेगळी पथके पलायन करणार्या आरोपींचा माग काढीत आहेत. नूतन कारागृह झाल्यापासून बंदीवान पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची खळबळजनक घटना आज (ता.08) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. संगमनेर पोलीस ठाण्यालगत असलेल्या उपकारागृहात शहरासह संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी येथील आरोपींना कैद करुन ठेवले जाते. त्यानुसार या कारागृहातील तीन बराकींमधील दोनमध्ये पोलीस आणि न्यायालयीन कोठडीचे मिळून एकूण 56 बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. पलायन करणारे चारही आरोपी तिसर्या क्रमांकाच्या कोठडीत बंदीस्त होते. याच कोठडीचे तीन गज कापून त्यांनी तेथून पळ काढला.

पलायन करणार्या आरोपींमध्ये वडगावपान येथील 2020 मधील खून प्रकरणातील आरोपी राहुल देवीदास काळे (संगमनेर तालुका), घारगावच्या हद्दित खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2022 पासून गजाआड असलेला आरोपी मच्छिंद्र मनाजी जाधव व 2021 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या अनिल छबू ढोले व रमेश रोशन दधेल उर्फ थापा या दोघा बलात्कारी आरोपींचा समावेश आहे. पळून गेलेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. या चौघांनीही हेक्सा ब्लेडचा वापर करुन गेल्याकाही दिवसांपासून हळूहळू बराक क्रमांक तीनचे तिनच गज कापले.

आज सकाळी कर्तव्यावर असलेल्या चौघा सुरक्षारक्षकांनी साफसफाईसाठी बराकीच्या बाह्य बाजूला असलेला सुरक्षा दरवाजा उघडला त्यावेळी एका महिला सुरक्षारक्षकासह चौघे पोलीस कर्मचारी कारागृहाच्या आसपासच होते. हिच संधी साधून चौघांनीही कापलेल्या गजातून कोठडी ओलांडून तेथून धूम ठोकली. सदरचा प्रकार उघड होताच पोलिसांची एकच धावपळ उडाली. वरीष्ठ पोलीस अधिकार्यांसह कारागृहाचे जेलर असलेले तहसीलदार धिरज मांजरे यांनी तत्काळ कारागृहात धाव घेत शिरगणती करुन पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटविली.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलिसांची वेगवेगळी तपास पथके स्थापन केली असून आज भल्या सकाळपासूनच ही पथके विविध ठिकाणी छापे घालीत पळून गेलेल्या आरोपींचा माग काढीत आहेत. या घटनेने संगमनेरचे उपकारागृहात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

