महामार्गाने घेतला आणखी एका बिबट्याचा बळी..! पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्यांचे जीव जाण्याची श्रृंखला कायम; वनविभागाची ‘चुप्पी’ आश्चर्यकारक..
नायक वृत्तसेवा, घारगाव
भक्ष्याच्या अथवा पाण्याच्या शोधात भटकंती करीत महामार्गावर येणार्या वन्यजीवांचे बळी जाण्याच्या घटना सातत्याने तालुक्यातून समोर येवू लागल्या आहेत. त्यातही संरक्षित असलेल्या बिबट्यांची संख्या अधिक असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरी वनविभागाच्या मोठ्या अधिकार्यांनी संगमनेर तालुक्याच्या वनहद्दिचा दौरा केला होता. खरेतर तो दौरा हरित लवादाच्या अन्य एका आदेशापोटी माहितीची जमवा जमव करण्यासाठी होता, मात्र त्यातही या महामार्गावर बिबट्यांसाठी भूयारी मार्गाची घोषणा झाली होती. त्यानंतर पंधराच दिवसांत आणखी एका बिबट्याचा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे विभागाने खवले मांजर बाळगणार्या पाच जणांना अटक केली होती. त्यातील बहुतेक सर्व आरोपी संगमनेर तालुक्यातील होते. यावरुन येथील वनविभागाच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उभे राहीले आहेत. बिबट्यांच्या अपघाती मृत्यूंच्या श्रृंखलेबाबत या विभागाची निष्क्रीय चुप्पी संशय वाढवणारी आहे.
गेल्या काही वर्षात संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील पठारभागात विखुरलेली बाळेश्वराची डोंगररांग, त्यांच्या पोटात वाढलेले जंगल आणि विस्तृत पसरलेले मुळेचे खोरे यामुळे पठारावर बिबट्यांसह अन्य वन्यजीवांच्या संचाराचे नेहमीच दाखले मिळतात. तसाच प्रकार खालच्या प्रवरा खोर्यातही आहे. प्रवरेच्या पाण्याने समृद्ध झालेल्या ऊसाच्या मळ्यांमधे बिबट्यांचे संसार फुलतात, तेथेच त्यांना बछडेही होतात आणि ते लहानाचे मोठेही होतात. मात्र नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून वाहनांचा वेग वाढल्याने भक्ष्याच्या अथवा पाण्याच्या शोधात महामार्गावर आलेल्या वन्यजीवांचे बळी जाण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. आज पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत साधारण दोन वर्ष वयाच्या बिबट्याचा बळी गेला आहे. नेहमीप्रमाणे वनविभागाने सोपस्कार पूर्ण करीत मृत बिबट्या ताब्यात घेतला असून त्याची निकषांप्रमाणे विल्हेवाट लावली जाईल.
पुणे-नाशिक महामार्गाचे नूतनीकरण झाल्यापासून बिबट्यांसह अन्य वन्यजीवांचे बळी नेहमीची बाब ठरु पहात आहे. संरक्षित जीवांच्या रक्षणासाठी वनविभागाला शासनाकडून मोठा निधीही मिळत असतो. मात्र असे असूनही तालुक्यातील बिबट्यांसह अन्य वन्यजीवांना सध्या कोणी वाली नसल्याचे दिसत आहे. या मागील वनविभागाची निष्क्रीयता संशय निर्माण करणारी आहे. काही दिवसांपूर्वी पुणे विभागाने पठारावर कारवाई करीत अत्यंत दुर्मिळ समजले जाणारे खवले मांजर व त्याची तस्करी करणार्या पाच जणांना अटक केली होती. त्यातील चौघे तालुक्यातील साकूर व त्यालगतच्या परिसरातील होते यावरुन तालुक्यातील वनपरिसरात वन्यजीवांची तस्करी करणार्या टोळ्या तर नाहीत ना? अशीही शंका निर्माण झाली आहे.
आज पहाटेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे उड्डाणपुलावर ही घटना घडली असून भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन वर्ष वयाचा बिबट्या जागीच गतप्राण झाला. आज सकाळी ही बाब समोर आल्यानंतर नागरिकांनी मृत बिबट्या बघण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. काहींनी याबाबम वनविभागाला कळविल्यानंतर वनरक्षक सी.डी. कासार व अरुण यादव यांनी घटनास्थळी जावून मृत बिबट्या ताब्यात घेवून चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात पाठविला आहे.