कोपरगाव ते रोटेगाव लोहमार्गास मान्यता द्या! मुख्यमंत्र्यांकडे आमदार आशुतोष काळे यांची मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांची शिर्डी, मराठवाडा व दक्षिण भारत लोहमार्गाने जोडण्यासाठी मराठवाडा मुक्ती दिनी (ता.17) कोपरगाव ते रोटेगाव लोहमार्गाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता द्यावी, अशी मागणी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. या नियोजित लोहमार्गामुळे दाक्षिणात्य भाविकांचा रेल्वे प्रवासाचा वेळ व खर्च वाचेल. मराठवाड्याचा काही भाग व कोपरगावच्या पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगावातील प्रवाशांना रेल्वेने औरंगाबाद अथवा नांदेड येथे जाण्यासाठी मनमाड येथून रेल्वे धरावी लागते. कोपरगाव-रोटेगाव लोहमार्ग झाल्यास कोपरगाव-मनमाड-औरंगाबाद या मार्गावरील जास्तीचे एकूण 94 किलोमीटर अंतर कमी होईल. प्रवाशांचा वेळ व खर्च वाचेल. या लोहमार्गामुळे कोपरगाव तालुक्यातील तसेच मराठवाड्याच्या सीमेवरील वैजापूर तालुक्यातील बर्याच दुष्काळी गावांना फायदा होईल. या मार्गावरच उक्कडगाव रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. त्यातून या परिसराच्या अर्थकारणाला चालना मिळेल. तसेच मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद असा औद्योगिक तारांकित चौकोन तयार होईल. औरंगाबादहून मुंबईला जाणार्या रेल्वेगाड्या कोपरगाववरून शिर्डीकडे वळविता येतील. आपण या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकारांना दिली.
कोपरगाव ते रोटेगाव या लोहमार्गाची मागणी फार जुनी आहे. मराठवाड्यातील नेत्यांनी त्यासाठी यापूर्वी आंदोलने केली. साईबाबांच्या शिर्डीचे महत्त्व लक्षात घेऊन प्रवासी संघटनेने देखील ही मागणी लावून धरली. आपण यात लक्ष घातले असून, नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. सरकार दरबारचा प्रस्ताव मार्गी लागल्यास पुढील पाठपुरावा सुरू करता येईल, असे आमदार काळे यांनी सांगितले.